Next
लोकशाहीचे महत्त्व सांगणारा : ग्रेट डिक्टेटर
मिलिंद कोकजे
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story


जागतिक चित्रपटाचा इतिहास कितीही थोडक्यात लिहायचा म्हटला तरी त्यात एक नाव नक्कीच लिहावे लागेल, कारण त्याशिवाय तो इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. ते नाव म्हणजे चार्ली चॅप्लिन. एकाच वेळी एका बाजूने खेळकर, विनोदी अंगाने जाणारी आणि त्याचवेळी समाजातील एखाद्या गंभीर गोष्टीची प्रखर जाणीव करून देऊन डोळ्यांत पाणीही आणणारी त्याची स्वतःची एक खास हसू आणि आसू शैली होती. त्याच्या या शैलीचे प्रतिबिंब त्याच्या सर्वच चित्रपटांत दिसते. त्याच्या चित्रपटांची क्रमवारी लावायची म्हटली तर कठीणच काम आहे, कारण त्याचे बरेचसे चित्रपट पहिल्या क्रमांकासाठी गर्दी करतील. परंतु त्यातही माझ्या मते त्याच्या दोन चित्रपटांना तोड नाही, पहिला म्हणजे ‘ग्रेट डिक्टेटर’ आणि दुसरा म्हणजे ‘मॉर्डन टाइम्स.’
‘ग्रेट डिक्टेटर’ला पार्श्वभूमी आहे ती दुसऱ्या महायुद्धाची. ‘डिक्टेटर’ची हिटलरछाप मिशी, किंवा त्याच्या स्वस्तिकाजवळ जाणारे दोन फुल्यांचे चिन्ह, त्याच्या एस. एस. प्रमाणे झुंडशाही करणारे गणवेशधारी सैनिक. चित्रपट सुरू होतो तो पहिल्या महायुद्धापासून. त्यात सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरलेला एक ज्यू सैनिक एका जखमी वैमानिकाला मदत करतो. त्याच्याबरोबर छोट्या विमानातून जात असताना अपघात होतो. त्यात जखमी ज्यू सैनिकाची स्मरणशक्ती जाते. त्यानंतर तो २० वर्षांनी आपल्या मूळ गावी परत येतो. तो मूळचा न्हावी असल्याने गावात परतल्यावर ज्यूंच्या वस्तीत असलेले जुने सलून तो सुरू करतो. तोपर्यंत 6बाहेर परिस्थिती बिघडलेली असते. (या न्हाव्याला नाव नाही. चॅप्लिनच्या बहुतांश चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेला नाव नसते, ट्रॅम्प, भटक्या म्हणूनच तो ओळखला जातो.) एडोनॉईड हायन्केल नावाचा एक अत्यंत निर्दयी, जुलमी हुकूमशहा सत्तेत असतो. त्याच्या राज्यात ज्यू नागरिकांवर अनेक बंधने आलेली असतात. प्रत्येक ज्यू व्यक्तीला त्याच्या व्यवसायाच्या जागेच्या बाहेर मोठ्या अक्षरात ‘ज्यू’ असे रंगवून घ्यावे लागत असते. हायन्केलचे मोकाट सुटलेले पोलिस ज्यू नागरिकांचे सामान लुटत असतात. त्यांना विरोध केला तर त्यांना मारहाण करतात. याची काहीच कल्पना नसलेल्या त्या न्हाव्याच्या पोलिसांबरोबर अनेक गमतीशीर चकमकी होतात. त्या वरवर दिसायला गमतीशीर असल्या आणि बघताना हसायला येत असले तरी त्यातील भेदकता जाणवत रहाते. हेच नेमके चॅप्लिनचे वैशिष्ट्य आहे.
चित्रपटाची कथा जाणून घेण्यापेक्षा ती दृश्यस्वरूपात चॅप्लिनने कशी मांडली आहे ते प्रत्यक्षात बघणेच किंवा समजावून घेणे महत्त्वाचे आहे. तो ज्यू न्हावी आणि हुकूमशहा हायन्केल हे दोघे सारखेच दिसतात (चॅप्लिनचा डबल रोल आहे.) त्यामुळे शेवटी एका प्रसंगात तो ज्यू न्हावी सैनिकाचा गणवेश घालून काँन्सट्रेशन कॅम्पमधून पळून जाताना हायन्केलचे सैनिक त्या ज्यू न्हाव्यालाच हायन्केल समजतात. आणि त्याला मोठ्या सभेच्या ठिकाणी भाषण करण्यासाठी आणतात. तेथे सुरू होतो तो चित्रपटाचा कळसाध्याय. चॅप्लिनचे हे भाषण जगभर गाजलेले आहे. युद्ध, चिथावणीखोर भाषा, आवेशयुक्त हातवारे यांनी भरलेले हायन्केलचे भाषण ऐकण्याची सवय लागलेल्या लोकांना शांत आवाजात पण ठामपणे केलेले, आवेशपूर्ण नसलेले आणि शांती, आशा, मानवता, आनंद, बंधुता अशा वेगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करणारे हुकूमशाहीला विरोध करणारे आणि लोकशाहीला पाठिंबा देणारे भाषण ऐकायला मिळते.
तो भाषणाची सुरुवातच, ‘माफ करा पण मला हुकूमशहा, राजा व्हायचे नाही, मला कोणाला जिंकायचे नाही, कोणावर राज्य करायचे नाही, ते माझे काम नाही.’ अशी करतो. तो ज्यू न्हावी सलून चालवत असताना शेजारी राहणारी हॅना नावाची मुलगी व तो प्रेमात पडतात. परंतु त्या मुलीला आपल्या कुटुंबासोबत परांगदा व्हावे लागलेले असते. आपल्या भाषणातील शेवटच्या भागात तो हॅनाचे नाव घेऊन ती जिथे कुठे असेल तेथे ऐकत असेल तर तिला आशेचा संदेश देतो. रेडिओवरून हॅना त्याचा आवाज ऐकते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि आशेचा किरण पसरतो.
साडेतीन मिनिटांहून जास्त वेळ चालणारे हे भाषणाचे दृश्य चॅप्लिनने त्याच्या संयत अभिनयाने आणि त्या भाषणातील शब्दांनी व त्यातील मानवतेच्या संदेशाने अजरामर केले आहे. विनोदी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता इतका गंभीर अभिनय करू शकतो असे कोणी सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही. मुळात साडेतीन मिनिटांचे एका भाषणाचे दृश्य हेच चित्रपटाच्या तंत्राशी सुसंगत मानले जात नाही. तो संकेत झुगारून चॅप्लिनने खरेतर धोकाच पत्करला होता. परंतु त्याच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची ताकद बघितली की त्याला हा संकेत झुगारण्याचा आत्मविश्वास का वाटला असेल ते कळते.
सुरुवातीचे हुकूमशहाचे भाषण, जे काहीसे विनोदी अंगाने पुढे जाते, आणि शेवटचे ज्यू न्हाव्याचे भाषण, हे दोन्ही एकाच व्यक्तीने केलेली आहेत हे खरे वाटणार नाही इतका त्यातील अभिनयात फरक आहे. गंमत म्हणजे हुकूमशहा हायन्केल त्याचे भाषण त्याच्या देशातील भाषेत करतो, म्हणजे तो खरेतर कोणतीच भाषा वापरताना दाखवलेला नाही तर काही विचित्र उच्चारांचा समूह असे त्याच्या भाषेचे स्वरूप ठेवले आहे. तरीही त्याला काय म्हणायचे आहे ते प्रत्येक वाक्य कळते. ही दृश्याची आणि अभिनयाची ताकद आहे.


या दोन भाषणांप्रमाणेच चॅप्लिनने अजरामर केलेले दृश्य आहे ते रबरी फुग्याचा पृथ्वीगोल घेऊन त्याने केलेले एक वेगळ्याच प्रकारचे नृत्य. संपूर्ण पृथ्वी आपल्या तालावर नाचवण्याची हुकूमशहाची इच्छा त्यातून एक शब्दही न बोलता व्यक्त होते. चॅप्लिनने त्याच्या शैलीला अनुसरून अनेक विनोदी प्रसंग जागोजागी पेरले आहेत. हुकूमशहाचा एक साहाय्यक अनेक नव्या कल्पना घेऊन येतो आणि प्रत्येकवेळी त्या फसतात आणि विनोदनिर्मिती होते. आपल्या भाषणात हुकूमशहा देशाकरता काटकसर करायला सांगतो. इंग्रजीत त्याला टाइटनिंग दी बेल्ट, पट्टा घट्ट करणे म्हणतात. ते ऐकल्यावर तो स्वामिनिष्ठ नोकर सर्वांसमोर भरस्टेजवर आपला पट्टा घट्ट करतो आणि तो बसल्यावर लगेचच त्याचा पट्टा सुटतो. यात विनोदाव्यतिरीक्त तो हुकूमशहा भाषणात (आपल्या भाषेत) नेमके काय म्हणाला तेही दृश्यस्वरूपात कळते. शेजारच्या देशातील राजा रेल्वेने त्याला भेटायला येतो तेव्हा काही केल्या त्याचा डबा नेमका त्याच्या स्वागताकरता जमिनीवर अंथरलेल्या लाल कार्पेटपाशी थांबत नाही. डबा जेथे जाईल तेथे नोकर धावत धावत जाऊन कार्पेट ठेवतात तर परत डबा दुसरीकडे सरकतो.
अगदी ज्यू लोकवस्तीतील तंग वातावरणातही चॅप्लिनने आपल्या विनोदाची पखरण काही दृश्यांतून केली आहे. त्याच्या पोलिसांबरोबरच्या वादविवादात आणि मारामारीत तर विनोद आहेच, पण एका जोखमीच्या कामगिरीची जबाबदारी कोणी घ्यायची याकरता आजूबाजूचे ज्यू एकत्र भेटतात व पुडींग खायचे व ज्याच्या पुडींगमध्ये नाणे ठेवलेले सापडेल त्याने ती कामगिरी पार पाडायची असे ठरवतात. हॅनाने मात्र पुडींग बनवताना गुपचूप प्रत्येक पुडींगमध्ये नाणे ठेवलेले असते, इतक्या गंभीर दृश्यातही चॅप्लिनने विनोदनिर्मिती केली आहे. प्रत्येकाला नाणे सापडल्यावर ते हळूच त्या ज्यू न्हाव्ह्याच्या डिशमध्ये सरकवतात. तोही ती कामगिरी आपल्याकडे येऊ नये म्हणून ती सर्व नाणी गिळत जातो. परिणामी त्याला उचक्या येतात व प्रत्येक उचकीबरोबर पोटातील नाण्यांचा खणखणाट ऐकू येतो. अखेर सर्वांनी आपापाली नाणी गुपचूप त्याच्या डिशमध्ये ढकलल्याचे उघड होते. चित्रपटावर अपेक्षेप्रमाणे युरोपमधील अनेक देशांत जेथे हिटलरचे वर्चस्व होते वा त्याला सहानभूती होती तिथे बंदी आली.  या चित्रपटावर काम करायला चॅप्लिनने १९३८ साली सुरुवात केली. गंमत म्हणजे तोपर्यंत हिटलरची पूर्ण खरी ओळख जगाला झालेली नव्हती. आपल्या आत्मचरित्रात चॅप्लिनने लिहून ठेवले आहे की पुढे हिटलरने नेमके काय काय केले हे उघड झाले. ते आधी कळले असते तर हा चित्रपट मी बनवला नसता. तसे झाले असते तर लोक एका जागतिक दर्जाच्या क्लासिक चित्रपटाला आणि हुकूमशाहीत काय घडू शकते व लोकशाहीची का गरज आहे हे सांगणाऱ्या चित्रपटाला मुकले असते.

दी ग्रेट डिक्टेटर - १९४०
निर्माता, लेखन, दिग्दर्शन, संगीत – चार्ली चॅप्लिन
कलाकार : ज्यू न्हावी आणि हुकुमशहा हायन्केल - चार्ली चॅप्लीन, हॅना – पॉलैट गोदार्द
१९९७ साली अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेसने यूएस नॅशनल फिल्म रजिस्ट्रीमध्ये जतन करण्यासाठी निवडला होता.)     
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link