Next
‘खेलो इंडिया’त ऑलिंपिकपदकांची पायाभरणी
विशेष प्रतिनिधी
Friday, January 25 | 03:30 PM
15 0 0
Share this story

सरकारी खात्याकडून आयोजित करण्यात येणारी क्रीडास्पर्धा किंवा कोणताही कार्यक्रम म्हणजे अत्यंत रटाळ आणि नीरस असाच असतो, असा एक समज आहे. परंतु रंगलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धेमुळे हा समज आता गैरसमज ठरल्यास आश्चर्य वाटू नये. कोणत्याही जागतिक दर्जाच्या स्पर्धेला तोडीस तोड संयोजनाबरोबरच मैदानावरील क्रीडाकौशल्याच्या अतिशय प्रभावी आविष्कारामुळे खेलो इंडिया ही स्पर्धा गाजली.
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या पुढाकाराने खेलो इंडिया या स्पर्धेचा गेल्या वर्षी प्रारंभ करण्यात आला. भारतीय क्रीडा प्राधिकरण या पायाभूत क्रीडासुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेच्या देशभरातील केंद्रे आणि कार्यप्रणालीत यानिमित्ताने अमूलाग्र बदल करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या क्रीडापटू आणि या खेळांच्या संघांना खेलो इंडियात स्थान देण्यात आले. एका दृष्टीने ही चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अशीच स्पर्धा ठरली. स्विमिंग, जिमनॅस्टिक्स, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॉक्सिंग, जुडो, बॅडमिंटन, खोखो, कबड्डी, फूटबॉल अशा अनेकविध क्रीडाप्रकारांमध्ये देशभरातील सुमारे सहा हजार स्पर्धक १७ वर्षांखालील आणि २१ वर्षांखालील अशा दोन गटांमध्ये सहभागी झाले होते.
यंदाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले. तब्बल ८५ सुवर्ण, ६६ रौप्य आणि ८१ कांस्य अशा एकूण २२८ पदकांची लयलूट करत महाराष्ट्राने यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. त्याखालोखाल हरियाणाने ६२ सुवर्ण, ५६ रौप्य आणि ६० कांस्य अशा १७८ पदकांची कमाई करत दुसरे स्थान, तर दिल्लीने ४८ सुवर्ण, ३७ रौप्य आणि ५१ कांस्य अशा १३६ पदकांसह तिसरे स्थान मिळवले. त्यानंतर कर्नाटकने ७७ पदके, तामिळनाडू ८७ पदके, उत्तर प्रदेश ८८ पदके, पंजाब ७२ पदके, गुजरात ३९ पदके, पश्चिम बंगाल ४४ पदके आणि केरळ ५८ पदके अशी पदकतालिका राहिली.
खेलो इंडियाची ही क्रीडाचळवळ केवळ एका स्पर्धेपुरती मर्यादित नाही, ही सातत्यपूर्ण चालणारी क्रीडाक्रांती आहे. त्याचे मुख्य ध्येय हे २०२४ आणि २०२८या वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदके मिळवून देणे हे आहे. त्यामुळेच खेळण्यासाठी १७ आणि २१ वर्षांखालील खेळाडूंचे गट करण्यात आले आहेत. म्हणजेच पुढील दहा वर्षांत हे  खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट करण्यासाठी सज्ज होतील, अशी अपेक्षा आणि नियोजन आहे. त्यासाठी भारतामध्ये प्रथमच खेळाडू व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत या खेळाडूंच्या वयोगटातील आशियापासून युरोप अमेरिका खंडांपर्यंतचे इतर खेळाडू काय कामगिरी करत आहेत आणि आपले खेळाडू त्यांच्या तोडीस तोड बनवण्यासाठी आपल्याला अजून किती पल्ला गाठायचा आहे याची अतिशय तपशीलवार माहिती संकलित केली जात आहे. त्यानुसार या खेळाडूंचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियोजन आणि त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठीचे निकष आखले जात आहेत. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होण्यासाठी निधीची चणचण भासते. खेलो इंडियाच्या माध्यमातून तब्बल एक हजार खेळाडूंना दरवर्षी सुमारे पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. तसेच, पुढील आठ वर्षे त्यांना हा निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जानुसार कामगिरी करणे त्यांना बंधनकारक आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता बाळगणाऱ्या या एक हजार गुणवान युवा खेळाडूंमधूनच आपल्याला २०२४ आणि २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकस्पर्धांमध्ये पदके मिळण्याची आशा बळावते आहे. इतकेच नव्हे तर २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिकमध्येही या युवा खेळाडूंमधील काही खेळाडू चमत्कार घडवतील आणि पदक मिळवून देतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय क्रीडाक्षेत्रातील नियोजन आणि प्रशासन यांनीदेखील कात टाकल्याचे यंदाच्या खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवले. एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करावी, अशा पद्धतीचे नेटके नियोजन, खेळाडूंना सर्वतोपरीने सुविधा प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न आणि नियोजनाअभावी खेळाडूंच्या कामगिरीवर विपरित परिणाम होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिल्याने यंदाची स्पर्धा अतिशय उल्लेखनीय ठरली.
देशामध्ये क्रीडासंस्कृती निर्माण करण्यासाठी मैदानावरील स्पर्धेबरोबरच इंडिया का खेल उत्सव स्पोर्ट्स एक्सपो याचे आयोजनदेखील अतिशय नावीन्यपूर्ण ठरले. दहा दिवसांमध्ये तब्बल पन्नास हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावरील युवक-युवतींमध्ये क्रीडाविषयक शिक्षण-प्रशिक्षण आणि कौशल्यनिर्मिती करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ दहा हजारांहून अधिक युवक-युवतींनी घेतला. ‘खेलेगा महाराष्ट्र तो जीतेगा राष्ट्र’ अशी घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिली आणि तीच आदर्शवत मानून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विजेतेपद मिळवतानाच क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी एक आश्वासक पाऊल टाकले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link