Next
उंच हिची ध्येयासक्ती...
स्मिता गुणे
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

ती आत्ता फक्त ३८ वर्षांची आहे आणि तिचा व्यवसायदेखील जेमतेम पाच-सात वर्षांचा आहे. तरी आज किमान २०० जण तिच्याबरोबर, तिच्यासाठी काम करत आहेत. ‘सुयक्षी इलेक्ट्रिकल्स’ या उद्योगाची स्वामिनी असलेली कल्पना देशमुख यांचा उद्योजिका होतानाचा प्रवास आश्चर्यचकित करून टाकणारा आहे. संगमनेरजवळचे निमोण हे अगदीच छोटेसे खेडेगाव. तिथले भास्करराव देशमुख यांची कन्या कल्पना ही तिथल्याच शाळेत शिकली. मनात सातत्याने स्वप्न होते की एखादी छान नोकरी करायला मिळावी. त्यासाठी तिने इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले. मात्र छोट्या गावांमध्ये शिक्षणाला न्याय देणाऱ्या नोकऱ्या मिळणे कठीण होते. अशातच कल्पनाचे लग्न झाले.
संगमनेरशेजारचे अकोले हे गाव आणखीनच छोटेसे. तिचे पती महेश देशमुख ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात होते. कल्पनालाही स्वतंत्रपणे काहीतरी करायचे होते. गावात चालेल असा व्यवसाय म्हणजे ब्युटी पार्लर ! कल्पनाने थेट औरंगाबादला जाऊन रीतसर प्रशिक्षण घेतले आणि त्याबरोबर फॅशन डिझायनिंगही शिकून घेतले. अकोल्यात पार्लर आणि ड्रेस डिझाईन करून देण्याचा कल्पनाचा व्यवसाय मस्त चालू लागला. पतीचा उद्योगही चांगला बहरला होता. त्यामुळे येत असलेल्या पैशाची गुंतवणूक करावी या विचाराने शिर्डी या तीर्थक्षेत्री चढ्या दराने जमीन विकत घेतली. काही काळातच जमीनींचे दर कोसळू लागले. प्रचंड मोठी रक्कम अडकून पडली. बँकेचे कर्ज काढून ठेवले होते. कल्पनाच्या मागे आता बँकेचा तगादा सुरू झाला होता. दीड कोटी रुपयांची देणेदारी दोघांच्याही तोंडचे पाणी पळवणारी होती. मग कल्पनाने महिलांच्या टूर आखण्याचा उद्योग सुरू केला. अशातच एकदा ती ट्रीप घेऊन नेपाळला गेली, १५० महिलांना घेऊन एका कंपनीची ट्रॅव्हल एजंट म्हणून कल्पना देशमुख चक्क नेपाळला निघाली. याच कंपनीच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये रिलायन्स कंपनीचे काही अधिकारी, प्रतिनिधी होते. नेपाळमध्ये कल्पना ज्या धडाडीने सगळ्या पर्यटकांचे व्यवस्थापन करत होती ते बघून या अधिकाऱ्यांनी तिची ओळख करून घेतली.
अकोल्यासारख्या छोट्या गावातल्या कल्पनाच्या क्षमतेची जाणीव या लोकांना झाली. शिवाय तिचे शिक्षण आपल्या क्षेत्राला अगदी पूरक असे आहे, असेही त्यांना वाटले. रिलायन्ससारख्या नामवंत कंपनीच्या मोबाईल टॉवर उभारणीसाठी काम करण्याची ऑफर दिली. नेपाळ टूरहून परतलेल्या कल्पनाच्या झोळीत कर्जफेडीची खूप मोठी संधी अलगदपणे पडली होती.  कल्पनाने अकोल्याला परतताच कामाची तयारी सुरू केली. जुन्या प्रतिनिधींना भेटून बोलून तिने सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. इतक्या तरुण वयात एक महिला या अवघड क्षेत्रात उडी घेते आहे तर तिला सहकार्य केलेच पाहिजे, या विचाराने समव्यवसायिक मार्गदर्शन करू लागले. कल्पनाला उभारी मिळाली.
कल्पनाच्या शब्दकोशात भीती हा शब्द नाहीच. जे होईल ते नक्की निस्तरता येईल हा ठाम विश्वास असतोच तिच्या मनात. त्यामुळे रिलायन्ससाठी संगमनेरला मोबाईल टॉवर उभा करण्याचे काम कल्पना देशमुखच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी सुरू केले. पाहता पाहता टॉवर उभा राहिला आणि त्याचबरोबर कल्पना देशमुख या उद्योगिनीचा उदय झाला. रिलायन्ससाठी काम करता करता तिने गरजू आणि कष्टाळू माणसे जोडायला सुरुवात केली. सरळ स्वभाव, थेट संवाद आणि चोख व्यवहार या गुणांमुळे तिच्याकडे कामगार आणि काम यांचा कधीच तोटा पडला नाही. तिची कामाची तडफ बघून तिला विश्वासाने सहकार्य मिळू लागले.
केवळ मोबाईल टॉवरच्या उभारणीपुरता उद्योग मर्यादित न ठेवता कल्पनाने MSEB ची कॉन्ट्रॅक्टर म्हणून तसेच सुपरवायझर म्हणून नोंदणी करून घेतली. अशा दोन्ही प्रकारे काम करणारी संपूर्ण महाराष्ट्रात बहुधा ती त्यावेळी एकमेवच असावी. प्रत्येक साईटवर स्वतः जाऊन काम करून घेणे हे कल्पनाने जोपासलेले तत्त्व आहे. त्यामुळे आजपर्यंत तिच्या कोणत्याही कामामध्ये गडबड, घोटाळा किंवा चुका होत नाहीत.
वयाच्या ३८व्या वर्षी कल्पना तिच्या लहान मुलाला सांभाळून महाराष्ट्रभर कामासाठी फिरत असते. २०० माणसे हाताखाली आहेत तिच्या. दोन वर्षातच बँकेचे कर्ज फेडले तिने. ती म्हणते, की तिला एक महिला म्हणून वाईट अनुभवांना कधीच सामोरे जावे लागले नाही कारण आपण चांगले असू तर जगही आपल्याशी चांगलेच वागते, यावर तिचं विश्वास आहे. महिलांनी भीतीची भावना मनातून काढून टाकली तर त्या खूप पुढे जाऊ शकतील, असे ती म्हणते. दिवसरात्र केवळ आपल्या उद्योगाच्या प्रगतीचाच विचार करणारी कल्पना भविष्यात स्वतःचा उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. सुमारे चार कोटींची वार्षिक उलाढाल असलेली कल्पना देशमुख हिची ‘सुयक्षी इलेक्ट्रिकल्स’ ही कंपनी रोज नवनवी क्षितीजे पादाक्रांत करत आहे!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link