Next
चायना सिंड्रोम
मिलिंद कोकजे
Friday, April 12 | 03:45 PM
15 0 0
Share this story


अमेरिकेतील एखाद्या अणुभट्टीत अपघात झाला तर प्रचंड उष्णतेमुळे भट्टीचा मुख्य गाभा वितळून ते सर्व रेडिओअॅक्टिव मॅटर पृथ्वीतून आरपार जाऊन विरुद्ध बाजूला असलेल्या चीनमध्येही वाईट परिणाम घडवून आणतील, अशी एक कल्पना आहे. ही कल्पना ‘चायना सिंड्रोम’ या नावाने ओळखली जाते.
याच कल्पनेवर आधारित १९७९ साली याच नावाने एक चित्रपट आला. या चित्रपटाची आठवण झाली ती ‘ऑल दि प्रेसिडेंट्स मेन’मुळे. ‘चायना सिंड्रोम’ही काहीशी शोध पत्रकारितेवरीलच कथा, फक्त टेलिव्हिजन माध्यमातील आणि कल्पित प्रसंगावरची (किंवा खरोखरच असे काही घडले असून ते दाबून टाकले असेल तर कल्पना नाही). योगायोग म्हणजे १६ मार्च १९७९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी अमेरिकेत पेन्सिलव्हनिया राज्यातील डौफिन काऊंटीत थ्री माइल आयलंड येथील अणुभट्टीत तशाच प्रकारचा अपघात घडला.
चित्रपटात किम्बली वेल्स (जेन फोंडा) ही दूरचित्रवाणीची वार्ताहर आणि रिचर्ड अॅडम्स (मायकेल डग्लस) हा छायाचित्रणकार अणुभट्टीवर आधारित कार्यक्रमाच्या छायाचित्रणासाठी एका अणुभट्टीवर गेले होते.  तिथे अणुभट्टीत आणीबाणीचा प्रसंग निर्माण होतो… अणुभट्टीमधील पाण्याची पातळी अचानक खाली जाऊ लागते. त्यामुळे काही वेळाने भट्टीचे तापमान वाढून ते नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असते. तेथे कार्यरत असलेला नियंत्रक जॅक गॉडेल (जॅक लेमन) याने आवश्यक ती सर्व पावले उचलूनही काहीच उपयोग होत नाही. नियंत्रक हताश झाला असतानाच अचानक आपोआप पाण्याची पातळी परत वाढू लागते आणि मोठा अपघात टळतो. सर्वजण निःश्वास टाकतात. पातळी का व कशी कमी झाली याला उत्तर नसते, तसेच आपोआच कशी वाढली यालाही उत्तर नसते. परंतु हा एक खूप मोठा धोका आहे हे मात्र किम्बलीच्या लक्षात येते. व्यवस्थापनाने चित्रण करण्याकरता बंदी केल्यानंतरही रिचर्डने या प्रसंगाचे चोरून चित्रण केलेले असते.
परंतु याविषयावरची बातमी दाखवण्यासाठी किम्बलीचा वरीष्ठ असलेला अधिकारी नकार देतो. त्यामुळे वैतागलेला रिचर्ड ती टेप कार्यालयातून चोरतो आणि काही तज्ज्ञांना दाखवतो. चित्रण बघून ते तज्ज्ञ या निष्कर्षाप्रत येतात की परिस्थिती ‘चायना सिंड्रोम’च्या जवळ आली होती. थोडक्यात मोठा अपघात टळला.
तेथून मग किम्बली आणि रिचर्ड यांची शोधपत्रकारिता सुरू होते. ते जॅकला त्याच्या घरी गाठून परिस्थिती समजून घेतात. बंद असलेला प्लँट पूर्ण सुरक्षित नाही त्यामुळे तो लगेच सुरू नये असे जॅकचे म्हणणे असते. परंतु त्याचे वरिष्ठ त्याचे सांगणे ऐकत नाहीत आणि प्लँट सुरू करतात. अखेर एका सुरक्षारक्षकाची बंदूक घेऊन जॅक बळजबरीने नियंत्रणकक्षात प्रवेश मिळवून त्यावर ताबा मिळवतो. खरे काय घडत आहे ते लोकांना कळावे म्हणून नियंत्रणकक्षातूनच टीव्हीवर आपली मुलाखत दाखवण्यासाठी किम्बल व रिचर्डला तिथे बोलवण्याची मागणी करतो. त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्याकरता वेळ मिळावा म्हणून व्यवस्थापन त्याची मागणी मान्य करते. त्या दोघांना बोलावून कॅमेऱ्यासह नियंत्रणकक्षाच्या गॅलरीत प्रवेश दिला जातो. नियंत्रणकक्ष काचेने पूर्ण बंद असल्याने ते तेथून खालचे चित्रण सुरू करतात. जॅक फोनवरून बोलत त्यांच्याशी संवांद साधतो. जॅक त्यांच्याशी बोलत असतानाच सुरक्षारक्षकांचा एक गट त्यांच्या कॅमेऱ्याची केबल कापून चित्रण बंद पाडतो, त्याचवेळी नियंत्रणकक्षात प्रवेश करून जॅकला गोळी घालून ठार करतो. जॅकचे मानसिक संतुलन ढळल्याने, प्लँटला धोका निर्माण झाल्याने त्याला मारल्याचा खुलासा व्यवस्थापन करते. 


हा चित्रपट केवळ शोधपत्रकारितेवरचा नाही. तो अणुभट्ट्यांची सुरक्षा किंवा परमाणुऊर्जा या गंभीर विषयावरचा आहे. किंवा खरे तर तो त्याही पलिकडे जाऊन व्यवस्था आपल्या फायद्यासाठी सत्य कसे लपवू पाहते, त्याकरता काय काय करू शकते या अतिशय मूलभूत विषयावरचा आहे. अणुभट्टीची सुरक्षा हे केवळ एक निमित्त आहे. व्यवस्थेविरुद्ध जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीबाबत व्यवस्थेचा दृष्टिकोन तोच असतो आणि अशा गंभीर गोष्टी ते दडवूच पाहतात. मग विषय कोणताही असो.
अर्थात दिग्दर्शक जेम्स ब्रिजेसने मात्र जाणीवपूर्वक परमाणुऊर्जाविरोधी विषय जाणीवपूर्वकच निवडला आहे. चित्रपटात मधेमधे योग्य ठिकाणी परमाणुऊर्जाविरोधी आंदोलने दाखवून त्याने त्या विषयावरची वातावरणनिर्मिती केली आहे. ही आंदोलने दाखवताना त्याने व पटकथालेखकाने जागा अतिशय योग्य निवडल्या आहेत. त्यामुळे हे प्रसंग म्हणजे उगाचच जोडलेली ठिगळे वाटत नाहीत. संपूर्ण कथाविष्काराचा ते अविभाज्य भाग वाटतात. त्यामुळे चित्रपट परमाणुऊर्जाविरोधी एक निश्चित भूमिकाही घेताना दिसतो. ही भूमिका काहींना पटणार नाही, ती योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते. परंतु दिग्दर्शकाने घेतलेली भूमिका चित्रपटात अत्यंत भक्कम व ठाशीवपणे मांडली आहे. सर्वसामान्य माणूस चित्रपट बघितल्यावर नक्कीच परमाणुऊर्जाविरोधी होईल.
अणुभट्ट्यांबाबत स्पष्ट भूमिका घेणारा दिग्दर्शक चित्रपटाचा शेवट मात्र अगदी खराखुरा करून त्यात  टिपिकल अमेरिकन बाजारू संस्कृतीचे दर्शन घडवतो. चित्रपटाचे शेवटचे दृश्य आहे ते किम्बलच्या टीव्हीवरील कार्यक्रमाचे. टीव्हीवरील आपल्या कार्यक्रमात किम्बल जॅकच्या एका सहकाऱ्याला जॅकचे खरोखरच मानसिक संतुलन ढळले होते का असा प्रश्न विचारते. तो सहकारी सांगतो असे काहीही नव्हते आणि खरेच काहीतरी धोकादायक असल्याशिवाय जॅक इतके टोकाचे पाऊल उचलणार नाही. कार्यक्रम संपतो आणि टीव्ही स्टुडिओच्या नियंत्रणकक्षाचे दृश्य दिसू लागते. तेथे समोर लावलेल्या असंख्य पडद्यांवर दोन कार्यक्रमांमधील जाहिराती दिसू लागतात आणि चित्रपट संपतो.


अशा तांत्रिक विषयांवरच्या चित्रपटांमध्ये त्या तांत्रिक गोष्टीची व त्या साधनांची विश्वासार्हता महत्त्वाची असते. तोच त्याचा पाया असतो. तो ढासळला तर चित्रपटच कोसळतो. परंतु जेम्सने मात्र ही विश्वासार्हता व्यवस्थित आणली आहे, जपली आहे. फक्त चित्रपट ७९ सालचा आहे त्यामुळे आता बघताना त्यातील अणुभट्टीची उपकरणे, नियंत्रणकक्ष खूपच प्राथमिक दर्जाचे वाटतील. मात्र त्याने चित्रपटाच्या परिणामकारिकतेत बाधा येत नाही. त्यामुळेच नॅशनल फिल्म बोर्डाने त्याचा समावेश त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांत केला होता. अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘कान चित्रपट महोत्सवात’ जॅक लेमनला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कर मिळाला तर ‘बाफ्टा’ पुरस्कारात जॅक लेमन आणि जेन फोंडा दोघांनाही उत्कृष्ट अभिनयाचे पुरस्कार मिळाले.

चायना सिंड्रोम – १९७९
निर्माता – मायकेल डग्लस
दिग्दर्शक – जेम्स ब्रिजेस
पटकथा – माईक ग्रे, टी. एस. कूक, जेम्स ब्रिजेस
छायाचित्रण – जेम्स क्रेब
कलाकार – जॅक लेमन, जेम फोंडा, मायकेल डग्लस
मूळ पटकथा - माईक ग्रे, टी. एस. कूक, जेम्स ब्रिजेस 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link