Next
व्यासंगी विदुषी
डॉ. तारा भवाळकर
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story


डॉ. सरोजिनी बाबर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सरोजिनी कृष्णराव बाबर. सांगली परिसरामध्ये सरोजिनीअक्का म्हणूनच आम्ही त्यांना ओळखत असू. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील बागणी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या. बीएला त्या पुणे विद्यापीठामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांचे वडील कृष्णराव बाबर हे मराठा खानदानातील पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे ग्रामीण भागातून येऊनसुद्धा शिक्षणाच्या खूप मोठ्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या.
सानेगुरुजींच्या प्रेरणेने त्या जाणीवपूर्वक लोकसाहित्याच्या अभ्यासाकडे वळल्या. डॉ. के. ना. वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्त्रियांची मराठीतील सेवा’ या विषयावर त्यांनी संशोधन करून १९५१ मध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांचा मूळ पिंड लेखकाचा आहे हे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले. प्रारंभी त्यांनी विविध प्रकारचे ललितलेखन केले. त्यांचा ‘चोळणा’ हा काव्यसंग्रह १९६४ मध्ये प्रकाशित झाला. त्यांनी कादंबरी, कथालेखन केले. ‘माझ्या खुणा माझ्या मला’ हे त्यांचे १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेले आत्मचरित्र खूप गाजले होते. त्याखेरीज त्यांनी बालसाहित्य, ललितलेखन केले. त्यांना विविध पुरस्कारही मिळाले. त्यांना टिळक विद्यापीठातर्फे १९९४ मध्ये डी.लिट. पदवी देऊन गौरवण्यात आले.
लोकसाहित्यसंकलनाच्या क्षेत्रीय कार्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. लोकसाहित्याच्या अभ्यासाला त्यांची खरी सुरुवात झाली ती त्यांनी १९५० मध्ये समाजशिक्षणमालेच्या संपादक म्हणून काम सुरू केले तेव्हा. या मालेतर्फे सुमारे ६०० प्रकाशने झालेली आहेत. ती ग्रामीण भागातील विविध संस्कृतींच्या विविध अंगांचे सांगोपांग अवलोकन करणारी अशी आहेत. त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून दोन वेळा काम केले. १९६८ ते १९७४ मध्ये राज्यसभेच्या सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. मराठा खानदानातील तरुण मुलींनी राजकारणात असे महत्त्वाचे काम करणे हीसुद्धा मोठी क्रांतिकारी गोष्ट होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य संशोधन समिती’ ही प्रकाशात आली. त्या समितीतर्फे लोकसाहित्याचा सर्वांगीण अभ्यास व्हावा अशी कल्पना त्या समितीचे प्रवर्तक यशवंतराव चव्हाण यांच्या मनात होती. सरोजिनी बाबर या १९६१ पासून या समितीच्या अध्यक्ष झाल्या. ती समिती यापूर्वी स्थापन झालेली होती. डॉ. चाफेकरांच्या अध्यक्षतेखाली त्याचे काम सुरू झालेले होते. सरोजिनीताई अध्यक्ष झाल्यापासून त्याचे स्वतंत्र कार्यालय पुण्यात सुरू झाले. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत मिळाली व त्यांनी त्याचा साक्षेपाने उपयोग करून घेतला. लोकसाहित्यावरील विविध विषयांची संकलने त्यांनी केली. हे फार अवघड काम होते, कारण लोकसाहित्य हे प्रामुख्याने मौखिक परंपरेने चालत आलेले असते. त्यामुळे ते साहित्य मिळवणे, त्याचे वर्गीकरण करणे, ते मुद्रित स्वरूपात समोर आणणे, त्यासाठी योग्य त्या प्रस्तावना लिहिणे, योग्य माणसे शोधणे हे फार जिकिरीचे काम होते. मात्र त्यांचा आणि त्यांच्या वडिलांचा व्यापक जनसंपर्क असल्याने खूप मोठी मोठी माणसे या सर्व कामात सहभागी झाली.
त्यांनी कथा, गीते यांचे वर्गीकरण करून नातेसंबंध, व्रत, दैवते, तीर्थक्षेत्रे इत्यादी विषयांवरील सचित्र आणि देखणे ग्रंथ प्रकाशित केले. त्यांची बहुतेक सगळी संकलने असून महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातील संकलक, अभ्यासकांच्या माध्यमातून ती सारी सिद्ध झालेली आहेत. यातील काही पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. सोपानदेवराव चौधरी, ना. रा. शेंडे, कुमुदिनी पवार, विमलताई चोरघडे, चिं. ग. कर्वे यांचे रसग्रहणात्मक लेख त्यांनी संकलनातून प्रसिद्ध केलेले आहेत.
सरोजिनीताईंच्या अध्यक्षतेखाली ते पहिले पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मात्र त्यांनी प्रकाशनाचा धडाका लावला. ‘बाळराज’ भाग एक ते दोनमध्ये त्यांनी बालकविषयक भावाविष्कार करणाऱ्या ओव्यांचा अभ्यास केला आणि २१ अभ्यासकांचे लेख प्रसिद्ध केले. लोकसाहित्य भाषा आणि संस्कृती, लोकसाहित्य भाषाशास्त्रविषयक अभ्यासकांचे लेखही समाविष्ट आहेत. त्यात कृ. पां. कुलकर्णी, ग. मो. पाटील, अनंत काणेकर, गजमल माळी, मधुकर वाकोडे, डॉ. यु. म. पठाण अशा अनेक मंडळींचे लेख आहेत.
‘जा माझ्या माहेरा’ या पुस्तकामध्ये स्त्रीच्या जीवनातील विविध भावाविष्कारांची रूपे आहेत आणि ती लेखांतून व्यक्त झाली आहेत. ‘एक होता राजा’मध्ये लोकपरंपरेतील पुरुष गायकांच्या गीतामधून सांगितल्या जाणाऱ्या कथा, भवानीदेवी, वासुदेव, पोतराज, यल्लमादेवी, धनगरांची गीते अशी लोकपरंपरेतील सामग्री एकत्र झालेली आहे. लोकसाहित्य समितीने आयोजित केलेल्या संमेलनात विविध निबंधांचे संपादन करून ‘लोकसाहित्यातील साजशिणगार’ हे पुस्तक प्रकाशित केले. ‘जनलोकांचा सामवेद’ हे त्यांचे खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. अत्यंत अन्वर्थक अशा शीर्षकाने ते संपादित झालेले आहे. या ग्रंथाने महाराष्ट्रभर देवादिकांच्या कथा, गाणी, ओव्या व त्यांच्याविषयीचे लेख आहेत. त्याचप्रमाणे ‘तीर्थांचे सागर’ हे मातापिताविषयक भावाभिव्यक्ती करणारे पुस्तक आहे. याच्यामध्ये ७८ संकलकांनी सहभाग घेतला आहे. ‘राजविलासी केवडा’ हे आणखी वेगळे संपादन सरोजिनीताईंनी  केले आहे. त्यात पारंपरिक कृषिनिष्ठ जीवनातल्या पती-पत्नी या नात्यातील विविध भावनांची, प्रणयांची मर्यादित परंतु पुरेशा रसिकतेने व्यक्त झालेली गीते आणि ओव्या आहेत. अनेक कौटुंबिक विषयही त्या गीतांमध्ये आहेत.
महाराष्ट्रात विशेषत: ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक जीवनात पतीपत्नी श्रृंगाराची जाहीर अभिव्यक्ती फारच मर्यादेने केली जाते. तरी पारंपरिक स्त्रियांनी मौन न राखता ते एक मर्यादा राखून कसे केले आहे हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ‘जाई मोगरा’ यात बंधू-भगिनी नात्यातील अभिव्यक्ती सांगणारी गीते, ओव्या आहेत. ‘सांगीवांगी’ नावाच्या पुस्तकात लेख आहेत. ‘नंदादीप’ नावाच्या पुस्तकात सण-उत्सव या विषयीची गीते आहेत. अशी अनेक संपादने सरोजिनीताईंच्या नावावर आहेत.
त्यांनी आणखी एक महत्त्वाचे काम केले ते म्हणजे, लोकसाहित्याचा शब्दकोश. याशिवाय लोकपरंपरेतील रांगोळी या वेगळ्या विषयावरील पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. लोकदैवते, स्त्रियांचे खेळ, व्रत, भोंडला, आदिवासींचे सणउत्सव, लोकसंगीत अशा विविध विषयांवरील पुस्तकांतून सरोजिनीताईंनी  विश्लेषक आणि चिकित्सक अभ्यास करू इच्छिणाऱ्या भावी अभ्यासकांसाठी प्रचंड प्रमाणात संग्रह करून ठेवलेला आहे. चालीरीती, रुढी, परंपरा यांची संकलने, गाणी उपलब्ध करून ठेवली आहेत.
महाराष्ट्र  राज्य लोकसमितीचे कार्य सरोजिनीताईंच्या  काळात जितक्या उत्साहाने झाले तितके पुढे झालेले दिसत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. एवढे मोठे कार्य करून सरोजिनीताई यांनी २० एप्रिल २००८ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे एक कृतार्थ आणि समृद्ध जीवन जगलेल्या सरोजिनीअक्कांचे जन्मशताब्दीनिमित्ताने स्मरण ही अतिशय उचित अशी गोष्ट आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचा एक उदार पैस त्यांच्या या सगळ्या लेखनामधून व्यक्त होतो आणि एकारलेल्या वातावरणापेक्षा भारतीय लोकजीवनातील विविधता किती प्रकारची असू शकते याचा प्रत्यय सरोजिनीअक्कांच्या या सगळ्या कामातून येतो. त्यामुळे मी त्यांना विनम्रतेने भावांजली अर्पण करते.
(शब्दांकन : पराग पोतदार)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link