Next
प्रतिसाद
महेश सरनाईक, सुनील कुवर, रघू गाडगीळ
Friday, February 08 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आयुर्विम्याविषयी...

‘झी मराठी दिशा’च्या दि. २ - ८ फेब्रुवारीच्या अंकातील ‘वेचावे धन’ या सदरातील प्राजक्ता कशेळकर यांचा ‘आयुर्विम्याविषयीची काही मिथकं’ हा लेख वाचला. त्यातील मुद्दे सोप्या भाषेत सांगितल्यामुळे समजले. तरी आयुर्विम्याबाबत मला पुढीलप्रमाणे शंका आहेत-१) आपण पॉलिसी एखाद्या नावाच्या विश्वासावर घेतलेली असते. विमाकंपनीचे परदेशी भागीदार वारंवार बदलत असतात, मग तोच विश्वास नवीन भागीदार आल्यावर कायम ठेवू शकतो का? आपल्याला मिळणारे आर्थिक सरंक्षण खात्रीचे राहते का?
२) आपण पॉलिसीची विमाकंपनी मोबाइल पोर्टेबिलिटीप्रमाणे बदलू शकतो का, ह्यविषयी माहिती द्यावी. ३) विमाकंपनीचे मानांकन उपलब्ध असते का? दोन कंपन्यांच्या प्रीमियममध्ये दुपटीने फरक असल्यास कंपनीनिवडीचा निर्णय कसा घ्यायचा?       
             
महेश सरनाईक, डोंबिवली

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

श्रमिक कामगारांचा नेता - जॉर्ज फर्नांडिस

‘झी मराठी दिशा’च्या दि. २ - ८ फेब्रुवारीच्या अंकातील कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील संपादकीय आणि लेख वाचला. माणसाच्या अखंड चिरंतन अस्तित्वाला अनेक जाणिवा असतात. या जाणिवा त्यांच्या अनुभवांतून व्यापक होत जातात. हे अनुभवविश्व राजकारणी लोक आपल्याला सहजी व्यक्त करता येणाऱ्या माध्यमांतून समाजासमोर ठेवतात, त्यातील एक नेते म्हणजे जॉर्ज फर्नांडिस होत. जॉर्ज यांनी कामगारवर्गातून थेट भारताच्या संरक्षणमंत्री या पदापर्यंत मजल मारली होती. त्यांच्यासारखा सर्व क्षेत्रांत माहीर असणारा लढाऊ कामगार नेता झाला नाही. एका शब्दात ‘मुंबई बंद’ करण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यामुळे त्यांना संप आणि बंदसम्राट असे म्हटले जात असे. फर्नांडिस यांनी आपले सारे आयुष्य कष्टी आणि श्रमिक यांच्याबरोबर व्यतीत केले. त्या वर्गाचे जीवनविश्व, त्यांच्या जाणिवा या जॉर्ज फर्नांडिस यांना चांगल्याप्रकारे अवगत होत्या. त्यांनी १९७४ साली चक्का जाम आंदोलन करून संपूर्ण देशात रेल्वेचा संप घडवून एक इतिहास निर्माण केला. एखाद्या ठिकाणी बेमुदत संप केल्यामुळे कामगारांचे नुकसान होत असेल, तर संप मागे घेण्याची हिंमतही त्यांच्यात होती. तसेच सर्व ठिकाणी तेच हत्यार श्रेष्ठ ठरणार, याची जाणीव या कामगार नेत्याला होती. म्हणूनच जॉर्ज फर्नांडिस हे कामगार चळवळीचे अध्वर्यू आणि बंदसम्राट आहेत, अशी त्यांची ख्याती होती. ते खराखुरा झंझावात होते. त्यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचे प्रतीक होते. इतिहास फार मोठा आहे. आणीबाणीच्या काळातील त्यांचा संघर्ष वाखण्याजोगा होता. जॉर्ज फर्नांडिस यांच्या जाण्याने कामगारचळवळीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.      

सुनील कुवरे, शिवडी, मुंबई

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

हत्तींची उत्क्रांती होतेय?

आनंद शिंदे यांचा ‘झी मराठी दिशा’मधील ‘हत्तीची आई’ हा लेख वाचला. या लेखाचे शीर्षक ‘हत्तिणीचे मातृत्व’ असे असते तर ते अधिक समर्पक झाले असते, असे वाटते. हत्तीणीच्या पिल्लाचे संगोपन मादीआईच करते. त्यात बीज देणाऱ्या नराचा सहभाग नसतो. त्यामुळे खड्ड्यात पडल्यावर आईच तारणहार असते किंवा त्यावेळी इतर हत्तिणी जसे की मावशी, आजी हत्तीण इत्यादी मदत करतात. याबाबत लेखकांना दोन प्रश्न विचारावेसे वाटतात- १) नर हत्ती या कळपात माझी आई आहे हे जाणतो का? २) आफ्रिकी हत्तीचे दात नाहीसे होऊ लागले आहेत असे म्हणतात. ही उत्क्रांती आहे असेही म्हटले जाते, परंतु येत्या १००० वर्षांत हा बदल होणे शक्य आहे का?

 रघू गाडगीळ (इमेलने)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link