Next
यशाचे इंजिनियर
शोभा नाखरे
Friday, April 12 | 04:00 PM
15 0 0
Share this storyबँकेत नोकरी करणाऱ्या गजानन व अंजली साळवेकर दाम्पत्याची मानसी ही एकुलती एक मुलगी! लहानपणीच मानसीच्या संपूर्ण कर्णबधिरत्वावर शिक्कामोर्तब झाले! सभोवती काळाकुट्ट अंधार, उजेडाचा कवडसाही दिसत नव्हता, अशात दोन वर्षे मानसीने विशेष शाळेत प्रशिक्षण घेतले. थोडी भाषा आल्यावर पुण्यात भावे प्राथमिक शाळेत तिला घातले. तेथे पहिलीच्या सात तुकड्यांत मिळून मानसी प्रथम आली. शिवाय हस्ताक्षरातही तिने प्रथम क्रमांक मिळवला.
माध्यमिक शाळेत ती नूतन मराठी विद्यालयात (नूमवि) गेली. तेथे बापट, वष्ट या शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन घेऊन ती शिष्यवृत्तीपरीक्षा पास झाली. अंजलीताईचे वडील सराफआजोबा पुण्यात आले आणि मानसीच्या शिक्षणासाठी ते हिमालयासारखे उभे राहिले. त्यामुळेच नववीतही विनासवलत ९० टक्के गुण मिळवत मानसी यशस्वी झाली. अमेरिकेच्या ग्रॅहम बेल संस्थेच्या शिष्यवृत्तीस पात्र ठरली. कर्णबधिर मुलांच्या नाट्यस्पर्धेत, अभिनयाचे राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक, जलतरण व टेबलटेनिसच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, चित्रकला व टायपिंगची परीक्षाही उत्तीर्ण! दहावीच्या परीक्षेत ८४.२६ टक्के गुण मिळवत ती महाराष्ट्रात दिव्यांगांमध्ये दुसरी आली! अनेक दैनिकांत तिच्या यशाच्या बातम्या प्रसिध्द झाल्या.
यानंतर मात्र अडथळ्यांची शर्यत सुरू झाली. ११वी व १२वीत मित्रमैत्रिणीचा सहकार मिळाला नाही. प्राक्टिकलला शिक्षक, मुले तिला मदत करत नसत. बारावीच्या प्रात्यक्षिकासाठी तिने क्लास लावून प्रयोग केले. त्यावर शिक्षकांनी अपमान करायचेदेखील सोडले नाही. ‘अपंग मुलीला कसे शिकता येईल,’ असा प्रश्न केला.
अशा वेळी तिचे जायदेसर मदतीला धावले. बारावीतही ७५.६७ टक्के मिळवून महाराष्ट्रात अपंगांत ती दुसरी आली. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग शाखेत सवलतीशिवाय प्रवेश मिळवला. इथेही सर्वांचा असहकार तिच्या वाट्याला आला. एका शिक्षकाने तर, “मानसीसारखी मुलगी इंजिनीयर होऊन काय उपयोग? साध्या सूचनाही कळत नाहीत!” असा तिचा अपमान केला. कॉलेजमध्ये एक दिवस, इलेक्ट्रिकल विभागाच्या फोटोशूटिंगसाठी विद्यार्थ्यांनी गणवेश घालायचा होता. तिला सूचना (अतितीव्र श्रवणऱ्हासामुळे) न कळल्याने तिला एकटीला वगळले गेले. “मला त्यावेळी प्रचंड मानसिक त्रास झाला,” मानसी कळवळून सांगत होती. आणखी एक प्रसंग- २० गुणांची घटक चाचणी होती. सर्वांनी बसण्यासाठी टेबल घेतले. हिला मात्र सूचना न समजल्याने तिने उभ्याने पेपर लिहिला.
फक्त चौथ्या वर्षाला एकीने तिला मदत केली. इंजिनीयरिंगच्या चौथ्या वर्षीचा प्रोजेक्ट महत्त्वाचा होता. ‘दोन मुलांनी एकत्र प्रोजेक्ट करायचा’ या शिक्षकांच्या सांगण्यावर, मानसीला कळायच्या आत प्रत्येकाने फोनवर आपापल्या जोड्या ठरवल्या. कोणीही मानसीबरोबर प्रोजेक्टसाठी तयार नव्हते. तिची आई विभागप्रमुखांना भेटली. “याबाबत मी काहीच करू शकत नाही, तिला एकटीने प्रोजेक्ट करावा लागेल,” असे उत्तर मिळाले. एकटीने प्रोजेक्ट करणे ही अवघड गोष्ट होती, मात्र तिने तेही केले. प्रोजेक्टच्या तिसऱ्या परीक्षेत बाह्यपरीक्षकांनी तिला अत्यंत कमी गुण दिले. याबाबत चौकशी करता “तुमचा प्रोजेक्ट उत्तम आहे, पण सादरीकरण कमी पडले आणि मानसीच्या अतितीव्र कर्णबधिरत्वाबद्दल बाह्यपरीक्षकांना सांगायचे राहून गेले. आता गुणात बदल होऊ शकणार नाही,” असे निर्विकार उत्तर मिळाले. यामुळे सरासरी गुणांवर परिणाम झाला, तरी मानसीने प्रथम वर्ग मिळवलाच!
तिसऱ्या वर्षी कॉलेजच्या आवारात आलेल्या ४-५ कंपन्यांच्या लेखी परीक्षांत मानसी पास झाली. नंतर मुलाखती होत्या. त्यावेळी त्यांना समजायचे, की हिला ऐकू येत नाही! “आजवर आम्ही अशा व्यक्तीला घेतलेले नाही. अशा व्यक्तीची जबाबदारी कंपनी घेऊ शकत नाही,” अशी नकारात्मक उत्तरे मिळत. पुढे ओळखीने L & T Infotech कंपनीत संधी मिळाली. तेव्हा तिच्या वडिलांनी कंपनी प्रतिनिधीला सांगितले, “हिला प्रशिक्षण द्यावे लागेल.” त्यावेळी, “तुम्ही काळजी करू नका, आम्ही हिच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कामाची योजना करू,” असे सांगितले गेले. आयुष्यातली पहिली संधी, म्हणून मानसी खूश! नवीन शिकायच्या उत्साहाने तिने नोकरी स्वीकारली. मात्र प्रत्यक्षात वेगळेच घडले. अनेकदा विनंती करूनही कोणतेही प्रशिक्षण नाही, वा वेगळे काम दिले गेले नाही. प्रोजेक्ट मानेजरकडे गेल्यावर ते म्हणत, “तुझ्याकडे बघायला आम्हाला वेळ नाही, तू काय पाहिजे ते कर.” सर्वजण एखाद्या प्रोजेक्टवर चर्चा करत तेव्हा, हिलाही वाटे आपणही सामील व्हावे आणि मदत करावी. मात्र ती एकटी पडे.
नंतर अमेरिकन इन्स्टिट्यूटची इन्शुरन्सची ऑनलाइन परीक्षा देऊन तिने उत्तम यश मिळवले. त्यानंतरही नोकरीची संधी मिळाली, मात्र तेथेही दुर्लक्षित राहिल्याने तिने नोकरी सोडली. संगीत कानावर पडत नसूनही तिने कथकच्या चार परीक्षा दिल्या. पहिल्या तीन परीक्षांमध्ये विशेष योग्यता, तर चौथ्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवली.
मानसी सध्या MIDC, पुणे येथे साहाय्यक अभियंता म्हणून क्लास टू पदावर काम करत आहे. विनीत झेंडे या कर्णबधिर युवकाशी चार वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला असून तो एका नामांकित बँकेत काम करतो. त्याने त्याच्या मित्रांसमवेत नुकताच ‘भीमाशंकर’ हा बोलका माहितीपट केला आहे.
तिच्या वाट्याला अनेकदा असहिष्णू वागणूक आलेली, तरी मानसीने यशाचे इंजिनीयरिंग आत्मसात केले. मानसीची यशोगाथा सांगताना एवढेच म्हणावेसे वाटते–

लहरोंसे डरकर कभी नौका पार नहीं होती
कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link