Next
क्रिकेटच्या देवाची धोनीवर वक्रदृष्टी
अमित मधुकर डोंगरे
Friday, June 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story


इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत भारतीय संघाचा माजी संघनायक आणि बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी याच्यावर दस्तुरखुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने शरसंधान केले आहे. धोनी आणि केदार जाधव यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संथ फलंदाजी केल्याने धोनीवर देवाची वक्रदृष्टी पडली आहे.
सचिनने टीका केली असली तरी धोनीला त्याच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे सचिनला सोशल मीडियाद्वारे ट्रोल केले जात आहे. खरे तर सचिन सहसा कोणावर टीका करत नाही, उलट तो खेळाडूंना प्रोत्साहनच देतो. यावेळी मात्र त्याने धोनीला घरचा आहेर का दिला, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे. धोनी आता त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहे आणि ही स्पर्धा संपल्यानंतर तो निवृत्ती घेणार हे जवळपास निश्चित आहे. अशावेळी टीका करून सचिनने काय साध्य केले, असेही बोलले जात आहे.
धोनीने स्वत:च्या नेतृत्वाखाली बेस्ट फिनिशरचा रोल सांभाळत संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. २०११ची विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धाच नव्हे तर अनेक मालिकांमध्येही त्याने आपल्या खेळाने संघाला यशोशिखरावर नेले आहे. या विश्वकरंडकस्पर्धेत त्याची अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजी संथ झाली असली तरी ती खेळपट्टी पाहता बॅटवर चेंडू धिम्यागतीने येत होता, शिवाय इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा जास्त अनुभव असूनदेखील सचिनने संघाची त्या सामन्यातील स्थिती, खेळपट्टीचे स्वरूप आणि संघाची बिकट अवस्था लक्षात न घेता धोनीवर केलेली टीका चाहत्यांना चांगलीच झोंबली आहे.
एक गोष्ट खरी आहे, की धोनीची बॅट आता आधीसारखी चालत नाही, परंतु त्याच्याकडे असलेला अनुभव आजच्या सगळ्या खेळाडूंपेक्षा जास्त आहे, आणि त्यावेळी संघाची स्थिती लक्षात घेत फलंदाजीचा वेग कमी करणे गरजेचेच होते. त्यावेळी आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात धोनी किंवा जाधव बाद झाले असते तर भारताच्या धावा आटल्या असत्या व अफगाणिस्तान संघाला पराभूत करणे आणखी कठीण बनले असते.
धोनी संघाच्या डेथ षटकांमध्ये जी आक्रमक फलंदाजी करायचा तशी खेळी आता होत नाही हे खरे असले तरी स्पर्धा सुरू असताना सचिनने केलेली टीका संघाच्या मानसिकतेवर परिणाम करणारी ठरणार आहे, हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. मग सचिनच्या हे लक्षात कसे आले नाही? धोनीने आपली फलंदाजी खोलवर नाही हे ओळखले होते व आपण बाद झालो तर मोठी धावसंख्या होणार नाही व संघाला अफगाणिस्तानपुढे आव्हान ठेवता येणार नाही, त्यामुळे त्याने खेळाचा गिअर बदलला, निदान हे तरी सचिनने लक्षात घ्यायला हवे होते. या स्पर्धेत धोनीची व त्याच्या अनुभवाची गरज संघाला खूप महत्त्वाची आहे हे सचिनने ओळखायला हवे होते. त्या सामन्यात धोनीला एकेरी धावदेखील घेता येत नव्हती, हे खरे असले तरी तो खेळपट्टीवर असणेदेखील समोरच्या फलंदाजांसाठी प्रेरणादायी ठरते हे नाकारून चालणार नाही. संघाला खडे बोल सुनावणे सचिनचा हक्क आहे, पण हेच तो धोनीला प्रत्यक्ष भेटून बोलू शकला असता, त्यासाठी जाहीर टीका करण्याची गरज नव्हती.
असो, प्रत्यक्ष देवाच्या टीकेचा धनी बनलेला धोनी यातून काही बोध घेईल व पुन्हा एकदा बेस्ट फिनिशरची खेळी करेल, अशी अपेक्षा आहे. धोनी खेळपट्टीवर उभा राहिला तरी प्रतिपक्षावर दडपण येते, इथेच त्याचा अनुभव व महानता सिद्ध होते. सचिनने टीका केली ती योग्य असली तरी त्याचे ठिकाण व वेळ चुकली, स्वत: खेळात असताना जी चूक सचिनने कधीही केली नसली तरी यावेळी मात्र त्याचे टायमिंग निश्चितच चुकले आहे. सचिनबरोबरच माध्यमांच्या टीकेला, निवडसमितीच्या नाराजीला व चाहत्यांच्या अपेक्षांना धोनी आता बॅटने उत्तर देईल का, ते पुढील सगळ्या सामन्यांमध्ये कळेलच. जर धोनी यशस्वी ठरला तर येणाऱ्या काळात सचिन टीकेचा धनी बनेल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link