Next
धर्मयुद्ध आणि ‘शोले’चं नाणं
चंद्रशेखर कुलकर्णी
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकस्पर्धेत भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळावं की खेळू नये, हा एक शंभर नंबरी सवाल सध्या उभा ठाकला आहे. त्याची वेगवेगळी उत्तरं मिळत आहेत. पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर तापलेल्या वातावरणाची पार्श्वभूमी त्याला आहे. सौहार्दाकडे जाणारे दरवाजे बंद झाले आहेत. पाकिस्तानसोबत फक्त शत्रू म्हणूनच व्यवहार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या मैदानात आपण पाकिस्तानशी खेळावं की खेळू नये, हा सवाल निर्माण झाला. जून महिन्यात होऊ घातलेल्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धेच्या निमित्तानं एक सत्त्वपरीक्षा पाहिली जाणार आहे. या संदर्भात भारताची भूमिका काय असावी, यावर लाखो सल्ले जाहीरपणे दिले जात आहेत. अर्थातच उलटसुलट. अशा स्थितीत याकडे तटस्थपणे पाहायला कोणी तयार नाही. तसं पाहताना नाण्याचच्या दोन्ही बाजू विचारात तर घ्यायलाच हव्यात.
क्रिकेट हा कोट्यवधी भारतीयांसाठी नुसता खेळ नाही. तो जणू धर्म आहे. या धर्मानं वेड लावलेल्यांची संख्या अपरंपार आहे. क्रिकेटच्या धर्माचं वेड जपण्यासाठी क्रिकेट समजण्याची गरज असतेच कुठे? वेड आणि समज या सर्वस्वी भिन्न गोष्टी. एकाच नाण्याच्या दोन बाजू. अशा दिवाण्यांच्या देशात भारत-पाक क्रिकेटबाबतची भूमिका काय असावी, याचा कानोसा घेतला तर प्रामुख्यानं दोन दृष्टिकोन दिसतात. पहिला असा, की राष्ट्रवादाचा मार्ग क्रिकेटच्या मैदानातून जातो का? क्रिकेटचं जग हे राष्ट्रवादाचं प्रतीक असू शकतं का? आज या खेळात काय नाही? ग्लॅमर आहे. मनोरंजन आहे. बाजाराच्या आर्थिक नियमांना कवेत घेणारं मार्केटिंग आहे. सट्टा आहे. चीअर लीडर्स आहेत. अफाट पैसा आहे. करोडो चाहते आहेत. ते चाहते व्यक्तिगत सुखदु:खं बाजूला ठेवून, बेभान होऊन क्रिकेटचा आस्वाद घेतात. कोणी मनोरंजनाच्या अंगानं, तर कुणी लक्ष्मीच्या मोहापायी! या सगळ्यांवर तडका म्हणून थोडा बहुत राष्ट्रवादाचा भावही आहे.
एका अर्थानं हा काही जागतिक खेळ नाही. ब्रिटिशांनी ज्या देशांवर दीर्घकाळ राज्य केलं त्या मोजक्या राष्ट्रकुल देशांमध्ये क्रिकेट रुजलं आणि वाढलं. एकेकाळी सभ्य गृहस्थांचा म्हणून ओळखला जाणारा हा खेळ शुचितेचा आदर करत पांढऱ्याशुभ्र कपड्यांत खेळला जायचा. कालांतरानं मैदानातच सभ्यतेची राखरांगोळी झाली. राणीचं वर्चस्व, हुकमत शिरसावंद्य असलेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलियानं त्याला ‘अॅशेस’ नाही ग्लॅमर दिलं. असो.
मुद्दा इतकाच, की क्रिकेटचा भारतीय संघ तांत्रिकदृष्ट्या भारताचा आहे की बीसीसीआय नामक एका धनाढ्य संस्थेचा आहे? विश्वचषकस्पर्धेत प्रेक्षकांच्या सज्जात अनेक धर्मवेडे तिरंगा नाचवतात म्हणून तो देशाचा संघ बनतो का? हा खेळ जर राष्ट्रवादाचं ज्वलंत प्रतीक असेल तर मग त्यात सट्टेबाजी कशी चालते? फिक्सिंगचे प्रवाद कसे दुर्लक्षित केले जातात? राष्ट्रवादावर सट्टा नाही लागू शकत! जे काही असेल ते असो, पण या खेळासाठी विश्वचषक हा परमोच्च मुकुटमणी. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेची हे धर्मवेडे चातकासारखी वाट पाहत असतात. विशेषत: त्यातल्या भारत-पाक झुंजीची. कोट्यवधी लोकांवर या खेळाची मोहिनी आहे, हे लक्षात घेऊनच राजकीय पुढाऱ्यांनी क्रिकेटच्या तंबूत शिरकाव केला. अनेक राज्यांच्या क्रिकेट असोसिएशनच्या नाड्या राजकीय नेत्यांच्या हाती आहेत. लालूप्रसाद यादवांपासून पवार-जेटलींपर्यंत अनेकांना क्रिकेटच्या राजकारणात विलक्षण रस आहे. त्यातूनच येत्या विश्वचषकस्पर्धेत भारतानं पाकिस्तानशी खेळावं की खेळू नये या वादाला राजकीय अंगानं तोंड फुटलं. खरं तर क्रिकेटला धर्म मानणाऱ्यांना ही झुंज टळावी, असं वाटत नाही. राजकारणापायी खेळाची माती होऊ नये, असंच त्यांना वाटतं. इंग्लंडमधल्या क्रिकेटचं बॉक्सऑफिस सांभाळणाऱ्यांनाही भारत-पाक सामना खेळला जावा, असं व्यवहाराच्या अंगानं वाटतं. आजमितीस एकवेळ चंद्रावर वा मंगळावर जाण्याचं तिकीट मिळू शकेल, पण वर्ल्डकपमधल्या भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट मिळणार नाही. या सामन्यावरील गुंतवणूक अफाट आहे. आर्थिक आणि भावनिकही! या गुंतवणुकीच्या परतव्यासाठी हा सामना व्हायलाच हवा. युद्ध लढायचं असेल तर सीमेवर लढा, ते सीमापार करून क्रिकेटच्या मैदानात आणू नका!
दुसरा दृष्टिकोन त्याच्या नेमका विरुद्ध आहे. आपला क्रिकेटचा संघ हा भारताचा आहे. मैदानात उतरलेले अकरा खेळाडू सव्वाशे कोटी देशवासीयांचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यांच्या पाठीशी तिरंग्याचं पाठबळ असतं. काही वेळा राष्ट्रीय अस्मितेतून खेळाच्या जागतिक स्पर्धेवर टाकलेल्या बहिष्काराचं दाखले दिले जातात. पण महायुद्धं झाली, तेव्हाही ऑलिम्पिकस्पर्धा पार पडल्याच ना! क्रिकेटबाह्य मापदंडांवर सामन्याचं आणि खेळाचं भवितव्य टांगणीला लावू नका. आपला संघ मैदानात खेळायला उतरतो, तेव्हा सामन्याच्या आधी विश्वचषकस्पर्धेमध्ये आपल्या राष्ट्रगीताची धून वाजतेच की! ज्या खेळातील असामान्य प्रतिभेनं, कर्तृत्वानं ज्यानं कोट्यवधी भारतीयांच्या आनंदात भर टाकली, त्या सचिनला आपण भारतरत्न किताबानं गौरवलं. तो खेळ क्लबचा किंवा संघटनेचा म्हणून हिणवण्यात काय अर्थ आहे? त्यापुढचाही मुद्दा असा, की पाकिस्तानविरुद्ध खेळणं ही पाकिस्तानचा खेळाच्या मैदानातही पराभव करण्यासाठी लाभलेला मार्ग आहे. या दोन देशांमधल्या सामन्याच्या वेळी सरहद्दीच्या दोन्ही बाजूंना अस्मिता परमोच्च बिंदूवर पोचते. उत्कंठा शिगेला पोचते. अशा वेळी सामन्याकडे पाठ फिरवून काय साधणार? क्रिकेटच्या या धर्मयुद्धात मैदान हे रणांगण असेल तर तिथे लढायलाच हवं, असा मतप्रवाहही प्रखर आहे.
गमतीचा भाग असा, की नाण्याच्या दोन्ही बाजूंचे दृष्टिकोन भिन्न आहेत, पण नाणेफेकीचा कौल एकच आहे. बहिष्कार नको; सामना हवा! शोले चित्रपटातल्या जयकडे एकच कौल देणारं नाणं होतं. तसंच हेही!
नाणेफेकीचा हा कौल अनाकलनीय नाही. तरीही त्यावर वाद झडताहेत. क्रिकेटच्या धर्मक्षेत्रात आपल्याकडे सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर ही दोन शक्तिपीठं आहेत. ही दोघंही तर्कसंगत भूमिका मांडताहेत. भारतात यांचं जे स्थान, ते पाकिस्तानात इम्रान खानचं. एकेकाळचा पाकिस्तानी संघाचा कर्णधार आजमितीस पाकिस्तानचा वजीर-ए-आलम झाला आहे. तोही दोन्ही देशांनी परस्परांविरुद्ध खेळण्याचा खंदा पुरस्कर्ता.
या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये आपण पाकिस्तानविरुद्ध न खेळून त्यांना वॉकओव्हर द्यायचा की खेळून, लढून धूळ चारायची, यावर दुसरा पर्याय एकमतानं स्वीकारला जातोय. प्रश्न इतकाच आहे, की युद्धात जिंकून तहात हरायची आपली सवय बाजूला ठेवून आपण लढणार की नाही? क्रिकेटचं कुरुक्षेत्र आधुनिक तत्त्वज्ञानाकडे डोळे लावून आहे! धर्मवेड्यांचा निर्णय झालेला आहे. सत्तावेड्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link