Next
कवितेविषयीच्या कविता
- डॉ. नीलिमा गुंडी
Friday, August 30 | 03:30 PM
15 0 0
Share this story

कवी कविता का बरं लिहितात? त्यांना कविता कशी सुचते? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. काही कवींनी त्या प्रश्नांची उत्तरं कवितेतच दिली आहेत. कविवर्य केशवसुतांनी लिहिलंय-
गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही नसे थोडके!
कविता, गाणी यांच्यामुळे मनाला विरंगुळा मिळतो. कष्टकरी लोकही काम करताना गाणी म्हणतात.  पूर्वी महिला दळण दळताना ओव्या म्हणत. जात्यावर बसलं की ओवी सुचते, असं म्हणतात. कारण कामाची लय अंगात भिनली की शब्दही लयीत सुचू लागतात नि कविता तयार होते! खरं तर कविता कशी सुचते, हे काही कवींसाठीही कोडेच असते. बहिणाबाई चौधरी म्हणतात-
माझी माय सरसोती
मले शिकवते बोली
लेक बहिणाच्या मनी
किती गुपितं पेरली!
संजीवनी मराठे म्हणतात-
मी न कुणाला सांगायाची, कविता स्फुरते कशी
नि असं म्हणत म्हणत कविता कशी सुचते, हे कोडं त्या कवितेतच उलगडतात!
काही कवींना निसर्गाच्या सहवासात कविता स्फुरते. बा. भ. बोरकर लिहितात-
हिरवळ आणिक पाणी
तेथे स्फुरती मजला गाणी.
काही कवींचे संवेदनशील मन समाजातल्या सुखदुःखाशी समरस होते नि त्यातून वेगळ्या स्वरूपाची कविता जन्म घेते. कवी अनिल म्हणतात –
‘संवेदना साऱ्या जगाची, हृदयात आहे भरभरून’
तर शरच्चंद्र मुक्तिबोध म्हणतात-
कुणाच्या वेदना साठून साठून
उरात माझिया दाटून राहती?
अशा कविता आपल्याला इतरांशी मनानं जोडून देतात.
काही वेळा कवीच्या कल्पनाशक्तीमुळेही कविता जन्म घेते. सदानंद रेगे म्हणतात-
माझ्या अक्षरवेलीला
पाने पोपटपंखांची
फळेफुले लगडली
चंद्र सूर्य खगोलांची.
आहे ना मजा? तर मंगेश पाडगावकर म्हणतात-
प्रकाशाचे गाणे, अवसेच्या रात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री!
अशा कविता अनेकदा आपल्या मनात आनंद पेरत असतात!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link