Next
आनंदाचा कंद
राहुल देशपांडे
Friday, November 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात दिवाळीपहाटचा कार्यक्रम होता. त्यात शौनक अभिषेकी, देवकी पंडित, विजय घाटे, अभिजित पोहनकर असे अनेक मोठे कलाकार होते. मी वयानं सगळ्यात लहान होतो आणि पहिल्यांदा दिवाळीपहाट कार्यक्रमात सहभागी होत होतो. मनावर दडपण होतं. दिग्गज गायकांबरोबर गायचं होतं, समोर शेकडो जाणकार प्रेक्षक होते. त्यामुळे नाही म्हटलं तरी टेन्शन होतंच. त्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा ‘अलबेला सजन’ गायलो आणि काय सांगू... गाणं सुरू झालं तेव्हापासून बरोबरच्या सगळ्या कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी ते उचलून धरलं. अनपेक्षित दाद मिळत होती. शौनकदादा, देवकीताई, अभिजित आणि समोरचे प्रेक्षक सगळेच मनापासून दाद देत होते. माझं गाणं त्यांना आवडतंय हे मला कळत होतं, त्यामुळे माझा हुरूप वाढत होता. गाणं संपताच प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. ती खूप मोठी शाबासकी होती. आपल्यासाठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे उभं राहून टाळ्या वाजवाव्यात हे माझ्याबाबतीत तेव्हा पहिल्यांदाच घडत होतं. त्यामुळे दिवाळीपहाटची ती मैफल माझ्यासाठी अविस्मरणीय आणि खूपच खास होती. त्यानंतर अनेकवेळा असे अनुभव आले. परंतु तो अनुभव स्पेशल होता.
आजकाल सकाळच्या मैफली बंदच झाल्या आहेत. रात्री ज्या मैफली होतात त्यालाही वेळेचं बंधन असतं. त्यामुळे काही विशिष्ट प्रहरी गायले जाणारे राग आम्हाला मैफलीत गाताच येत नाहीत. आपण कितीही म्हणत असलो की शास्त्रीय संगीताला चांगले दिवस आले आहेत तरी अगदी शंभर टक्के शास्त्रीय संगीताच्या मैफली आता वर्षातून दोन ते तीन वेळाच होतात. एक शास्त्रीय गायक म्हणून मला असं वाटतं, की आमचा संघर्ष अजून सुरूच आहे. कारण जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा प्रेक्षकांची अपेक्षा वेगळीच असते. म्हणजे वर्षातून आम्ही जितके कार्यक्रम करतो त्यापैकी पूर्णतः शास्त्रीय संगीतावर आधारित असे कार्यक्रम दहा टक्केसुद्धा नसतात. लोकांना नाट्यसंगीत किंवा ‘कट्यार...’मधली गाजलेली गाणी ऐकायची असतात. दिवाळीपहाटच्या निमित्ताने ती संधी मिळते आणि सुरुवातीला शास्त्रीय राग गायला मिळतात. त्यामुळे नक्कीच दिवाळीपहाट कार्यक्रमासाठी आम्ही कलाकार मंडळी उत्सुक असतो. दिवाळीपहाट कार्यक्रम आम्हा कलाकारांना आणखी एका कारणासाठी जवळचे वाटतात ते म्हणजे प्रेक्षकांचा उत्साह. प्रेक्षक ठरवून आलेले असतात की या कार्यक्रमाचा मला मनमुराद आनंद घ्यायचा आहे...बस्स! दुसरं काही नको. तिथे मग ते परीक्षकाच्या नजरेतून पाहत नाहीत तर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा ही एकच भावना असते, हे मला खूप आवडतं. ते छान कपडे घालून येतात आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच वातावरण उत्साहानं भारून टाकतात. त्यातून आम्हालाही एक ऊर्जा मिळत असते. वातावरणाचा खूप मोठा प्रभाव कलाकारावर पडत असतो. आम्ही गाताना ती ऊर्जा प्रेक्षकांकडून घेत असतो. ती जशी आम्हाला समोरून मिळते तसं आमचं गाणं आणखी खुलत जातं. त्यामुळे दिवाळीपहाटच्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा असतो.

आणखी एक अविस्मरणीय मैफल म्हणजे झाकीर साहेबांबरोबरचा. त्यांच्याबरोबर मी एकदा पुण्यात आणि एकदा नाशिकमध्ये कार्यक्रम केला होता. लहानपणापासून ज्यांना बघून मी मोठा झालो, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावंसं वाटतं ती व्यक्ती शेजारी बसून तुम्हाला साथ करते आहे ही जाणीवच इतकी ग्रेट होती की त्यांच्या सहवासानं मी आधीच भारावून गेलो होतो. तो रोमांचकारी अनुभव मी विसरू शकत नाही. ते मला छान दाद देत होते, प्रोत्साहन देत होते. इतका मोठा माणूस पण ते एकदा सुटले की मग काय विचारता... आम्ही दोघंही समेवर एका वेळी येतोय की नाही याचं मला जाम टेन्शन आलं होतं आणि जेव्हा दोघं एकदम समेवर आलो तेव्हा मला अक्षरशः ‘हुश्श’ झालं. त्यांनीही मनापासून दाद दिली. समोरचा कलाकार लहान असला तरी त्याचा हुरूप वाढवण्याचं काम झाकीरसाहेब बरोबर करतात. आता आम्ही दिवाळीपहाटचे अनेक कार्यक्रम करतो आणि दरवेळी प्रेक्षकांकडून मिळणारी ऊर्जा घेत घेत पुढे जात असतो. आमच्या गाण्यानं त्यांची दिवाळी आनंदमयी, सूरमयी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांची दाद हाच आमचा आनंद असतो, ती मिळाली की मग आमची दिवाळी सार्थकी लागते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link