Next
फेसबुकचे नवे ‘चलन’
अमृता दुर्वे
Friday, June 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story


फेसबुक म्हटलं की आतापर्यंत आपल्याला मित्र वाटायचा. परंतु आता काही दिवसांमध्येच तो आपले व्यवहारही पूर्ण करायला मदत करणार आहे. फेसबुक लवकरच स्वतःची ‘क्रिप्टो करन्सी’ घेऊन येत आहे. फेसबुकच्या या क्रिप्टो करन्सीचं नाव असणार आहे- लिब्रा.
जगातल्या ज्या लोकांकडे बँकखातं नाही, त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे पैसे पाठवणं कठीण जातं. त्यांच्यासाठी ही नवी संकल्पना असल्याचं फेसबुकनं म्हटलंय.
एकप्रकारे फेसबुकनं नवीन जागतिक चलन आणण्याचाच जणू प्रयत्न सुरू केलाय. फेसबुकसह जगभरातल्या अनेक नामांकित कंपन्या या क्रिप्टो करन्सी प्रोजेक्टमध्ये सामील झालेल्या आहेत. यामध्ये पेपॅल, व्हिसा, मास्टरकार्ड, उबर, स्पॉटिफाय, लिफ्ट अशा विविध क्षेत्रांतील २८ कंपन्या सहभागी आहेत. हा केवळ आपला प्रोजेक्ट नसून जगभरातल्या कंपन्या यामध्ये सामील असल्याचं फेसबुककडून वारंवार सांगण्यात येतंय. आपल्याला यामध्ये इतर भागीदारांइतकंच महत्त्वं असल्याचं फेसबुकनं जरी म्हटलं असलं तरी मार्क झुकरबर्गच्याच कंपनीनं हा प्रकल्प जन्माला घातला आणि विकसित केलाय, हे सत्य आहे.
जगातल्या काही मुख्य चलनांशी या लिब्राचा थेट संबंध असेल आणि याचं मूल्य साधारणपणे एका अमेरिकन डॉलरइतकं असेल. ज्यांच्याकडे बँकखातं नाही, त्यांनाही अगदी चॅट केल्याप्रमाणे व्यवहार करता येतील, असं सांगितलं जातंय.
म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या डॉलर्स, पाऊंड, युरो किंवा इतर चलनाच्या मोबदल्यात तुम्हाला हे ‘लिब्रा’ चलन घेता येईल. इतर जागतिक चलनाला असतो, तसाच विनिमय दर (एक्स्चेंज रेट) यासाठीही असेल. तुम्ही हे लिब्रा चलन परत केलं, तर तुम्हाला त्या मूल्याचे तुम्हाला हव्या त्या देशाच्या चलनातले पैसे मिळतील. म्हणजे हे एक असं चलन असेल, ज्याला भौगोलिक बंधनं नसतील.
फेसबुकच्या इतर संकल्पनांसारखीच ही संकल्पनाही ‘जगाच्या कल्याणासाठी’ असल्याचं सांगण्यात येतंय. (फेसबुकनं इंटरनेट.ऑर्ग ही संकल्पनाही हेच कारण देत आणली होती.) यामध्ये व्यवहार करण्यासाठी फी आकारली नाही, तर भरमसाठ व्यवहार किंवा स्पॅमिंग होऊन सिस्टीम ब्लॉक होण्याची शक्यता असल्यानं यासाठी माफक फी आकारणार असल्याचं फेसबुकनं म्हटलंय. मग यातून या प्रकल्पामध्ये सामील झालेल्या कंपन्यांना काय मिळणार?
विकसनशील देशांमध्ये फेसबुकचे लाखो युजर्स आहेत. परंतु या सगळ्यांकडून जाहिरातींमधून फायदा मिळतोच असं नाही. अशा सगळ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पैसे पाठवयाला सुरुवात केली, तर ते स्वतःचं स्थानिक चलन वापरून त्या बदल्यात ही क्रिप्टो करन्सी घेतील. परिणामी फेसबुक आणि इतर कंपन्यांना हे जागतिक चलन आणि त्याच्या विनिमय दराचा फायदा मिळेल. परंतु, याचा परिणाम ज्या देशांची अर्थव्यवस्था आधीच धोक्यात आहे, त्यांच्यावर कसा होईल, याचा महागाईवर काय परिणाम होईल, शिवाय यातून काही गैरव्यवहार (मनी लॉंडरिंग) होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या क्रिप्टो करन्सीचा बँकिंग व्यवस्थेवर होणारा परिणामही अभ्यासावा लागेल.
शिवाय डेटा सिक्युरिटी आणि फेसबुक हे नातं आजवर फारसं विश्वासार्ह राहिलेलं नाही. पैशांच्या व्यवहाराबाबत फेसबुकवर किती विश्वास ठेवावा, याविषयीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. ‘आमच्यावर नाही पण पेपॅल, व्हिसा आणि इतर कंपन्यांवर विश्वास ठेवा’, असं फेसबुकचं म्हणणं आहे.
एकंदर सुरक्षितता तपासल्याशिवाय ही सुविधा सुरू करू नये, अशी विनंती आता फेसबुकला करण्यात येतेय. शिवाय एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं किंवा काही कॉर्पोरेट कंपन्यांचं नियंत्रण असणारं जागतिक चलन वापरणे खरोखरच सुकर आणि व्यवहार्य आहे का, त्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहे का, यावरही आता चर्चा सुरू झालीय. कारण पैशांविषयीची धोरणं ठरवणाऱ्या बँकांवर सरकारचं नियंत्रण असतं. यावर कोणाचं नियंत्रण असेल? तूर्तास तरी हे सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
फेसबुकनंही लिब्रा प्रोजेक्ट जाहीर केला असला, तरी तो नेमका प्रत्यक्षात कधी येईल हे स्पष्ट सांगितलेलं नाही. परंतु ही क्रिप्टो करन्सी बिटकॉईनपेक्षा वेगळी असेल, हे नक्की. आणि ती अस्तित्वात आल्यास तिचा परिणाम जगभरातल्या सगळ्याच चलनांवर होणार हेदेखील नक्की. n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link