Next
विकारांपासून मुक्ती
स्वामी मकरंदनाथ
Friday, October 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

प्र पंच करत असताना, व्यवहार सांभाळत असताना, अनेक प्रसंगी आपल्या मनामध्ये वेगवेगळे विकार निर्माण होतात. काम, क्रोध, भीती, खिन्नता असे विकार चटकन प्रकट होतात. परीक्षेची चिंता, नोकरीची चिंता, आजारपणाची; लग्नाची चिंता वाटते. वेगवेगळ्या पातळीवरील विकारांमुळे, चिंतांमुळे अनेकांची झोप उडते. संसारातील या चिंता सतत केल्यामुळे काळजी करण्याचा आपला स्वभाव बनतो. परिणामत: चित्ताची शांत, स्थिर अवस्थाही असते, एवढेच नव्हे तर ती प्राप्त करून घेता येऊ शकते हे आपण विसरूनच जातो. बहुतेकांचा असाच अनुभव आहे. समाजातील एखाददुसरी व्यक्ती मात्र निश्चिंत, प्रसन्न, आनंदी वृत्तीने कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना आढळते कारण तिने अशा विकारांवर मात केलेली असते.

आपल्याकडून काम, क्रोध, भीती, खिन्नता अशा विकारांचे प्रकटीकरण होते. याचे कारण आपली देहबुद्धी! दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पाहून आपल्याला धक्का बसतो याचे कारण दुसऱ्याचा मृत्यू पाहून आपल्या स्वत:च्या जिजीविषेवर म्हणजे जगण्याच्या इच्छेवर कुठेतरी आघात झालेला असतो. आपल्या अस्तित्वाच्या भावनेवर आघात झालेला असतो. मी असावे, माझे अस्तित्व अत्यंत अबाधित असावे, अशी आपली आकांक्षा असते. त्या आकांक्षेपोटी मूळ अस्तित्वावर आघात झाला, तर भीती किंवा चिंता निर्माण होते. तसेच आपले आर्थिक नुकसान झाले, आजारपण आले, मुलगा शिक्षणात मागे पडला, तर अशावेळीदेखील आपल्या अस्तित्वाला धक्का बसतो. एक प्रकारची भीती मनामध्ये निर्माण होते. हे घडणे अपरिहार्यच असते. जोपर्यंत मी हा अबोध आहे, तोपर्यंत असे होतच राहणार. मग सुखदु:खाच्या गटांगळ्याही अपरिहार्यच आहेत. असे होऊ नये आणि विकारांवर मात करता यावी यासाठी भगवंतांनी गीतेमध्ये काही उत्तम युक्त्या सांगितल्या आहेत. दुसऱ्या अध्यायात भगवंत सांगतात, ‘प्रजहाति यदाकामान् सर्वान् पार्थ मनोगतान्।’ एक तर कोणतीही विकारजन्य वृत्तीच उठू देऊ नका. समजा तशी वृत्ती उठलीच, तर तिच्यामागे वाहत तरी जाऊ नका. त्यापासून तटस्थ राहा.

एखाद्या प्रसंगी आपला विवेक जागृत नसेल, तर विविध विकारांमुळे उठणारे विचार आपल्याला त्रास देतात, म्हणून शक्यतो विचारच उठू देऊ नयेत आणि उठलेच तर विचाराच्या अथवा विकाराच्या मागे जाऊ नये, असे भगवंत म्हणतात. त्याबरोबरच ‘आत्मनि एव आत्मन: तुष्ट:।’ ‘आपण आत्मस्वरूप आहोत’ या बोधात संतुष्ट राहण्याचा अभ्यास निश्चयपूर्वक करावा, असे भगवंत सांगतात. भगवंतांनी सांगितलेला दुसरा उपाय आहे, ‘य: सर्वत्रानभिस्नेह: ततत्प्राप्य शुभाशुभम्। नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।।’ कर्तव्यकर्म करत असताना जे काही फलस्वरूप घडेल, मग ते चांगले असो वा वाईट, शुभ असो वा अशुभ, त्याच्याबद्दल उत्साहाने अभिनंदनही नको किंवा तिटकाराही नको, असे राहावे. तटस्थपणे त्याचा स्वीकार करावा किंवा परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकार करावा. त्यात गुंतून पडू नये. अथवा आपल्या जीवनाला घडलेला तो परमेश्वराचा स्पर्श आहे असे समजावे आणि कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहावे. आणखी एक उपाय म्हणजे दु:खामध्ये उद्विग्नता येऊ न देणे व सुखाच्या प्रसंगी स्पृहा वाढू न देण्याचा प्रयत्न करणे. आपले असे असते, की काही चांगले झाले तर आपण म्हणतो, हे भगवंतांमुळे घडले. तसाच भाव दु:ख कोसळल्यावरही असावा, की ही भगवंतांची इच्छा आहे. सुखाप्रमाणेच दु:खाच्या प्रसंगीही पहिला स्पर्श भगवंतांचा व्हावा. यामुळे सुखाच्या प्रसंगी स्पृहा म्हणजे परत परत सुख प्राप्त व्हावे ही इच्छा आणि दु:खाच्या प्रसंगी उद्विग्नता यापासून आपण स्वत:ला वाचवू शकू. आणखी एक उपाय म्हणजे व्यवहार करताना सहन करायला शिकावे. देहाच्या, मनाच्या, बुद्धीच्या अंगांनी सहनशक्ती वाढवावी आणि सारे काही साधनेच्या वेळी आत्मस्वरूपामध्ये लीन करावे. हे सारे प्रयत्न करताना कधी असे घडते, की आपली शक्ती कमी पडते, तेव्हा भक्तीची गरज निर्माण होते. आधी स्वत:ची शक्ती वापरावी, कमी पडेल तेव्हा भगवंतांना कळवळून हाक मारावी, प्रार्थना करावी, भगवंताकडे शक्ती मागावी. ते अवश्य शक्ती पुरवतील. अशाचप्रकारे भगवंतांनी दाखवलेल्या मार्गांनी, स्वत:वर वेगवेगळे प्रयोग करून विकारांवर मात करणे शक्य आहे. तसा अभ्यास आपण करू!
(पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य स्वामी माधवनाथ
यांचा वारसा पुढे चालवणारे स्वामी मकरंदनाथ यांचे
खास तरुणांसाठी सदर)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link