Next
रणधुमाळी
प्रतिनिधी
Friday, October 04 | 02:00 PM
15 0 0
Share this story

सध्या नवरात्र, निवडणुकांची घोषणा आणि महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीवर्षाची सुरुवात यामुळे वातावरणात उत्साह व आनंद भरून राहिलेला आहे. समस्या व अडचणी अनेक आहेत, परंतु त्यावर मात करत सर्व लोक उत्साहात आणि आनंदात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जागावाटप व उमेदवारांच्या नावांची घोषणा यामुळे वातावरणात जो काही थोडाफार ताणतणाव निर्माण होतो, तो हळूहळू निवळत आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांतील बडे नेते सत्ताधारी पक्षातील ‘आयाराम’ झाल्यामुळे विरोधी पक्षांपुढे सत्ताधारी पक्षाला किमान पुरेसे आव्हान देऊ शकतील असे उमेदवार शोधण्याचे आव्हान होते, ते बऱ्यापैकी पेलण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे. शिवसेनेला जागावाटपात ठरल्याप्रमाणे निम्म्या जागा मिळाल्या नसल्या तरी सन्मानजनक आकडा मिळवता आला आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी हे या निवडणुकीचे एक आगळे आकर्षण ठरणार आहे. त्यांना राज्याचे भावी उपमुख्यमंत्री मानले जात असल्यामुळेही या मतदारसंघाकडे साऱ्या भारताचे लक्ष असेल. ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रथमच निवडणुकीत उतरत असल्यामुळे शिवसेनेचे राजकारण आता वेगळे वळण घेत आहे असे म्हणावे लागेल. शिवसेनेपुढे सध्या सर्वात मोठे आव्हान मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच उभे केलेले असल्यामुळे ते पेलण्यासाठी या नव्या राजकीय चालीचा उपयोग होतो का ते पाहायचे आहे. सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत पक्षाच्या काही मातब्बर नेत्यांची नावे नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जी नावे पहिल्या यादीत असावयास पाहिजे ती त्यात नाहीत याचा अर्थ पक्षाला आपले नेते व कार्यकर्त्यांना काहीतरी गंभीर संदेश द्यायचा आहे, असा लावला जात आहे. पक्ष सध्या केंद्रात पूर्ण बहुमताने आणि अनेक राज्यांत सत्तेवर आहे. महाराष्ट्रात याच पक्षाकडे पुन्हा सत्ता येणार आहे, असे चित्र आहे. त्यामुळे पक्षाला आपल्या राजकीय हिताकडे व प्रतिमेकडे डोळा ठेवूनच उमेदवारांची निवड करावी लागते. भाजपचे नेतृत्व तेच करत आहे, असे दिसते. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील असे केंद्रीय गृहमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर करून फडणवीस यांच्या नेतृत्वावरचा पक्षाचा विश्वास जाहीर तर केलाच आहे, शिवाय पक्षातील अन्य नेत्यांना आपल्या महत्त्वाकांक्षा काबूत ठेवण्याचाही इशारा दिला आहे. एवढेच नाही, तर राज्यातील मतदारांच्या मनातील शंकाही दूर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच गोंधळाचे वातावरण आहे. दोन माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिल्यानंतरही राज्य काँग्रेसच्या नेतृत्वाचा चेहरा धूसरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ईडीच्या नोटिशीचा राजकीय फायदा पक्षाचे नेते शरद पवार यांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यांच्या घराण्यानेच साथ दिली नाही, त्यामुळे हा प्रयत्न वाया गेला. अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या अजित पवार यांनी ईडीच्या केवळ एका नोटिशीमुळे राजकारण सोडून शेती करण्याचा विचार करावा याचे आश्चर्य वाटते. पक्षाचे नेते ईडीच्या नोटिशीविरुद्ध झुंजारपणे लढत असताना त्यांनी मैदानातून माघार घ्यावी, हे लढणाऱ्या नेत्याला रणांगणात एकटे टाकण्यासारखे आहे. खरे तर भाजप-शिवसेना युतीपुढे आव्हान उभे करण्याची क्षमता असलेले शरद पवार हे एकमेव नेते आहेत व प्रचाराच्या मैदानात उतरल्यावर ते हे आव्हान उभे करतील यात काही शंका नाही. एकंदर निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link