Next
क्रिकेटच्या रंगमंचावर रिषभ पंत, पृथ्वीचा शो
नितीन मुजुमदार
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story

पृथ्वी शॉला गेल्या वर्षी स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात सर्वप्रथम पाहिले. नंतर एमसीएच्या ५००व्या रणजी सामन्याच्या दिमाखदार सोहळ्यातही भेटलो. प्रत्येक वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ध्येयाचा अबोल पाठलाग करणारी त्याची देहबोली. पृथ्वीचे क्रिकेट संघातील कोच प्रशांत शेट्टीदेखील हेच म्हणतात, ‘त्याला त्याचे ध्येय पूर्णपणे ठाऊक आहे’. पृथ्वी शॉ, रिषभ पंत ही १८-२० वर्षे वय असणाऱ्यांची पिढी आता क्रिकेटमध्ये अवतीर्ण झाली आहे. सुनील गावसकर यांचा कालखंड हा प्रामुख्याने कसोटी क्रिकेटचा, सचिनची कारकीर्द ही मूलतः कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटवर भर देणारी, तर आता विराट आणि पाठोपाठ पृथ्वी व रिषभ यांची कारकीर्द ही कसोटी, एक दिवसीय व टी-२० अशा तीनही फॉरमॅटवर केंद्रित अशी आहे. त्या त्या खेळाडूच्या वेळी जागतिक क्रिकेटचे स्वरूप ज्या फॉरमॅटवर भर देणारे होते त्या फॉरमॅटच्या भोवती त्या त्या काळातील खेळाडूंची कारकीर्द केंद्रित झाली, असे यावरून दिसते. आता तीनही फॉरमॅटमध्ये आयसीसी जागतिक अजिंक्यपदासाठी रँकिंग घोषित करते किंवा प्रत्यक्ष स्पर्धा आयोजित होते. आजच्या पिढीसाठी खराखुरा जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचे असेल तर तीनही फॉरमॅट्समध्ये प्रावीण्य मिळवणे फार गरजेचे आहे. शॉ व पंत यांच्यासारख्या युवा खेळाडूंचा खेळ आक्रमक आहे. या फलंदाजांना बचाव फार प्रमाणात वापरावा लागत नाही, तो त्यांचा पिंड आहे असे वाटतही नाही. यांच्या मनात गोलंदाजांबाबत अवाजवी भीती नाही व त्यामुळे ते कधी गोलंदाजाला विनाकारण डोक्यावर घेऊन बसलेले आढळत नाहीत. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर, वेगवेगळ्या वातावरणात आणि भिन्न दर्जाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत खेळले जाते, त्यामुळे नव्या पिढीच्या या खेळाडूंना अजून बऱ्याच परीक्षा पास व्हायचे आहे, हे निश्चित. मात्र ज्या पद्धतीने त्यांची आजवरची कारकीर्द घडली आहे ती पद्धत आणि त्यांची वये विचारात घेतली तर त्यांची मजल खूप आश्वासक आहे. गुडलेंग्थ बॉल ही टर्म गोलंदाजीच्या तंत्राचे ‘मॅन्युअल’ नव्हे तर माझे फूटवर्क व टायमिंग ठरवेल असा विचार करणारी ही पिढी आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात सर्वप्रथम बॅट हातात धरलेल्या या १८ ते २० वयोगटातल्या या खेळाडूंना विकेटवर नांगर टाकून रनरेट संथ ठेवणे फारसे माहीत नाही. आयपीएल सुरू झाले ते २००८ मध्ये. त्यावेळी पृथ्वीचे पूर्ण वय होते ८ तर रिषभ १० वर्षांचा होता. या दोघांचेही क्रिकेट याच सुमारास सुरू झाले. देशभर आयपीएलचे गारूड असताना या मंडळींनी फलंदाजीची बाराखडी गिरवली. त्यामुळे या वयोगटातील क्रिकेटपटूंवर आयपीएलचा प्रभाव खूपच आहे आणि ते साहजिकच आहे. आपापले फलंदाजीचे शॉट्स खेळताना केव्हा शॉट्स क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून मारायचे आणि केव्हा नाही, हे तंत्र नवीन पिढीच्या या फलंदाजांना घोटवावेच लागते. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये परदेशातील उसळत्या अथवा स्विंग गोलंदाजीला पोषक वातावरणात तुम्हाला तुमच्या तंत्रात आणि दृष्टिकोनात योग्य ते बदल करावे लागतातच आणि त्या दृष्टीने आगामी ऑस्ट्रेलियादौऱ्यात पृथ्वी आणि रिषभचा कस लागेल. पृथ्वी आणि रिषभ भविष्यकाळातही यशस्वी होण्याची शक्यता मला वाटते, कारण ते चेंडूच्या मेरीटला किंमत देताना दिसतात, गोलंदाजाच्या नावाला नाही! त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचे मानसिक ओझे बाळगून ते खेळत नाहीत आणि याचा निश्चित फायदा त्यांना मिळतो.

पृथ्वी नेहमीच्या मुंबई स्कूल ऑफ क्रिकेटचा अजिबात वाटत नाही, तो मुंबई स्कूल ऑफ मॉडर्न क्रिकेटचा विद्यार्थी वाटतो. सध्या फलंदाजाला केवळ Vमध्ये (व्ही) नव्हे, तर O मध्येही (ओ) खेळायला शिकवले जात असेल! अर्थात Oमध्ये खेळण्याआधी Vचा पाया भक्कम असणे चांगलेच! पृथ्वीबद्दल त्याचे एमआयजी क्रिकेट क्लबमधील कोच प्रशांत शेट्टी खूप सकारात्मक आहेत. “पृथ्वीला त्याचे लक्ष्य पूर्णपणे ठाऊक आहे.” वयाच्या चौथ्या वर्षी त्याने आई गमावली. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्याच्या वडिलांनी, पंकज शॉ यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. मुलाच्या क्रिकेट करिअरसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. पृथ्वी थोडा मस्तीखोरदेखील आहे. त्याला चायनीज पदार्थ खूप आवडतात. त्याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, “अमुक एवढा स्कोअर केलास, की तुला तुझ्या आवडत्या चायनीज पदार्थाची पार्टी देईन” असे आश्वासन त्याचे बाबा त्याला द्यायचे. त्यानंतर ध्येय गाठले की मैदानावरून छोटा पृथ्वी वडिलांना बक्षीस निश्चित म्हणून खुणावत असे! रिषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला स्कोअरिंग शॉट षटकार होता. नंतर पुन्हा जेव्हा विंडीजविरुद्ध स्वारी ९२वर पोहोचली तेव्हा पुन्हा षटकार मारताना तो बाद झाला. त्याचा माईंड सेट बघा, ९२वरून ओव्हरहेड शॉट मारताना तो बिलकूल बिचकला नाही. त्यानंतरच्याच कसोटीत आणखी एक नर्व्हस ९० ची नोंद त्याच्या नावावर झाली. त्यानंतर आपल्या तिसऱ्या कसोटी डावात इंग्लंडविरुद्ध रिषभने २९ बॉलमध्ये एकही धाव घेतली नाही. अर्थात आक्रमण की बचाव हा गोंधळ त्याच्या बाबतीत फार वेळा होईल असे वाटत नाही. त्याचेही वय खूप लहान आहे. काळाच्या ओघात अनेक बारकावे या जोडीला शिकायला मिळतील. आशियाबाहेर क्रिकेट खेळताना मिळणारा अनुभव एक परिपूर्ण खेळाडू होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.

 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link