Next
सर्वश्रेष्ठ प्रयोगधर्मी कलावंत
कमलाकर नाडकर्णी
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story

जगातील सर्वश्रेष्ठ प्रयोगकर्मी कोण, असा प्रश्न विचारला तर त्याला मोहनदास करमचंद अर्थात महात्मा गांधी हेच एकमेव उत्तर कुठल्याही दिशेतून आणि देशातून आणि कुठल्याही प्रकारच्या विश्वातून मिळेल. याच कारणास्तव मला वाटतं की गांधीजींना श्रेष्ठ कलावंतही म्हटलं जायचं.
प्रयोगिक चळवळ यशस्वी होईल की नाही? हाती काठी आणि बरोबर सत्तर सहकारी. दांडी गाव दीडशे मैल लांब. सत्तर आणि एक पायीच निघाले. मूठभर मीठ गांधीजींनी हाती घेतलं. कायदा मोडला तेव्हा सारा देश खवळून उठला. परदेशातही मिठाची मूठ खळबळ माजवून गेली. घोड्यांवरचे ब्रिटिशही थरथरले. मागे फिरले. आधी केलं मग सांगितलं.
गांधी जन्मशताब्दीच्या निमित्तानं माझ्यासारख्या नाटक्याला आठवण झाली ती अजित दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकाची. १९९५ मध्ये हे नाटक ‘सुयोग’नं रंगमंचावर आणलं होतं. अतुल कुलकर्णीची गांधीजींची भूमिका अविस्मरणीयच होती, परंतु लक्षात राहिली ती ‘बा’ कस्तुरबांची भूमिका साकारणारी भक्ती बर्वे.
अॅटनबरोच्या ‘गांधी’ चित्रपटात तिची कस्तुरबा साकारण्याची संधी हुकली होती. नाटकाच्या निमित्तानं तिची एक विलक्षण व्यक्तिरेखा प्रभावी करण्याची इच्छा पूर्ण होणार होती. अभिनयाच्या प्रांतात भक्तीची बरोबरी करेल अशी अभिनेत्रीच नव्हती, परंतु चरित्रपटातून दिसण्यातल्या साम्यतेलाही तेवढंच महत्त्व असतं. कदाचित तेच अधिक असावं लागतं. ‘गांधी’सारख्या जागतिक महत्त्वाच्या चित्रपटात ते तर कमालीचं गरजेचं असतं. भक्तीला तिथे हार खावी लागली होती. रोहिणी हट्टंगडीनी ही भूमिकेची मागणी अगदी सुफळ संपूर्ण केली होती.
‘बा’ची भूमिका करायची भक्तीची आंतरिक ऊर्मी नाटकाचं निमंत्रण आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात लोपवली जाणार होती. माझ्यासारख्या असंख्य रसिकांना आणि तिच्या चाहत्यांना भक्तीची ‘बा’ बघायची तीव्र इच्छा होतीच. शिवाय, गांधी चित्रपटातील व नाटकातली कस्तुरबा असा एक लेखाला विषय मिळणार होता. भक्तीची आणि माझी चांगली दोस्ती होती. सुधाताई करमरकरांच्या बालनाट्यातून आम्ही दोघांनी अभिनयगिरी केली होती. त्यामुळे मी तिच्याशी अत्यंत मोकळेपणानं संवाद साधू शकत होतो. तीही खुल्लम खुल्ला बोलायची.
‘गांधी विरुद्ध गांधी’चा प्रयोग पाहिल्यानंतर काही दिवसांनी मी तिला प्रश्न केला. “भक्ती हे काम तू अगदी खुन्नसमध्ये केलंस का ग?” माझ्या प्रश्नाचा रोख तिच्या लक्षात आला असणारच, पण प्रश्न न कळल्याचं, भाबडेपणाचं सोंग घेतलं आणि मलाच तिनं प्रतिप्रश्न केला,“म्हणजे?”
आता माझ्यावरच बाण उलटा फिरला होता. “म्हणजे बघा, बघा. अशी होती ‘बा’ कस्तुरबा. तुम्ही समीक्षक लोक ना मोठे आतल्या गाठीचे असता. मनकवडे! असलं माझ्या मनात कधीच काही नव्हतं. तुम्ही लोक, नको ते मनात भरवता. एक मात्र सांगते, एकदा भूमिका करायचं ठरवल्यावर मी त्या व्यक्तिरेखाचा पाठपुरावा केला.”
मला हवं तेच उत्तर सापडत होतं. अभ्यास करून भूमिका वठवणाऱ्या ज्या मोजक्याच अभिनेत्री मराठी रंगमंचावर होत्या, त्यात भक्ती अग्रेसर होती. विजयाबाईंची शिष्या होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेली, पण अनुकरणाऐवजी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवणारी.
कसला अभ्यास कोळसा? बापूजी, बा तर सर्वपरिचित आहेत.
मला त्यांच्यात डोकावायचं होतं.
कसं काय?
सांगते. मी शाळेत असल्यापासून अगदी कालपर्यंत माझ्यासमोर गांधीजींची काळीकुट्ट प्रतिमा रंगवली गेली होती. त्यांनी देशाचं अतोनात नुकसान केलं, अशी माझी समजूत दृढ करण्यात आजूबाजूचे सगळेच यशस्वी झाले होते. कस्तुरबाच्या भूमिकेची तयारी करायचं ठरवलं आणि मी गांधीजींनी लिहिलेल्या आणि त्यांच्याबद्दल लिहिलेलं मिळेल ते वाङ्मय वाचून काढण्याचा सपाटा चालवला. अधाश्यासारखी मी वाचत राहिले आणि गैरसमजुतीच्या केवढ्या खोल अंधकारात मी बुडून गेले होते याची मला प्रकर्षानं जाणीव झाली. बापूजींच्या महत्तेची प्रचीती आली. त्यांचं महात्मापण मनोमन पटलं. तोपर्यंतच्या अज्ञानाला विलक्षण खजील झाले. आकाशाएवढा मोठा माणूस! त्याच्या पत्नीची भूमिका मला करायचीय. सर्वस्व झोकून देण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.
तुझ्यातला काळोख पळाला. तू निर्भर झालीस.
उगाच काहीतरी साहित्यिक बोलू नकोस. मी मनापासून ‘बा’ उभी केली. समाधान पावले.
दोस्तीच्या आणि अधिक वयाच्या अधिकारानं मी माझं लेक्चर तिला सुनावलंच. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करायची होती. त्याचा प्रयोग बापूजींनी बारडोली गावापासून करायचं ठरवलं होतं. मुंबईपासून जवळच असलेलं हे आठ हजार वस्तीचं गाव. सगळी जय्यत तयारी झाली होती आणि आदल्या दिवशीच बातमी आली. चौरीचौरा इथे प्रत्यक्ष जमावानं पोलिसांसह चौकी जाळली. गांधीजींनी ताबडतोब दुसऱ्या दिवशीची मोहीम रद्द केली. आपल्या प्रयोगातही असाच जमाव उसळला, जाळपोळ केली तर त्यांना आवरणार कसं? आपल्या प्रयोगातील हीण त्यांनी ओळखलं. सर्व दिशांतून त्यांचावर टीकेची झोड उठवली गेली. त्यांना भ्याडही म्हटलं गेलं. पण ते डगमगले नाहीत. आपल्या मतावर-निर्णयावर ठाम राहिले. आपली चूक जाहीरपणे कबूल करायची हिंमत त्यांच्यात होती. प्रयोगिक नाट्यकर्मीची हीच खरीखुरी लक्षणं आहेत.
गांधीजींनी प्रत्येक गोष्ट स्वत: करून बघितली. मी ‘बा’ करून बघितली. हुरळून गेले नाही. जाणार नाही.
नव्या वाटा शोधणाऱ्या प्रत्येकानं बापूजींचं स्मरण केवळ शताब्दीलाच न करता प्रत्येक नव्या प्रयोगाच्या वेळी केलं पाहिजे. कारण महात्माजी म्हणजे सदैव ज्वलंत प्रयोगकर्मी होते. प्रयोगधर्मी कलावंत होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link