Next
मिठाचा खडा!
चंद्रशेखर कुलकर्णी
Friday, February 08 | 03:00 PM
15 0 0
Share this story


मिठाचा खडा या दोन शब्दांच्या नुसत्या उच्चारानं घास अडकल्याची भावना जागी होते. बव्हंशी हे दोन शब्द नकारात्मक भावनेनं वा अर्थानं वापरले जातात, पण याच मिठाच्या खड्यानं भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत एक स्फुल्लिंग चेतवलं. दांडीयात्रा हे त्याचं लौकिक रूप. काळाच्या ओघात संदर्भ बदलतात. सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी दांडी या शब्दाच्या भोवताली सत्याग्रहाचं लोण पसरलं. ते अक्षरश: त्रिखंडात गाजलं. परंतु संदर्भ बदलले तसा या शब्दाचा प्रयोग बदलला. मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर ब्रिटिशांनी कर लादला आणि भारतीय मीठ उत्पादन बेकायदा ठरवलं, त्याविरोधात महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा काढली. ज्या शब्दापायी एकेकाळी ब्रिटिश सत्ता हादरली, त्या शब्दानं याच ब्रिटिशांनी दिलेल्या क्रिकेटच्या परिभाषेत एव्हाना शिरकाव केलाय. अगदी कालपरवा मुख्यमंत्री चषक क्रिकेटस्पर्धेच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या राजकीय षटकारांच्या आतषबाजीनं त्याचाच तर पुरावा दिला. विरोधकांची दांडी उडवण्याची भाषा त्यांनी केली. काळाच्या प्रवाहात दांडी क्रिकेटच्या विकेटची झाली, पण खोलात जाऊन पाहिलं तर दांडीला असलेला यात्रेचा ऐतिहासिक संदर्भ आजही गैरलागू झालेला नाही. जगाला अहिंसा आणि सत्याग्रहाचं अमोघ शस्त्र बहाल केलं ते महात्मा गांधीजींनी! पण त्यांची कृती आचरणात आणणं अवघड आणि गैरसोयीचं असल्यानं आपण मोहनदास करमचंद गांधी नावाच्या त्या महात्म्याला तसबिरीत टांगून ठेवलं. सुदैवानं त्यांची एक ऐतिहासिक कृती तसबिरीच्या चौकटीतून बाहेर पडली आहे. दांडीयात्रेचा इतिहास जागा झाला आहे. हे आपोआप घडलेलं नाही. त्याला कारणीभूत असलेल्या माणसाची नाळ थेट गांधीजींच्या विचारांशी, कृतींशी जुळलेली आहे.
मुंबई आयआयटीच्या डिझाइन सेलचे माजी प्रमुख प्रा. कीर्ती त्रिवेदी यांनी त्या पदावर असताना एक ध्यास घेतला. दांडीयात्रा अर्थात मिठाच्या सत्याग्रहाचा इतिहास त्यांना वर्तमानात जागवायचा होता. हा इतिहास ते जणू वारसाहक्कानं जगले आहेत. त्यांचे वडील काशिनाथजी त्रिवेदी हे महात्मा गांधींचे सहकारी. शिक्षणतज्ज्ञ आणि बापूंच्या वर्ध्यातील महिलाश्रमातले शिक्षक. हा वारसा लाभलेल्या त्रिवेदींच्या मनात मिठाच्या सत्याग्रहाचं स्मारक कैक वर्षं घोळत होतं. त्यासाठी त्यांनी तो इतिहास खणून काढला. नोंदी मिळवल्या. तपशील गोळा केला. त्यातून साकारलेला स्मृतिचित्रांचा पट कागदावर उतरवला. स्मारकाच्या उभारणीची पटकथाच जणू त्यातून अवतरली. तिला सगुणसाकार रूप देणं एकट्या-दुकट्याच्या आवाक्याबाहेरचं लक्ष्य होतं. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.

संपुआ सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना ही कल्पना स्वीकारली गेली. तिथून साडेपाच वर्षांपूर्वी एका भव्य स्मारकाच्या स्वप्नाचा प्रवास सुरू झाला. उच्च स्तरीय दांडीस्मारक समिती स्थापन झाली. प्रकल्पाचं सुकाणू प्रा. त्रिवेंदींमुळे मुंबई आयआयटीच्या हाती आलं. मग शोध सुरू झाला, तोही कल्पना वास्तवात आणू शकणाऱ्या हातांचा. राष्ट्रीय स्तरावर वास्तुविशारदांची स्पर्धा घेतली गेली. त्यातूनच हा शोध येऊन थांबला, तो संदीप शिक्रे नावाच्या मुंबईतल्या आर्किटेक्टपाशी. याचा जन्मच मुळी गांधी-नेहरूंच्या निर्वाणानंतरचा. कसबी हातांना असलेले निर्मितीचे डोहाळे, संवेदनशील मन आणि नावावर जमा असलेली उत्तमोत्तम कामं हेच काय ते भांडवल. मात्र स्मारकासाठी त्याच्या एसएसए या फर्मनं केलेली संकल्पना त्रिवेदींच्या कल्पनेशी मेळ खाणारी होती. त्यामुळे दांडीस्मारकाच्या निर्मितीचा विडा उचलला गेला. या कामाला मग दिल्लीपासून नवसारीपर्यंत अनेकांचे हात लागले. खेड्याकडे चला असं सांगणाऱ्या गांधीजींच्या या यात्रेच्या स्मारकाच्या सिव्हिल कामाची जबाबदारी पेललेली गणेश कॉर्पोरेशन ही कोणत्या मोठ्या शहरातील नसून नवसारीतलीच आहे.

अडचणी तर एकापेक्षा एक होत्या. स्मारकसमिती स्वतंत्र असली तरी काम सरकारी छत्रछायेत होणार होतं. कालापव्यय अटळ होता. आयआयटीची इन्फ्रास्ट्रक्चर प्लानिंग सर्व्हिसेस, आयआयटी डिझाइन सेल, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, सांस्कृतिक मंत्रालय अशा अनेक यंत्रणांची एकत्र मोट बांधली गेली. दांडीयात्रेची सांगता सैफी व्हिलासमोर गांधीजींच्या भाषणानं झाली होती. तिथली ६३ एकर जागा स्मारकासाठी मुक्रर केली गेली. मग भूसंपादन, त्या पाणथळ खार जमिनीवर स्मारक उभारणीचं आव्हान, गांधीजींच्या विचारांशी मेळ खाणाऱ्या संकल्पनेला आकार देण्याची कसोटी अशी अनेकानेक आव्हानं आ वासून उभी होती. तरीही स्मारकासाठीचा हा आधुनिक सत्याग्रह सुरू राहिला. यथावकाश प्रा. त्रिवेदी आयआयटीमधून निवृत्त झाले. त्यांचं स्वप्न पुढे नेण्याचं काम मग प्रा. चक्रवर्ती, राजा मोहंती, प्लानिंग सर्व्हिसेसमधील वेंकटरमणी, विश्वनादम, मिलिंद गोखले, किरण वाघ अशा अनेकांनी एकत्रितपणे पुढे नेलं. सौरऊर्जेतील तज्ज्ञ प्रा. वाझी यांनी त्यांच्या अनुभवातून संपूर्ण प्रकल्प फक्त सौरऊर्जेतूनच उजळून निघेल, हे पाहिलं. दुसरीकडे एसएसए या आर्किटेक्ट फर्ममधील पंकज पळशीकर, निराली दोशी, श्रेयल शाह आणि ऋतवृता रॉय ही तरुण टीम राबत होती. या दीर्घ आणि एरवी अस्थानी वाटेल अशा श्रेयनामावलीला स्मारकाच्याच पटकथेचा संदर्भ आहे. हे जे स्मारक उभं राहिलंय त्यात कोणीच अनाम नाही. गांधीजींच्या बरोबरीनं ज्यांनी दांडीयात्रा पूर्ण केली, त्या ८० सत्याग्रहींचे पुतळे आज त्यांच्या नावानिशी स्मारकाच्या आवारात उभे आहेत!

या साऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून संदीप शिक्रे यांनी साकारलेलं दांडीस्मारक हे काव्यमय वाटावं असं आहे. तो नुसता स्थितिशील इतिहास नाही. भारतीय स्वातंत्र्यासाठी मिठाच्या सत्याग्रहातून सुरू झालेल्या अपूर्व वाटचालीच्या गतीचा भास त्यात आहे. वर्तमानातील प्रगतीचं भान त्यात आहे. भविष्यातही कैक वर्षं टिकून राहण्याऱ्या शाश्वत मूल्यांचं प्रतिबिंब त्यात आहे. कल्याणचे ख्यातकीर्त शिल्पकार सदाशिव उपाख्य भाऊ साठे यांनी घडवलेला गांधीजींचा ब्रॉन्झमधील १६ फुटी पुतळा उचललेल्या पावलातून गतिशीलतेचीच तर साक्ष देतो. हा काही भाऊ साठे यांनी साकारलेला गांधीजींचा पहिला पुतळा नव्हे. दिल्लीपासून ओस्लोपर्यंत (नॉर्वे) अनेक ठिकाणी त्यांनी शिल्पातून साकारलेले बापू पहायला मिळतात. गांधीजींपुरतं सांगायचं, तर भाऊंच्या बाबतीत दिल्ली ते दांडी असं एक आवर्तन यानिमित्तानं पूर्ण झालंय.

 म्हटलं तर हे स्मारक लांबी-रुंदी-उंची असल्या भौमितिक कसोट्यांवर विक्रमी वगैरे नाही. परंतु त्या ऐतिहासिक मूळ घटनेतील रोमांच आणि यात्रेची संपूर्ण वाटचाल नवासरीत अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उलगडली आहे. मुदलात ही दांडीयात्राच किती अपूर्व होती... साबरमती ते सैफी व्हिला हा तब्बल ३८५ किलोमीटरचा पायी प्रवास. त्यातील मुक्कामांमध्ये २५ महत्त्वाचे थांबे; तिथली भाषणं, त्या सभांचे संदर्भ मोनोलिथवर कोरले आहेत. ८० सत्याग्रहींच्या पुतळ्यांमधून जाताना आपण जणू गांधीजींच्या दांडीयात्रेत सहभागी होतो. स्वागतकक्षापासून उंच नैसर्गिक शिळेवर उभ्या असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यापाशी नतमस्तक होऊन पुन्हा परत येण्याची आपली परिक्रमाच एक किलोमीटर होऊन जाते. पुतळ्याच्या परिसरात निर्माण केलेलं मानवनिर्मित तळं हा देखणा आविष्कार आहे.

गांधीजींच्या पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी आकाशाकडे झेपावणारी पोलादी त्रिकोणमिती तर खासच. भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेल्या, दोन्ही हात जोडून केलेल्या, नमस्काराचा भास त्यातून होतो. ती टोकं जुळतात, ती पुतळ्याच्या डोक्याच्या बरोबर मध्यभागी, पण १३२ फूट उंचावर... तिथे ठेवलेलं अडीच टन वजनाचं काचेतलं मिठाचं स्फटिक केवळ अद्भुत आहे. वास्तुशास्त्राची ही किमया दिवसा आणि रात्री वेगळे रंग दाखवते. इथल्या प्रकाशाचा प्रत्येक किरण सौरऊर्जेचा आहे; आणि स्वागतकक्ष, ग्रंथालय, अभ्यासिका या साऱ्या वास्तूंचा बाज गांधीजींच्या आश्रमासारखा आहे. या स्मारकाचं वर्णन शब्दांत करायचं तर महाभारतातील संजयसारखी दिव्यदृष्टी हवी. त्यापेक्षा फोर जीच्या धबगड्यातून थोडा वेळ काढून दांडीयात्रेत सहभागी होणंच अधिक श्रेयस्कर... खाल्ल्या मिठाला जागायचं तर एवढं कराच!

या स्मारकातून बाहेर पडायच्या आधीच्या शेवटच्या टप्प्यावर ‘मिठाचा खडा’ या दोन शब्दांचा आगळा अर्थ उमगतो. कारण तिथल्या एका संयत्रात समुद्राचं पाणी टाकून सात मिनिटांत आपल्यालाच मिठाचा खडा बनवता येतो. तो एका कुपीत बंद करून आपल्याला दिला जातो. आपणच बनवलेल्या मिठाचा खडा हीच इथल्या भेटीची अमूल्य स्मृती!

सत्यभामेला साखरेची उपमा देणाऱ्या त्या मुरलीधर श्रीकृष्णानं रुक्मिणीला मिठाचा खडा का म्हटलं याची दृष्टांतही हेच स्मारक देतं. सत्याग्रहाच्या त्या मिठाची चव कळली नाही, तर शाश्वताचं सारथ्य करणाऱ्या त्या महात्म्यानं आपल्याला मिळवून दिलेलं स्वातंत्र्यही अळणीच राहणार की!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link