Next
पीसीओडी- लक्षणे, कारणे आणि योगसामर्थ्य
वृंदा प्रभुतेंडुलकर
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

पीसीओडी (Polycystic Ovarian Disease) हा आजार विशेषत: १५ ते ४५ वयोगटातल्या स्त्रियांमध्ये खूप बळावू लागला आहे. मासिक पाळी सुरू झाल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीशरीराला आवश्यक असणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन या आजारात बिघडते. अंडाशयात द्रवाने भरलेल्या लहान लहान गाठी होतात, त्यामुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळा येतो. परिणामी गर्भाशयाचे कार्य मंदावून मासिक पाळी अनियमित होते. वर्षातून फक्त सात-आठ किंवा त्याहूनही कमी वेळा पाळी येते व त्यावेळी अतिस्राव होतो. गर्भधारणेला अडथळा, प्रसूती कठीण किंवा वेळेआधी होऊ शकते. स्त्रीबीजनिर्मिती पूर्णपणे थांबल्यास वंध्यत्व येते.
हार्मोंन्सचे संतुलन ढळल्याने डोकेदुखी, सलग झोप न लागणे, स्थूलपणा, अशक्तता, केस गळणे, त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर डाग, पुटकुळ्या अशी लक्षणे दिसतात. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सचा पुरेसा स्राव होत नाही, उलट अँड्रोजेन या हार्मोनचे प्रमाण भरमसाट वाढते आणि चेहऱ्यावर, शरीरावर केस उगवणे, आवाज घोगरा होणे, पुरुषांप्रमाणे टक्कल पडणे असे परिणाम होतात. शरीरातील या बदलांमुळे नैराश्य, उदासीनता येते. प्रोजेस्टेरॉनच्या अभावामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अन्नातील साखरेचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी स्वादुपिंड इन्शुलिनची निर्मिती करत असते. पीसीओडी या आजारात शरीरातील पेशी इन्शुलिनचा वापर करू शकत नाहीत व मधुमेहाची शक्यता वाढते. रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
अशा या गंभीर आजाराचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र याने ग्रस्त स्त्रियांमध्ये काही समान लक्षणे दिसून आली आहेत. सत्तर टक्क्यांहून अधिक स्त्रियांमध्ये स्थूलपणा हा सामान्य घटक दिसतो. स्थूलपणामुळे शरीरांतर्गत दाह (inflammation) वाढतो, जो जास्त अँड्रोजेन स्रवण्याला कारणीभूत होतो. स्थूलपणामुळे मधुमेहाचा संभव वाढतो. यात शरीर इन्शुलिनचा पुरेसा वापर करत नाही म्हणून स्वादुपिंड अधिकाधिक इन्शुलिन निर्माण करत राहते. अतिरिक्त इन्शुलिनचा दुष्परिणाम म्हणून अंडाशय जास्त प्रमाणात अँड्रोजेन संप्रेरक स्रवू लागते, असे हे दुष्टचक्र आहे. मानसिक ताण, स्टेरॉइड किंवा तत्सम औषधांनीसुद्धा हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. पीसीओडी आनुवंशिक असल्याचे मानले जाते, कारण बऱ्याचदा आधीच्या पिढीतील स्त्रियांकडून पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होताना दिसते. यावर संशोधन चालू असून कोणते गुणसूत्र किंवा गुणसूत्रांचे संच याला कारणीभूत असतात हे अद्याप समजलेले नाही. मात्र सुरुवात कोणत्याही पिढीपासून होऊ शकते आणि नवीन पिढीत पीसीओडीचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसते आहे.
अशाप्रकारे हार्मोन्सचे संतुलन बिघडण्यामागे विविध घटक असू शकतात व नेमक्या कारणावर बोट ठेवता येत नाही, पण चुकीची जीवनशैली या आजाराला खतपाणी घालते याबाबत दुमत नाही. आजच्या आधुनिक स्त्रीची धकाधकीची दिनचर्या, मानसिक ताणतणाव, कौटुंबिक समस्या, नोकरी-व्यवसायातील आव्हाने यामुळे हार्मोन्सचे प्रमाण वरखाली होऊ शकते. व्यग्र दिनचर्येत खाण्याच्या वेळा पुढे मागे होतात. पूर्वीच्या सात्त्विक पारंपरिक आहाराची जागा फास्ट फूड, जंक फूड आणि शीतपेयांनी घेतली आहे. यातील कृत्रिम रंग, प्रिझर्वेटिव्ह, सॅकरिन इत्यादी हार्मोन्सवर विपरीत परिणाम घडवून आणतात. पूर्वीच्या मानाने आजकाल ऋतुचक्र चालू होण्याच्या वयातील मुलींची शारीरिक हालचाल खूप कमी प्रमाणात होते. त्यांचा दिवसाचा अधिकांश वेळ शाळेच्या, ट्युशनच्या वर्गात बसून किंवा घरी टीव्हीसमोर बसण्यात जातो. अभ्यासाचा तणाव, स्पर्धा यांचे दडपणही असते. त्यामुळे या वयातसुद्धा पीसीओडीचे बीज रोवले जाऊ शकते.
वरील सर्व बाबींबरोबरच योगाच्या दृष्टिकोनातून या समस्येकडे पाहताना आणखी कोणती कारणे दिसतात, योगशास्रानुसार स्त्रीची शरीररचना आणि त्यात विकृती निर्माण होण्याची कारणे आता पाहू.
नाभी हे ‘मणिपूर’ म्हणजेच सूर्यचक्राचे स्थान असून शरीरात उष्णता निर्माण करणारे मुख्य केंद्र आहे. स्त्रियांचे प्रजननअवयव ओटीपोटात नाभीच्या आसपास स्थित असतात, ज्यांचे कार्य नाभीस्थानी अति उष्णता निर्माण झाल्यास बिघडू शकते. आपल्या येथील उष्ण हवामानासाठी प्रतिकूल असलेले, पण आजकाल सर्वमान्य, जणू अपरिहार्यच झालेले पोशाख, विशेषत: जीन्स पँट आणि टाइट्स यांमुळे ओटीपोट गच्च जखडलेल्या स्थितीत राहते. जीन्सचे जाड कापड, टाइट्सचे कृत्रिम धाग्यांचे कापड ओटीपोटाच्या ठिकाणी अनावश्यक उष्णता वाढवते, ज्यामुळे मासिक पाळीच्या वेळी प्रमाणाबाहेर स्राव होतो.  असे वारंवार होत राहिल्यावर अतिस्राव रोखण्यासाठी शरीराची संरक्षणयंत्रणा पेशींचे आवरण जाड करू लागते व प्रजननसंस्थेत विकृती निर्माण होऊ लागते. जास्तीच्या उष्णतेमुळे अंतर्स्रावी ग्रंथींचे कार्य बिघडते, आणि याचा परिणाम हार्मोन्सच्या पातळीवर होतो. पूर्वी मासिक पाळीच्या कालावधीत विश्रांती घेतली जाई त्यामागे शास्त्रीय कारण आहे. हालचाल जेवढी जास्त तेवढी उष्णता जास्त वाढते. पण आज व्यावसायिक कंपन्या जाहिरातींमधून नेमके उलट चित्र दाखवतात. या काळात मुद्दाम धावणे, उड्या मारणे, वेड्यावाकड्या हालचाली करण्याचे दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत.
ग्रंथींना पुन्हा कार्यक्षम करून या आजारावर मात करण्याचे सामर्थ्य योगामध्ये नक्कीच आहे, कसे ते पुढील लेखात पाहू.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link