Next
उपराजधानीतील संघटन
कल्याणी मोरोणे
Friday, October 04 | 01:00 PM
15 0 0
Share this story


नागपूरच्या दसरा किंवा विजयादशमीला पारंपरिक कारणांएवढेच सामाजिक-राजकीय कंगोरेही आहेत. देवीची आराधना आणि पारंपरिक लोकपद्धतींनी दसरा साजरा करण्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दरवर्षी होणारा मुख्य उत्सव आणि दीक्षाभूमीवरील धम्मचक्रप्रवर्तनाचा कार्यक्रम हे नागपूरच्या संस्कृतीचे आता अविभाज्य अंग झाले आहेत.
नागपूर-विदर्भात दसरा हा मोठाच सण मानला जातो. दसऱ्याच्या उत्सवाला आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून देण्याची परंपरा आजही पाळली जाते. विजयादशमीच्या सायंकाळी आप्तेष्टांच्या घरी जाऊन एकमेकांना सोने दिले जाते. पुण्या-मुंबईसारख्या भागात आता फारसा दिसत नसलेला हा प्रघात विदर्भात मात्र आवडीने पाळला जातो. बदलत्या काळात एकमेकांच्या घरी अनौपचारिकपणे जाण्या-येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशा वेळी घरोघरी जाऊन सोने देण्याचे, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याचे आणि मित्रमंडळीं, नातेवाईकांना भेटण्याचे महत्त्व दसऱ्याला अधोरेखित होते. मित्रमंडळींचे गट, संपूर्ण कुटुंब एकत्र सोने देण्यासाठी जाताना नागपूरसह विदर्भातील प्रत्येक शहरात आणि गावांमध्ये बघायला मिळते. उत्साहात नटून-थटून, नवे कपडे घालून सोने देण्यासाठी निघालेल्या नागरिकांनी वसाहती, सोसायट्या आणि रस्ते फुलून निघाल्याचे दृश्य विजयादशमीच्या सायंकाळी दरवर्षी दिसून येते.
विजयादशमीकडे नवरात्रींना जोडून किंवा नवरात्रौत्सवाची सांगता म्हणून बघितले जाते. नागपूरजवळील कोराडीची महालक्ष्मी, अमरावतीची अंबा आणि एकवीरादेवी, चंद्रपूरची महाकाली किंवा विदर्भाला जवळ असलेली माहुरची रेणुकादेवी यांसारख्या देवींच्या ठिकाणी नवरात्रींच्या काळात विशेष उत्साहाचे वातावरण असते. देवीच्या मंदिरांमध्ये होणारे उत्सव हे त्या शहर-गावांचे आस्थेचे विषय असतात आणि संपूर्ण शहराला कवेत घेऊन साजरे होतात. मागील काही वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सवांचे महत्त्व कमी होऊन सार्वजनिक नवरात्रौत्सवांची संख्या वाढली आहे. नवरात्रौत्सवानिमित्त घरोघरी होणारे धार्मिक कार्यक्रम, मंदिरे आणि सार्वजनिक उत्सवांना जोडून भरणाऱ्या लहान-मोठ्या जत्रा, गरब्याचा उत्साह असे अनेक पैलू या नवरात्रौत्सवाला लाभले आहेत. या सगळ्याचा परिपाक म्हणून नवरात्रीचा दहावा दिवस म्हणून दसरा साजरा केला जातो.
देशभरातील इतर ठिकाणांप्रमाणेच रावणदहनाचे कार्यक्रमही नागपूर-विदर्भात दसऱ्याच्या सायंकाळी आयोजित केले जातात. प्रत्येक शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात दसरा मैदान हा एक संस्कृतीचा वेगळा आयाम बघायला मिळतो. पूर्वी गावाच्या वेशीबाहेर असलेल्या मोकळ्या जागी लोक सीमोल्लंघनाला जात असत. गावांच्या सीमा विस्तारल्या तशा या सीमोल्लंघनाच्या जागांची मैदाने झाली आणि त्यांना दसरा मैदान म्हणून शहरांनी सामावून घेतले. अशा ठिकठिकाणच्या दसरा मैदानांवर आजही विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी लोक एकत्र येतात. काही ठिकाणी देवीच्या पालख्या या मैदानांवर विजयादशमीच्या दिवशी येतात. या दसरा मैदानांवर आखाडे किंवा शारीरिक शिक्षणसंस्थांची प्रात्यक्षिकेही दसऱ्याच्या निमित्ताने होत असतात. अमरावती येथे श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने अशी शारीरिक कवायतींची प्रात्यक्षिके दर दसऱ्याला केली जातात. अर्धशतकाहून जास्त काळापासून ही प्रथा सुरू आहे. नागपुरात कस्तुरचंद पार्क येथे शहरातील मुख्य रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यालाही मोठ्या संख्येने नागपूरकरांची उपस्थिती असते.
दसऱ्याच्या दिवशी सकाळी होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य विजयादशमीचा उत्सव आणि याच दिवशी सायंकाळी दीक्षाभूमी येथे धम्मचक्रप्रर्वतनासाठी होणारी बौद्धधर्मियांची गर्दी ही नागपूरची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. संघाचे विजयादशमीला देशभरात उत्सव होत असतात. पण, नागपुरात मुख्यालयात होणारा उत्सव हा प्रमुख उत्सव गणला जातो. सरसंघचालक या उत्सवात उपस्थित असतात आणि त्यांचे या दिवशी होणारे ‘उद्बोधन’ हे संघकार्याची भविष्याची दिशा, वर्तमान राजकीय-सामाजिक मुद्द्यांवरील संघाची भूमिका दर्शवणारे मानले जाते. गेल्या दशकभराच्या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशपातळीवर वेगळे परिमाण लाभले आहे. या विजयादशमीच्या उत्सवाला तोलामोलाच्या, राष्ट्रीय पातळीवरील उच्चपदस्थ व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून येऊ लागल्याने देशभरातील माध्यमांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे असते. संघविचाराच्या जवळ असणाऱ्या देशभरातील मान्यवरांना, चित्रपट अभिनेते, राजकीय आणि सामाजिक नेतृत्व, उद्योगपती, धार्मिक आणि आध्यात्मिक नेते तसेच खेळाडू यांना या उत्सवासाठी नागपुरात हजेरी लावतात. संपूर्ण नागपुरातील संघाच्या पूर्ण गणवेशातील काही हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक रेशीमबाग परिसरातील स्मृतीमंदिर परिसरातील उत्सवस्थानी एकत्र येतात.


विजयादशमीच्या सकाळी विविध रस्त्यांवरून जाणारे पूर्ण गणवेशातील संघाचे स्वयंसेवक हे चित्र नागपूरकरांच्या सवयीचे झाले आहे. त्याच दिवशी शहरातील रस्त्यांवर धम्मानुयायींची गर्दी झालेली असते. लक्ष्मीनगर परिसरातील दीक्षाभूमी येथे प्रचंड मोठा आणि आकर्षक स्तूप बांधला आहे. याच मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायांसह धम्मदीक्षा घेतली होती. विजयादशमीचा मुहूर्त साधत त्यांनी हिंदू धर्मातून बौद्ध धम्मात सीमोल्लंघन केले होते आणि त्यासाठी जाणीवपूर्वक नागभूमीची निवड केली होती. त्या ऐतिहासिक घटनेला नागपूर शहर दरवर्षी उजाळा देते. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दरवर्षी येथे धम्मचक्रप्रवर्तनदिन साजरा केला जातो. यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील दूरदूरच्या परिसरातून डॉ. आंबेडकर आणि बौद्ध धम्माचे अनुयायी नागपुरात येत असतात. दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर आणि आजूबाजूचे रस्ते या दोन दिवसांच्या काळात धम्मानुयायींनी फुलून जातात. गोर-गरीब, ग्रामीण भागातून, गाठोडी घेऊन लोक दीक्षाभूमीवर येतात. आबालवृद्ध, तरुण, स्त्री-पुरुष त्यांचे आराध्य असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतमबुद्धाच्या दर्शनासाठी येत असतात. बदलत्या काळात या उत्सवाला सामाजिक सेवेचे परिमाण लाभले आहे. गोरगरिबांना अन्नदानापासून स्वच्छता, वाचनसंस्कृती रुजवणे, प्रबोधन कार्यक्रम अशा असंख्य गोष्टी दीक्षाभूमीच्या साक्षीने घडत असतात. अनेक तरुण आणि सामाजिक संस्था या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. विजयादशमीच्या या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत असल्याने देशभरात या उत्सवाला बौद्धधर्मियांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान लाभले आहे.  
अशा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भांमुळे नागपुरातील विजयादशमीचे एक वेगळेपण जपले गेले आहे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link