Next
बदलते मनोरंजन
प्रतिनिधी
Friday, August 23 | 02:45 PM
15 0 0
Share this story

भारतातल्या मनोरंजनाच्या क्षेत्रात सध्या मोठे बदल होत आहेत. हे बदल खरे तर दूरचित्रवाणी अर्थात टीव्हीच्या आगमनानंतरच सुरू झाले होते, पण आता इंटरनेट व मोबाइलच्या आगमनानंतर मनोरंजनाचे क्षेत्र केवळ व्यापकच होत आहे असे नाही, तर ते आबालवृद्धांच्या हातात २४ तासांसाठी आले आहे. या बदलाची दखल घेऊन देशातल्या चित्रपटउद्योगालाही आपला पारंपरिक मार्ग सोडून नवे मार्ग स्वीकारावे लागले आहेत. भारतीय चित्रपटांतील तांत्रिक परिवतर्नाला बरीच आधी सुरुवात झाली असली तरी कथा, पटकथा, दिग्दर्शन या मूळ पायाभूत गोष्टीत परिवर्तन गेल्या चार-पाच वर्षांत आले आहे. नेहमीच्या प्रेमकथेच्या मसालापटांच्या पलीकडे जाऊन कथा, पटकथा व दिग्दर्शनाचा विचार आता होऊ लागला आहे. मल्टिप्लेक्सचा जमाना आल्यापासून चित्रपटांचे पडद्यावरील आयुष्य कमी झाले आहे. पूर्वी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहातच जावे लागत असे, त्यामुळे चित्रपट १०० आठवड्यांपर्यंतही चालत, पण चित्रपटांच्या फिती, सीडी आल्यानंतर घरीच चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या वाढली. आता तर हातातल्या मोबाइलवर चालताचालता अत्यंत कमी किमतीत चित्रपट पाहण्याची सोय झाली आहे. त्यामुळे चित्रपटगृहांत चित्रपट जेमतेम आठवडा-दोन आठवडेच चालतो. पूर्वी जुने चित्रपट मॅटिनी शोमध्ये चालत, ते मॅटिनी शो आता इतिहासजमा झालेत. आता जुना चित्रपट पाहायचा असेल तर स्मार्ट टीव्ही किवा मोबाइलवर पाहावा लागतो. या सर्व गोष्टींमुळे चित्रपटांची लांबी, त्याचे देखणेपण, खिळवून ठेवणारी कथा व अभिनय या गोष्टींना खूप महत्त्व आले आहे. चित्रपटांचे अर्थशास्त्रही त्यामुळे बदलून गेले आहे. आता चित्रपटांच्या रीळ काढण्याची पद्धत बंद झाली आहे, त्याऐवजी त्यांचे मल्टिप्लेक्समध्ये डिजिटल प्रक्षेपण केले जाते. रीळ नसल्यामुळे आता एकपडदा चित्रटगृहे बंद पडली आहेत. आता तर एका मोबाइल कंपनीने प्रचंड वेगाची ब्रॉडबँड सेवा सुरू करून नवे चित्रपट ब्रॉडबँडच्या माध्यमातून घरातल्या टीव्हीवर व मोबाइलवर दाखवण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे मल्टिप्लेक्स उद्योगापुढे मोठेच आव्हान उभे केले आहे. चित्रपटक्षेत्रात हे जे बदल येऊ घातले आहेत, त्याचा वेध घेण्यासाठी ‘झी मराठी दिशा’च्या या अंकात विभाग सादर करण्यात आला आहे. वाचकांना तो आवडेल अशी अपेक्षा आहे.
सरकारने नुकतीच संरक्षणदलासाठी एकात्मिक प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेमण्याची घोषणा केली आहे. सध्याच्या जगाच्या बदलत्या राजकीय व संघर्षमय परिस्थितीत अशा नेमणुकीचे काय महत्त्व आहे, हे वाचकांना समजावे यासाठी निवृत्त सेनानींचा खास लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. वाचकांना संरक्षणक्षेत्रातील नवनव्या घडमोडी व नवे संशोधन याची माहिती देण्याची ‘झी मराठी दिशा’ची परंपरा आहे, त्याला अनुसरून हा लेख आहे.
महाराष्ट्रात आलेला पूर आता ओसरू लागला असला तरी देशाच्या अन्य भागाला पुराचे संकट भेडसावू लागले आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याला आता वेग देणे आवश्यक आहे. या पुरात फार मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे, पण या मदतीचे व्यवस्थापन करणे हे एक मोठे आव्हान आहे, ते मदतयंत्रणा पेलतील अशी आशा आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link