Next
ट्वेंटी ट्वेंटी
मधुरा वेलणकर
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हणतात ते खरंच असतं, हे अनुभवल्यावर कळतं. बाळंतपण सुरू झाल्यावर शरीरात होणारे बदल, मानसिक उतार-चढाव हे काही वेगळ्या पद्धतीनं सांगायला नको. परंतु प्रसूतिवेदना साजऱ्या केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही तुमच्या बाळाला प्रत्यक्ष पाहता त्यावेळी आई होणं सार्थकी लागतं. या सगळ्यांतून जात असताना मला एक वेगळा अनुभव आला. मी कधीही कशालाही न घाबरणारी मुलगी छोट्या छोट्या गोष्टींत घाबरू लागले. मला काही झालं तर, माझ्या बाळाला काही झालं तर, खिडकीपाशी गेला तर, तोंडात काही टाकलं तर, कुणी नीट उचललं नाही तर, असे असंख्य विचार पदोपदी यायचे. नाटकाच्या प्रयोगासाठी बाहेरगावी जाताना डोळ्यांत पाणी घेऊनच घराबाहेर पडत असे. अनेकांनी समजावलं, ‘होतं असं, काही दिवसांनी नाही होणार त्रास’, ‘मुलं मोठी होतात पटापट, करतात सगळं बरोबर’ वगैरे वगैरे. मात्र त्यावेळी त्या समजावण्यानं मन शांत होत नसे.

एकदा माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहातील प्रयोग झाला आणि आम्ही सगळे पाणीपुरी खायला शेजारच्या गल्लीत गेलो. का माहीत नाही पाणीपुरी अतिशय प्रिय असूनही थोडं अस्वस्थ वाटत होतं. खाऊन झाल्यावर सगळे पांगले. मीही गाडीत जाऊन बसले, गाडी सुरू केली. पण पाय चालेचना, हात थंड पडले, काही सुधरेना. पाच मिनिटांनी मनात विचार यायला लागले. जर गाडी चालवताना माझा अपघात झाला तर, मी वारले तर, माझ्या मुलाला कोण सांभाळणार? तो कसा मोठा होणार? त्याला आईचं प्रेम कसं मिळणार? यासारख्या विचारांनी डोकं बधिर व्हायला लागलं. रडू आवरेना झालं. वीस मिनिटं मी तशीच बसून होते. मला सतत फक्त एवढंच वाटत होतं की मी मरणार. मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि म्हणाले मी माटुंग्याहून परळला जात आहे. मध्येच मला काही झालं तर कुणालातरी माहीत असावं मी कुठे आहे ते, म्हणून तुला कल्पना द्यायला फोन केला. मी काय बोलतेय ते तिला कळेना. ती म्हणाली, “मी येऊ का तुला घ्यायला?” मी म्हटलं, “वाटलं तर सांगेन.” मग मी बहिणीला फोन करून सगळा प्रकार सांगितला. तेव्हा तिनं धीर दिला आणि म्हणाली, “कर गाडी सुरू. मी बोलते तुझ्याबरोबर.” शेवटी तिच्याशी बोलत-बोलत मी घरी सुखरूप पोचले. मात्र ती आधीची वीस मिनिटं कुठल्या टोकाचा विचार करत होते मी आणि ती कशी काढली, ते माझं मला माहीत.
त्या सगळ्या अनुभवानंतर मनात आलं की आपल्या आयुष्याची काय शाश्वती? कधी काय होईल काय माहीत? वेळ सांगून येत नाही. आपल्या जवळच्यांना अचानक आपला हात सोडून जाताना आपण अनुभवलेलं असतं. तरीही इतक्या गोष्टींमध्ये जीव अडकलेला असतो आपला! खरं तर ही एक घटना फक्त, मला मात्र नवीन वाट दाखवून गेली.

अनेक वर्षांमध्ये अशी अनेक नाती निर्माण झाली होती, ती त्या वेळेपुरती अत्यंत महत्त्वाची व जवळची होती. मात्र मग काहीतरी बिनसलं म्हणा, पटलं नाही म्हणा, गैरसमज किंवा कधी बोलून तर कधी न बोलून माणसं दुखावली, दुरावली. कधी हक्काची अशी, आपली म्हणावी अशी माणसं आता आपल्या संपर्कात नाहीत. त्यांच्या आयुष्यात काय घडतंय हे माहीतही नाही. त्यांनी काय कमावलं, काय गमावलं याची कल्पनाही नाही. आता कदाचित ती दरी भरून  निघणार नाही, गेलेला काळ जिवंत होणार नाही. पूर्वीसारखं नातं निर्माण होणार नाही. जसा काळ लोटला तसा माझ्यामध्ये माणूस म्हणून इतके बदल झाले, मतं बदलली, सवयी बदलल्या, विचार वेगळी वाट धुंडाळू लागले. तर मग विशिष्ट नात्यातील समोरचा माणूसही या सगळ्यांतून गेला असेलच. मग आता बदललेले आम्ही एकमेकांना आवडू, पटू ही अपेक्षा चुकीचीच. पण मी ठरवलं, निदान एकदा तरी या नात्यांवर प्रेमाची फुंकर घालून पाहावी, बोलावं. निदान एकदा तरी. नातं पूर्ववत होईल या हेतूनं नाही तर गैरसमज मिटवण्यासाठी. नात्यातील कटुता घेऊन जगणं, कुणालातरी दोष देऊन त्याच्याबद्दलची नकारात्मकता वाढवणं आणि आपणही अशा उदास वातावरणात राहणं, हे योग्य नाही. हे सगळं कुठं नेणार आपल्याला? मग सगळ्यांचे फोन नंबर मिळवून एकाएकाशी संपर्क साधला. त्यांच्याशी माझे हे विचार शेअर केले. इतक्या वर्षांनी सुरुवातीला दडपण आलं असलं तरी आवाज ऐकूनही बरं वाटलं. काहींना पुढे जाऊन भेटलेही. गैरसमज दूर करण्याची संधी दोन्ही बाजूंना मिळाली. समोरच्याची चूक आहे असं पक्कं माहीत असूनही कमीपणा न मानता स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून कटुता काढण्याचा प्रयत्न केला. ही कटुता माझ्यातही होती. तिलाही थोडी मोकळी वाट करून देणं गरजेचं होतं. काही जणांना आनंद झाला, काहींना हे पचवणं कठीण गेलं. स्वत:ची चूक मान्य करण्यात आपण कितीही मोठे झालो तरीही अनेकदा अपयशी ठरतो. मात्र हे सगळं साधताना एक हुरूप होता. माझ्या बाजूनं मी स्वत:ला व समोरच्याला मोकळं होण्याची संधी दिली हे मला मोलाचं वाटलं, खूप हलकं वाटलं.  अचानक कधी कुणाचं कमी-जास्त झालंच तर ‘बोलायचं राहिलं, सांगायचं राहिलं’ असं वाटू नये किंवा स्वत: मरताना काही देणी अर्धवट राहू नयेत, म्हणून केलेला हा एकतर्फी अट्टहास. घरच्यांनाही मी सांगते- काही भांडण, वाद असेल तर ते संपवून घराबाहेर पडा. रस्त्यात काही झालं तर शेवटची आठवण भांडणाची, रुसव्या-फुगव्याची नको. वाचताना थोडं रुक्ष किंवा थेट वाटत असलं तरी चांगलं आहे नाही का असं विचारांनी स्वच्छ होणं?
  अर्थात शेवटी माणूस आपण. हे सगळं पटूनही मूळ स्वभाव राहतोच. त्यामुळे मी कधी कधी अजूनही घाबरते, मात्र त्यातून बाहेर पडायला मला आता वीस मिनिटं लागत नाहीत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link