Next
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
अनिल गोविलकर
Thursday, August 15 | 05:00 PM
15 0 0
Share this story

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे गाणे म्हणजे मुळात कवी आरती प्रभू यांची सत्यकथेत आलेली कविता आहे. नंतर ‘नक्षत्रांचे देणे’ या नावाने त्यांच्या कवितांचा संग्रह आला आणि पुढे संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या ही कविता वाचनात आली.  ‘सामना’ चित्रपटात, एक पार्श्वगीत म्हणून चपखल बसली.
खरे तर आरती प्रभू हे कधीही चित्रपटांसाठी गाणी लिहिणारे कवी नव्हते, त्यांचा तसा पिंडच नव्हता. अतिशय मनस्वी कलाकार म्हणून ख्यातकीर्त असल्याने फार कुणी संगीतकार वाटेला गेले नाहीत. या कवितेमधून मनाच्या संत्रस्त अवस्थेचे चित्रण आहे. कवितेचा आशय अगदी स्पष्ट आहे, आयुष्यातील अत्यंत निराशावस्थेतील अभिव्यक्ती आहे, अगदी टोकाची वाटावी अशीच आहे आणि त्यासाठी, ‘दिवे विझून जाणे’ किंवा ‘वृक्ष झडत जाणे’ अशा अगदी वेगळ्या, आपल्याला सहज समजून घेता येणाऱ्या प्रतिमा वापरल्या आहेत. कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला निराशेच्या एका वेगळ्या जाणिवेची प्रतीती देते आणि ती देताना वाचक काहीसा झपाटला जातो. ‘कोण देते हळी, त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे’ यासारखी विलक्षण ताकदीची ओळ खरे तर चित्रपटगीतांसाठी अजिबात योग्य नाही. बहुधा म्हणूनच हे गाणे चित्रपटात पार्श्वगीत म्हणून वापरले असणार.
संगीतकार भास्कर चंदावरकर हे मुळातले सतारवादक, पंडित रविशंकर यांचे गंडाबंध शिष्य. अर्थात रागदारी संगीताचा पायाभूत अभ्यास तरीही विशेषतः पाश्चात्त्य संगीताकडे अधिक ओढा दिसून येतो. विशेषतः ‘सिंफनी’ संगीताचा अधिक बारकाईने अभ्यास केला आहे. आता या गाण्यापुरता विचार केल्यास, सुरुवातीच्या व्हायोलिन आणि मेंडोलिन वाद्यांच्या सुरावटीतून याची प्रचीती घेता येते. अर्थात त्याकाळच्या एकूणच सगळ्या संगीत रचना बघता, अशा प्रकारे वाद्यमेळ रचणे, हा नवीन प्रयोगच होता. गाण्याची चालदेखील कवितेच्या आशयाशी पूर्णपणे तद्रूप झालेली आढळेल. तालाला तबला आणि पाश्चात्त्य बोन्गो ही तालवाद्ये आहेत. गाण्यात दोन अंतरे आहेत आणि त्याची समान तत्त्वावर बांधणी केली आहे. गाण्यातील ताल फार सुंदर वापरला आहे. मुखडा किंवा अंतरा संपताना, शेवटची ‘मात्रा’ विशेष वजनाने घेतली असल्याने त्याला एक वेगळेच वजन प्राप्त होते. तसेच, दुसरा अंतरा सुरू होण्याआधी, व्हायोलिनवरील एक छोटी ‘गत’ चालू असताना आणि संपत असताना त्यात ज्याप्रकारे स्वरांची ‘वळणे’ घेतली आहेत, तशा प्रकारचा स्वराकाश मराठीत अभावानेच  ऐकायला मिळतो. पाश्चात्त्य संगीत येथे नेमकेपणाने ऐकायला मिळते. खरेतर हे एकप्रकारे ‘फ्युजन’ म्हणता येईल. या गाण्याने मराठीत एक नवीन ‘पायवाट’ निर्माण झाली.
गायक रवींद्र साठे यांची ठाम ओळख या गाण्याने झाली. स्वच्छ, गंभीर प्रकृतीचा गळा तसेच तिन्ही सप्तकांत वावर करण्याची क्षमता ही खास वैशिष्ट्ये मांडता येतील. याच गाण्यातील पहिल्या अंतऱ्यातील तिसरी ओळ – ‘जीवनाशी घेती पैजा घोकून, घोकून’ एकदम वरच्या स्वरांत घेतली आहे. तोपर्यंत गायन हे खालच्या पट्टीत चाललेले आहे. असे एकदम वरच्या पट्टीत सहजपणे आवाज  लावणे, हे कौशल्याचेच काम आहे. तेथे जाताना आवाज कुठेही चिरकत नाही तर तसाच स्वच्छ, निर्मळ लागतो. ललित संगीतात एक नवा मानदंड या रचनेने निर्माण केला आणि तो यशस्वीपणे रुजवला, हेच खरेतर या गाण्याचे मोठे यश आहे.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून?
जगतात येथे कोणी मनात कुजून!
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून, घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे!

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
कोण देते हळी, त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link