Next
कोल्हापूरचा शाही दसरा
प्रताप नाईक
Friday, October 04 | 01:00 PM
15 0 0
Share this story


कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला जवळपास तीनशे वर्षांची परंपरा आहे. छत्रपती शाहूमहाराज यांच्या काळात खऱ्या अर्थाने दसराउत्सव नावारूपास आला. त्यानंतर छत्रपती राजाराममहाराज यांच्या काळात या उत्सवामध्ये मोठी भर घालण्यात आली. पण त्यापूर्वी १६८९ साली शिवपुत्र राजाराममहाराज यांनी पन्हाळा गडावर दुर्गादेवीचे पूजन करून नवरात्रोत्सवाला सुरुवात केल्याचे संदर्भ बा.सी. बेंद्रेलिखित राजारामचरित्रामध्ये आढळून येतात. खऱ्या अर्थाने तेव्हापासून कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला सुरुवात झाल्याचे इतिहासअभ्यासकांचे मत आहे.
संस्थानकालीन शाही दसरा हा पूर्वीचा चौफळ्याचा माळ या ठिकाणी व्हायचा. या माळरानाला चाफ्याचा माळ किंवा चौफळ्याचा माळ म्हटले जायचे. या माळावर कुस्त्यांचे जंगी मैदानही होते. नंतर चौफळ्याच्या माळाचे दसराचौक असे नामकरण करण्यात आले. याच दसराचौकामध्ये छत्रपती शाहूमहाराज यांच्या काळात शाही दसराउत्सव खऱ्या अर्थाने नावारूपाला आला.
पूर्वी जुना राजवाडा येथून शाही दसऱ्याच्या मिरवणुकीला सुरुवात व्हायची. मिरवणुकीच्या सुरुवातीला तोफखाना, त्या पाठीमागून जरी-पटक्याचा घोडा, लष्कर, पोलिसदल, घोडदळ, त्यामागे संरजाम, मुलकी व जंगलाकडील शिपाई, शिकारखान्यातील वाघ, चित्ते, नगारा लादलेले उंट व शोभिवंत अंबारी घेऊन झुलत चाललेले हत्ती असा लवाजामा असे. सुरुवातीला काही वर्षे राजाराममहाराज हे अंबारीत बसत, पुढे ते घोड्यावर स्वार होऊन दसऱ्याच्या शाही मिरवणुकीत सहभागी होऊ लागले. अशी ही शाही मिरवणूक दसराचौकात यायची. तिथे छत्रपतींना तोफेची सलामी दिली जायची. यानंतर छत्रपती आपट्याच्या पानांची पूजा करायचे व उपस्थित सर्व जण छत्रपतींना आपट्याची पाने द्यायचे. त्यांनतर जमलेले सारे जण एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायचे.
सध्या छत्रपती देवस्थान ट्रस्टमार्फत शाही दसरासोहळा साजरा केला जातो. शाही दसऱ्यासाठी निमंत्रितांसह मानकरी आणि नागरिकांना बसण्यासाठी आलिशान शामियाना उभारला जातो. सायंकाळी ऐतिहासिक दसराचौकात सुरुवातीला अंबाबाईदेवीची पालखी लवाजम्यासह येते, त्यापाठोपाठ श्रीभवानी आणि गुरुमहाराज यांच्या पालख्या दाखल होतात. या तिन्ही पालख्या दसराचौकात दाखल झाल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज आपल्या परिवारासोबत मेबॅक गाडीतून शाही मिरवणुकीने दाखल होतात. यावेळी बंदुकींच्या फैरी झाडून छत्रपती परिवाराला सलामी दिली जाते. हा शाही दसरा पाहण्यासाठी आलेले सर्व उभे राहून छत्रपतींना मानवंदना देतात. त्यानंतर चौकाच्या मधोमध उभारलेल्या शमीचे छत्रपतींच्या हस्ते पूजन केले जाते. त्यानंतर लगेच बंदुकीच्या फैरी उडवण्यात येतात. हा सोहळा संपन्न होताच छत्रपती ऐतिहासिक मेबॅक मोटारीत चढतात आणि रयतेकडून सोने स्वीकारतात. यावेळी रयतेच्या वतीनेदेखील छत्रपतींना सोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. मावळतीच्या सूर्यकिरणांच्या साक्षीने पार पडणारा हा शाही दसरासोहळा अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. त्यामुळेच देशातील म्हैसूर, ग्वाल्हेरप्रमाणेच कोल्हापुरातील ऐतिहासिक शाही दसराही प्रसिद्ध आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link