Next
गॉसिप
प्रतिनिधी
Friday, April 12 | 01:00 PM
15 0 0
Share this story

शुभमंगल झाले!


‘दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले गुरुवारी (ता.११) विवाहबंधनात अडकले आहेत.  सखी आणि सुव्रतला सह्याद्रीच्या डोंगररांगा आवडतात. त्यामुळे याच सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या नेरळ येथील सगुणा बाग येथे या दोघांनी ‘डेस्टिनेशन वेडिंग’ केले. या दोघांना आपले लग्न खासगी ठेवायचे असल्याने या सोहळ्याला त्यांची मोजकी मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यात अमेय वाघ, आरती वडगबाळकर, सायली संजीव, पर्ण पेठे यांच्यासह सुनील बर्वेही सपत्नीक उपस्थित होते. लग्नातील काही फोटो त्यांच्या मित्रमंडळींनी इन्स्टाग्रामवर शेअर केले. काही दिवसांपूर्वी सखीने सोशल मीडियावर बॅचलर रिबनसोबत स्पिनस्टर्स पार्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सुव्रतने केळवणाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर बुधवारी त्यांच्या मित्रमंडळींनी सुव्रतच्या फोटोला नवरा व सखीच्या फोटोला नवरी असे टॅग केले होते. दरम्यान, लग्नानंतर काही दिवसांनी सखी आपला उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी परदेशी जाणार आहे. या नवदांपत्याला शुभेच्छा!
..............................

‘साहो’साठी प्रभासची मेहनत!


‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ’बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे लोकप्रियतेचे शिखर गाठलेला प्रभास सध्या ‘साहो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रभास चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे. या चित्रपटात तो अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. दिग्दर्शक सुजितही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष देत आहेत. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. 'साहो'च्या अ‍ॅक्शनसाठी, हॉलिवूडमधील
५० लोकांची एक टीम भारतात आलेली आहे जी प्रभासला वेगळ्या अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षित करणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या
५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. या ५० लोकांची टीम प्रत्येक लहान लहान हालचालीपासून प्रत्येक फ्रेमबद्दल प्रभासला ट्रेनिंग देणार आहेत. ज्यामुळे अ‍ॅक्शन सीन अधिक प्रभावी होईल. ‘साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
..............................

उत्सुकता थलायवाच्या ‘दरबार’ची!


रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. लाइका प्रॉडक्शनने रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि नाव जाहीर केले. या चित्रपटाचे नाव आहे, ‘दरबार.’ आधी हा चित्रपट ‘थलाइवा १६७’ या नावाने प्रदर्शित होणार होता परंतु नंतर हे नाव बदलून ‘दरबार’ असे करण्यात आले. ‘दरबार’मध्ये रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘आप यह फैसला ले सकते हैं कि मैं आपके साथ अच्छा रहूँ, बुरा रहूँ, या बहुत खराब रहूँ’ असे या पोस्टरवर लिहिले आहे. या चित्रपटातही रजनीकांत यांचे ‘फाडू’ डायलॉग्स ऐकायला मिळणार आहेत. ए. आर. मुरूगदास दिग्दर्शित हा चित्रपट २०२० मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
..............................

भरत आणि ‘स्टेपनी’


विनोद म्हटलं की भरत जाधव आणि भरत जाधव म्हटलं की विनोद, असं जणू समीकरणच तयार झालं आहे. भरत आता ‘स्टेपनी’ या विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  चित्रपटाच्या नावावरून तो अतरंगी वाटत आहे, त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना काही वेगळं पाहायला मिळेल हे नक्की. आता कोणती ‘स्टेपनी’, कोणाची ‘स्टेपनी’,  अशा सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.  भरत जाधवनं यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांत विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.  बऱ्याच दिवसांनी भरत जाधव चित्रपटातून दिसणार असल्यामुळे धमालमस्ती तर होणार हे नक्की. या चित्रपटची निर्मिती श्रीगणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी केली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन अजीज नासीर यांनी केलं असून छायांकन मुरली कृष्णा यांनी केलं आहे.
..............................

उत्सुकता ‘६६ सदाशिव’ची!


‘झी मराठी’वरील ‘ग्रहण’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या योगश देशपांडे दिग्दर्शित  ‘६६ सदाशिव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील कलाकारांबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून त्यावर मोहन जोशी यांचा फोटो आहे. मोहन जोशी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  आता लवकरच इतर कलाकारांचीही नावंही समोर येतील. या चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकीज प्रा. लि.’ यांची असून हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर निर्माते आहेत. नरेंद्र भिडे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. जानेवारी महिन्यातच चित्रपटाचं चित्रीकरण संपलं. अर्थात अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही. तरी या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे, हे नक्की…
..............................

प्रिया बापटचे वेबसीरिजमध्ये पदार्पण


आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटांतून प्रियानं आपले अभिनयकौशल्य दाखवलं आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचं  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केलं. प्रिया आता हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या माध्यमातून प्रिया डिजिटल प्लॅटफॉर्मसुद्धा गाजवणार यात शंका नाही. नागेश कुकुनूर यांचं दिग्दर्शन असणाऱ्या  ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये प्रिया दिसणार आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या या वेबसीरिजमध्ये तिच्या  व्यक्तिरेखेचे विविध पैलू उलगडणार आहेत.
..............................

राजनंदिनी येतेय…


‘झी मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन वळणं येत आहेत. विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच नवीन घडामोडी पाहायला मिळाल्या. ईशाला विक्रांतचे सत्यदेखील कळले. विक्रांतच गजा पाटील आहे हे कळल्यावर ईशाला खूप मोठा धक्का बसला आहे. ईशाला या सगळ्यातून फक्त राजनंदिनीच मार्ग दाखवू शकते. राजनंदिनीची मालिकेत एण्ट्री कधी होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
आता लवकरच या मालिकेत राजनंदिनीची एण्ट्री होणार आहे. राजनंदिनीची भूमिका शिल्पा तुळसकर साकारणार आहे. शिल्पासोबत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील झाली आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेच्या शीर्षकगीतात शिल्पाची झलक पाहायला मिळते. परंतु आता राजनंदिनीचं रहस्य काय आहे, तिच्यासोबत काय घडलंय, बंद खोलीचं काय रहस्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी प्रेक्षकांना थोडीच वाट पाहावी लागणार आहे. मालिकेबद्दल शिल्पा म्हणाली, “आतापर्यंत प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप प्रेम केलं. आता मी लवकरच राजनंदिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना मालिकेत दिसेन. त्यामुळे विक्रांतचं सत्य, विक्रांत आणि राजनंदिनीची केमिस्ट्री आणि पुढील कथेचा उलगडा कसा होतो हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा, तुला पाहते रे मालिका. फक्त ‘झी मराठी’वर!’
..............................

‘साजणा’च्या शीर्षकगीताची प्रेक्षकांवर भुरळ


‘झी युवा’ वाहिनीवरून येत्या सोमवारपासून (ता.१५) ‘साजणा’ ही नवीन मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेचा टीझर आणि शीर्षकगीत प्रसारित झाले असून हे गीत प्रेक्षकांना खूपच आवडले आहे.  किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांचे शब्द असून   प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर यांनी हे गीत गायले आहे, तर अभिजित-विश्वजित या प्रसिद्ध जोडीने संगीतबद्ध केले आहे. अशा सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आल्याने, हे गीत प्रेक्षकांना खूपच पसंत पडते आहे. ‘साजणा’ ही गावातील श्रीमंत घरातील मुलगा आणि एका गरीब घरातील मुलगी यांची प्रेमकथा आहे. शीर्षकगीताप्रमाणेच मालिकादेखील लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल अशी खात्री आहे. या शीर्षकगीताविषयी बोलताना, गायक स्वप्निल बांदोडकर म्हणाले,‘एक अत्यंत सहजसुंदर असं हे गीत असून मनाला भावतं. मालिकेचं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं ‘झी युवा’नं सांगितल्यावर मलाही आनंद झाला. आता मला प्रेक्षकांच्या अभिप्रायाची उत्सुकता आहे.’ तेव्हा बघायला विसरू नका  ‘साजणा’ मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता, ‘झी युवा’ वाहिनीवर! 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link