Next
पुस्तकाने दाखवली दिशा
स्मिता गुणे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this story‘ती अन्नपूर्णा आहे, तिच्या हाताला चव आहे, तिने केलेला ढोकळा खाण्यासाठी लोक आवर्जून येतात. ढोकळा खाऊन तृप्त होऊन जातात.’ एका साध्या ढोकळ्याने जिचे आयुष्य अंतर्बाह्य बदलून टाकले ती उज्ज्वला सुनील महाले ही उद्योगिनी ‘संगमनेरी खमण ढोकळा’ या ब्रॅण्डची निर्माती म्हणून कौतुकास्पद कामगिरी करते आहे.

उज्ज्वला महाले या मूळच्या नगरच्या. वडील सरकारी नोकरीत होते. घरचे जुने वळण आणि मुलगी पदवीधर होईपर्यंत तिचे लग्न झाले पाहिजे हा आग्रह सर्वमान्य होता. खरं तर उज्ज्वलाला वाचनाची खूप आवड. तिच्या डोक्यात प्रशासकीय अधिकाऱ्याचं पद आणि डोळ्यांसमोर किरण बेदी असायच्या. परंतु त्यासाठी घरुन पाठिंबा मिळणार नाही हे लक्षात आलं. मग उज्ज्वलानं तो विचार मनातच दडपून टाकला. यथावकाश वडिलांनी तिचं लग्न करून दिलं आणि उज्ज्वला संगमनेरला आली.

उज्ज्वलाचे पती सुनील महाले हे संगमनेरला एका छोट्या सायंदैनिकात उपसंपादक म्हणून काम करत होते. पत्रकारितेचे शिक्षण घेऊन नोकरी करत असताना त्यांचेही वाचन भरपूर होते. त्यामुळे पतीपत्नींचे विचार छान जुळले. जवळे कडलग या संगमनेरजवळच्या छोट्या गावात उज्ज्वलाचा सुखी संसार सुरू झाला. उज्ज्वलाला दोन मुलगे - समर्थ आणि स्वामी. समर्थाचा जन्म झाला तेव्हा सगळे आनंदात असतानाच लक्षात आले की समर्थला काहीतरी आहे. डॉक्टरांनी निदान केले ‘सेरेब्रल पाल्सी’.  सुनील आणि उज्ज्वलाच्या काळजाचा ठोकाच चुकला. पण नाइलाज होता आणि मग न डगमगता दोघांनीही आपल्या मुलाच्या उपचारांसाठी धावपळ सुरू केली. सासूबाई सासरे खूपच आधार देत होते, तरी संसाराची गाडी कठीण वळणावर येऊन ठेपली होती. मुलासाठी काही करता येत नाही म्हणून  उज्ज्वलाचं मन दुःखी व्हायचं. त्यावेळी उज्ज्वला गावातच एका ग्रंथालयात कामाला जाऊ लागल्या होत्या. संचालक सुनील व वृषाली कडलग हे स्नेही होते. त्यांच्या धीर देणाऱ्या शब्दांनी उज्ज्वलाला आशा वाटायची. एके दिवशी डॉक्टर अरुण कडलग या दुसऱ्या स्नेहींनी एक पुस्तक उज्ज्वलाच्या हातात ठेवले आणि वाचण्याचा आग्रह धरला.

 “इडली आर्किड आणि मी” हे विठ्ठल कामत यांचं आत्मकथन उज्ज्वला  यांच्या जीवनात अक्षरशः मसिहा बनून आलं. पुस्तक वाचताना विठ्ठल कामत यांच्या जीवनसंघर्षाने उज्ज्वला यांच्या मनात लढण्याची जिद्द पुन्हा निर्माण झाली. निराशेचे काळे ढग हटू लागले आणि पती सुनील यांच्याकडे उज्ज्वलानं प्रस्ताव मांडला.. ‘मी काहीतरी खाद्यपदार्थ करून विकण्याचा उद्योग सुरू करते.’  उज्ज्वला यांच्या मनातल्या ऊर्मीला पती, सासू, सासरे सर्वांनीच खूप पाठींबा दिला आणि उज्ज्वलानं उत्साहानं पहिला पदार्थ केला ‘ढोकळा’. सुरुवातीला गावातल्या लोकांना खायला दिला तेव्हा भरभरून दाद मिळाली. लोकांना ढोकळा खूप आवडला. उज्ज्वलानं हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांना पत्र लिहिलं. त्यात या घडामोडींचा उल्लेख आणि पुस्तकातून मिळालेल्या प्रेरणेविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. आश्चर्य म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाने पत्र वाचून उज्ज्वला यांच्याशी फोनवर संवाद साधला. मोलाच्या टिप्सही दिल्या.

दरम्यान त्यांच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. स्वामी आणि समर्थ या दोन्ही मुलांचं करताना एकीकडे डोक्यात विठ्ठल कामत यांचे शब्द घुमत होते, ‘पहिलं पाऊल उचल.. तरच यश मिळेल.’ त्या शब्दांनी भारावलेल्या अवस्थेत उज्ज्वला यांना पहिली ऑर्डर मिळाली. पाच किलो ढोकळा अखंड हरीनाम सप्ताहात द्यायचा होता. देवाचे आशीर्वाद आहेत आपल्या नव्या उद्योगाला या भावनेने उज्ज्वला यांनी जीव ओतून ढोकळा केला.. आणि तिथूनच यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली. लोकांना ढोकळ्याची चव आवडली. मग त्यांनीच प्रसिद्धी सुरू केली. हळूहळू मागणी वाढू लागली.

आता मोठ्या प्रमाणात माल बनवण्याचे साहित्य गोळा करायचे होते. ठाण्यातील नणंदेने मोठा पॉट लगेच पाठवून दिला. त्यावरच्या ढोकळ्याचा पहिलाच प्रयोग उज्ज्वला ने यशस्वी केला. ग्राहकही वाढतच होते. पण एवढा जास्त माल जवळ्याहून संगमनेरला आणून विकणं अवघड होतं. मग सुनील यांच्या डोक्यात आलं की एखादं छोटेसं घर संगमनेरला घेउया. म्हणजे मुलांसाठीही ते सोयीचं होईल. हळूहळू घर उभं राहिलं. आता ढोकळा विकण्यासाठी गाळा हवा होता. महाले पतीपत्नींचे प्रयत्न आणि धडपड बघून गाळाही मिळाला.

एकदा एका कॉलेजच्या मुलांनी तीनशे प्लेटची ऑर्डर दिली. उज्ज्वला  खूश झाल्या. कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं की फनफेअरमध्ये तुम्हीच तुमचा ढोकळा विकायचा आहे. नाइलाज होता. सुनील उभे राहिले पण त्या झगमगाटात एकही प्लेट ढोकळा विकला गेला नाही. त्या दिवशी व्यवसायातले अनेक धडे डोळ्यांतल्या अश्रूंबरोबर महाले पतीपत्नींना चाखायला मिळाले. त्यानंतर मात्र गणित बरोबर जमवणं उज्ज्वला नीट शिकल्या.

आज संगमनेरी खमण ढोकळा या नावानं दुकान उभं आहे. गाडीही माल वाहतुकीसाठी सज्ज असते. ढोकळ्याची मागणी सतत वाढते आहे. अहोरात्र कष्टही आता उज्ज्वला यांना आनंदच मिळवून देताहेत. शारीरिक दुर्बलता असुनही सदैव आनंदी असलेला समर्थ आणि स्वामी ही दोन्ही मुलं मोठी होताहेत. वडिलांसारखे पाठीशी उभे असलेले सासरे आणि प्रेमळ सासू आई होऊन साथ देताहेत. समजूतदार पती नोकरी सांभाळून धंद्यात साथ देत आहेत. यशाची अनेक शिखरं अजून सर करायची आहेत. लोकांना जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो... हे जाणलेल्या उज्ज्वलाने अनेक ग्राहक मिळवले आहेत. देवदूतासमान जीवनात आलेले विठ्ठल कामत स्वतः एकदा नव्हे तर दोन वेळा दुकानाला भेट देऊन गेले. ‘कष्टाची तयारी, चांगल्या माणसांचा आणि प्रेरणादायी पुस्तकांचा सहवास याचबरोबरच तुझा ढोकळा अप्रतिम आहे, त्याची रेसिपी कधीच बदलू नकोस!’ हे विठ्ठल कामत यांचे बोल उज्ज्वला  महाले यांनी मनावर कोरून ठेवले आहेत. त्यामुळे संगमनेरी खमण ढोकळा पंचक्रोशीतल्या लोकांच्या जिभेवर राज्य करतो आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link