Next
अशीही स्वप्नपूर्ती!
शोभा नाखरे
Thursday, August 15 | 06:30 PM
15 0 0
Share this story

सुनील गावसकरसारखं खेळायचं आणि नाव कमावायचं, हा त्याचा ध्यास होता. त्यानं स्वतः क्रिकेट, फूटबॉल, रिले अशा अनेक स्पर्धांत आंतरशालेय बक्षिसंही मिळवली होती. शरीर कमावण्यासाठी व्यायामशाळेत जायचं, क्रिकेट नाही जमल्यास, निदान सैन्यात भरती व्हायचं, हे स्वप्न उराशी बाळगलेला सात्विक वृत्तीचा सत्यप्रकाश तिवारी! उषा आणि माताशरण तिवारी यांना दोन मुली आणि सत्यप्रकाश! माताशरण BEST मध्ये काम करत होत्या.  
सत्यप्रकाश अकरावीला होता तेव्हा अघटित घडलं. ६ ऑगस्ट १९८१... सकाळपासून पावसाची धुवांधार फिल्डिंग, रेल्वेरुळांवर पाणी साचलेलं, मंदगतीनं वाहतूक चालली होती.  ह्यानं मुंबईबाहेर जाणारी मेलगाडी पकडली होती. घाटकोपर स्टेशनात वेग थोडा कमी होताच चढलेले बरेच प्रवासी उतरू लागले. शेवटच्या डब्यातल्या सत्यप्रकाशनंदेखील तेच केलं. पायात स्लीपर्स, हातात पुस्तकं, आणि तो पडला. कंबरेखालचा भाग गाडी आणि फलाट यात अडकला नि गाडीनं वेग घेतला. रेल्वेकर्मचाऱ्यांनी त्याला सायन रुग्णालयात नेलं. प्रचंड रक्तस्राव चालू होता. रुग्णवाहिकेत असताना त्याच्या कानावर शब्द आले, “हा वाचणार नाही, किती रक्त गेलंय” कोणीतरी म्हणालं– “कितीही बाटल्या रक्त लागू दे, मुलाला वाचवा! सद्गुणी, खेळाडू क्रिकेटपटू आहे.”
त्याची शुध्द हरपली. सहा तास ऑपरेशन झालं. दोन्ही पाय मांडीच्या वर कापावे लागले. चार शस्त्रक्रिया झाल्या. औषधांमुळे काही दिवस गुंगीत गेले. वाॅर्डात आणलं, तेव्हा जाणवलं की, पाय कुठे आहेत? मनात आक्रोश, उद्वेग आला. क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न? भविष्य काय माझं? दीनदुबळा? मेंदू सुन्न झाला!
आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले. “बसताही येत नव्हतं मला! सायन रुग्णालयाच्या फ़िजिओथेरपिस्ट डॉ. नीता शहा यांनी खूप मदत केली.” पाठीवर बेड्सोर झाले. “उताणा वा पोटावर झोपता येईल, पाय नसल्यानं कुशीवर वळता येणार नाही,” डॉक्टर म्हणाले. जन्मजात शिशूसारखी काळजी आईबाबा घ्यायचे.
सोळा वर्षांचा सत्यप्रकाश हाजीअलीच्या अपंग पुनर्वसनकेंद्रात जाऊ लागला. डॉ. मुखर्जींनी जगण्याला नवा अन्वयार्थ दिला. वाढतं वय असल्यामुळे उजव्या पायाचं हाड वाढेल म्हणून मांडीचं परत ऑपरेशन ठरलं. उपचारादरम्यान पुनर्वसनकेंद्राचा रौप्यमहोत्सव होता. कार्यक्रमात ह्यानं अनेक मुलं बघितली. पोलिओ झालेली, व्याधीग्रस्त, तरीही हसतमुख! सत्यप्रकाशच्या मनात आलं– “मी निदान १५ वर्षं खेळलो, मनासारखं वागलोय. ही मुलं कधीच उभी राहू शकली नाहीत, शकणारही नाहीत; तरी किती आनंदात आहेत. मग आपण त्यांच्यापेक्षा भाग्यवान! तेव्हापासून मी माझं अपंगत्व स्वीकारलं व्हीलचेअरवरून!” सत्यप्रकाश भूतकाळात शिरतो.
वडिलांनी सेवानिवृत्तीच्या पैशांतून BEST च्या मदतीनं घराजवळ दुकान सुरू करून  दिलं. उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या गावाची उषा त्याची सहचरी झाली. ‘लग्नानंतर अपघात झाला असता तर?’ ह्या विचारानं उषानं सत्यप्रकाशला स्वीकारलं. सत्यप्रकाश दोन अपत्यांचा पिता झाला. पण दुर्दैव पाठ सोडत नव्हतं. तीन वर्षांतच संसार संपला. अपेंडिक्स फुटून उषाचं निधन झालं. परत सत्यप्रकाश एकाकी झाला. कॅन्सरनं बहीण गेली.
अशातच त्यांच्याच इमारतीतील १९८८ साली इंग्लिश खाडी पोहणारा पहिला आशियाई दिव्यांग राजाराम घाग यांच्याकडून सत्यप्रकाशला नवीन प्रेरणा मिळाली. सत्यप्रकाश सराव करून गोळाफेक/भालाफेक/थाळीफेक करू लागला. १९९६ मध्ये चेन्नईला दिव्यांगांची नॅशनल स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा होती. व्हीलचेअर व गोळाफेक इत्यादी स्पर्धांत सत्यप्रकाश उतरला. १००-२०० मीटर रेस नि रिलेरेसमध्ये सुवर्णपदक, गोळाफेकीत रौप्यपदक मिळवलं. यासाठी हलक्या व सोयीच्या व्हीलचेअरची गरज होती. पुढे दिवसाला चार-चार तास सराव करत सत्यप्रकाश तयार झाला. अडथळे पार करत, पॅरा एशियन गेमसाठी निवड झाली.
नवीन लढाई खर्चाची! अनेक ठिकाणी हात पसरून त्याने बँकॉकला स्पर्धेला जायला निधी उभारला. भालाफेक/गोळाफेकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळवलं! त्यावेळी ह्याच्या नावानं भारताचा तिरंगा आकाशात लहरू लागला आणि गालावरून अश्रू ओघळले. पुढे आंतरराष्ट्रीय खेळासाठी त्यानं कोरिया, बेल्जियम, मलेशिया, तैवान अशा अनेक ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व केलं. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनानं त्याचा ‘छत्रपती पुरस्कार’ देऊन गौरव केला. आजवर अॅथलेटिक्स व व्हीलचेअर बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर १६ पदकं, राष्ट्रीय व राज्यस्तरावर १०० हून अधिक पदकं त्यानं कमावली आहेत. परदेशात, देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूला खूप सोयीसुविधा मिळतात, मात्र आपल्याकडे तेवढं मिळत नाही; याची त्याला खंत वाटते.  
 २०१३ पासून सत्यप्रकाश देशासाठी खेळाडू घडवत आहे. ‘पॅरालिम्पिक्स स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ व ‘पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन’तर्फे कोचिंग चालतं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडवले जातात. सत्यप्रकाश गेली १५ वर्षं मॅरेथॉनमध्येही सहभागी होत आहे. त्याला २०१८-१९ सालचा प्रशिक्षकासाठीचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ नुकताच मिळाला.
भंगून गेलंय स्वप्न, तरी सोडला नाही ध्यास
मोडून गेलेल्यांसाठी प्रकाश व्हायची, धरलीय यानं आस!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link