Next
आजीसोबत नवे वर्ष
अनुजा हर्डीकर
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyघरी आल्याआल्या ‘मला स्मार्टफोन घ्यायचा आहे’ ह्या आजीच्या वाक्याने अथर्वचे तिच्याबद्दलचे सारे पूर्वग्रह गळून पडले होते. एवढ्या लांबचा प्रवास करून आलेली आजी लगेच कुठे निघणार शॉपिंगला? मात्र आजी लगेचच फ्रेश झाली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यासोबत मोबाइल खरेदीसाठी निघाली. “मला कुठच्यातरी छोट्याशा दुकानात नेऊ नको बरं, एखादा चांगला मॉलपण दाखव.” आजीच्या एकेका वाक्याने अथर्वला काय बोलावे काही सुचत नव्हते. “आजी! तू मॉलमध्ये येणार? तू तिथे जाऊन मला कसली कटकट करू नको हं आईसारखी” मनात जे आले ते आजीशी तो मोकळेपणाने बोलला. आजीने नुसती मान डोलावली, गालात हसली आणि दोघे निघाले; परतले ते जिवाची मुंबई करून.

स्मार्टफोन तर झालाच, शिवाय आजीने स्वतःसाठी कुरते, पंजाबी ड्रेसेस, आईसाठी ट्रॅकपँट, टीशर्ट, अथर्वला जे पाहिजे होते ते, सारे सारे खरेदी केले. आजीजवळचे पैसे संपल्यानंतर अथर्वने तिची कार्ड स्वाईप करण्याची भीतीही घालवली. एकंदरीत काय, तर आपली आजी फार मॉर्डन आहे, पकवत वगैरे नाही. पूर्वी जे वाटले ते लहान असल्यामुळे असावे, ह्या निष्कर्षापर्यंत तो येऊन पोहोचला. घरी परततानाच न राहवून त्याने आजीला विचारले, “तू असं स्वतःसाठी काय गं गिफ्ट घेतेस?” त्यावर हसत ती म्हणाली, “अरे गिफ्ट काय, मला जे हवं, ते मी घेतलं. आता तुझ्या आईबाबांना म्हणाले असते की मला फोन हवाय. तर त्यांनाही तुझ्यासारखा धक्का बसला असता. त्यांनी चांगल्यात चांगला फोन घेऊनही दिला असता. पण ज्या गोष्टी माझ्या मला घेता येतात, त्या इतर कोणीतरी आपल्याला द्याव्या ही अपेक्षा का करायची? आणि हे काय फक्त वस्तू विकत घेण्याबाबत नाही बरं. मला आता चहा हवाय. जर मला तो करता येतो, तर आईनं  हातात आणून द्यावा अशीही अपेक्षा का?” अथर्वचे विचारचक्र सुरू झाले होते. मोबाइलसकट साऱ्या नव्या गोष्टींचा उत्साह आजी-नातवाच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता. मोबाइलवर काढलेले नवीन कपड्यातले फोटो इंस्टाग्राम स्टेटसवर अपडेटही झाले.

कधी जाणार ही आजी, असा प्रश्न विचारणाऱ्या अथर्वने आजीला नव्या वर्षापर्यंत थांबवून घेतले. आजीकडे नक्कीच काहीतरी जादू होती. आजीने साऱ्यांची मने जिंकून घेतली होती. समोरच्या व्यक्तीला जाणून घेऊन, तिला आपलेसे करण्यात आजीचा हातखंडा होता. तिला गप्पा मारायला किंवा शिकून घ्यायला कोणताही विषय वर्ज्य  नव्हता. घरी फराळ करायचा, विकतचा आणायचा नाही यावर ठाम असणाऱ्या आजीने साराला मात्र केक बनवण्यापासून, ऑर्डर घेऊन विकेपर्यंत सगळ्यामध्ये मदत केली होती. मुलांना समृद्ध करणारा एक अनुभव मिळाला होता. त्यात त्यांचे वाद झाले, रुसवाफुगवी झाली, पण केक, ते घरपोच पोहोचवण्याची उत्तम सोय यामुळे सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले होते. त्यांनाही त्यांचे स्वतःचे स्वभाव, त्यांचातील क्षमतांची नव्याने ओळख झाली. काहीशी अलिप्त आणि अबोल असणारी सारा या ग्रुपमध्ये आता चांगलीच मिसळली. “इतक्या वर्षांत तुम्हाला तुमच्या मैत्रिणीची ओळख झाली नाही तर ती कसली मैत्री? चला, आता कामाला लागा. हे केक, कुकीजचे फोटो अपलोड करा. किमती ठरवा. प्रत्येकानं जबाबदारी ठरवून घ्या.” आजीच्या शब्दांनीच केवढा हुरूप आला होता ना... अचानक अगदी न ठरवता, हातामध्ये स्वतः कमावलेले पैसे आले. आता पॉकेटमनीचा प्रश्न सुटणार बहुतेक; साराला केक ऑर्डर्स मिळणार याची खात्री होती.

अथर्व-साराची ही टीम भलतीच फेमस झाली होती ती आजीमुळे. तिच्या डिक्शनरीमध्ये ‘नाही’ हा शब्द नाही जणू! अथर्व स्वतःच्या विचारात रमला होता. आजीला थांबवले आहेच तर ३१ डिसेंबरही दणक्यात साजरा करू! मात्र काय करावे ते सुचेना. ३१ ची संपूर्ण रात्र जागायची, पण करायचे काय? काहीही कळेना. इथेही आजी मदतीला आली. इतक्या वर्षात मॉलबाहेर, मल्टिप्लेक्सबाहेर घुटमळणारी, भीक मागणारी किंवा फुगे विकणारी लहान मुले कधीच दिसली नव्हती. ठरले! त्या मुलांसाठी, रात्री ती झोपल्यावर जुनी पांघरुणे, जुने ऊबदार कपडे गोळा करून द्यायचे. आणि पहाटे किंवा सकाळी लवकर उठून ज्यांना नव्या वर्षाची सुट्टी नाही किंवा तशी घेणे परवडण्यासारखे नाही, थोडक्यात नव्या वर्षाची चैन करता येत नाही, अशा लोकांना गरामगरम चहा-बिस्किटे देऊन नव्या वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या. या अनुभवाने एक वेगळे जग समोर आले होते! एसटी डेपोवर, स्टेशनवर, सरकारी रुग्णालयात अशा अनेक ठिकाणी नव्या वर्षाचा आनंद, उत्साह नसणारे कितीतरी लोक भेटले. आपल्या नजरेपलिकडचे, कल्पनेपलिकडचे एक विश्व त्यांनी अनुभवले. नव्या वर्षाचे स्वागत नव्या दृष्टीने झाले!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link