Next
चवदार चॉकलेट
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, February 01 | 04:00 PM
15 0 0
Share this storyसगळे जण जमताच विद्याताईने प्रत्येकाला एकेक चॉकलेट द्यायला सुरुवात केली.
“विद्याताई, आज तुझा वाढदिवस आहे की काय?” चॉकलेट तोंडात टाकत अमनाने विचारले.
“छे, छे!” विद्याताई म्हणाली, “ही माझी मैत्रीण स्मिता. तिनं नुकताच चॉकलेट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. चॉकलेटविषयी तिला खूप माहिती आहे. ती सांगण्यासाठी आज मी तिला इथे मुद्दाम बोलावलं आहे.”
“मला सांगा,” शाश्वत म्हणाला, “चॉकलेटसारख्या छान चवीच्या पदार्थाला हे असं चॉक म्हणजे खडूवरून नाव कसं पडलं?”
“चॉकलेटचा आणि खडूचा काहीही संबंध नाही,” स्मिताताई हसत म्हणाली, “दक्षिण अमेरिकेतल्या ‘ॲझ्टेक’ या प्राचीन संस्कृतीतल्या ‘नाहुआट्ल’ भाषेत चॉकलेट शब्दाचा उगम आहे. त्या भाषेतल्या ‘चॉकोआ’ म्हणजे कोकोच्या बिया आणि ‘लाटल्’ म्हणजे ‘अन्न’ या शब्दांपासून चॉकलेट हा शब्द बनला. आताच्या मेक्सिकोतल्या ‘ओल्मेक्स’ संस्कृतीत तीन हजार वर्षांपासून चॉकलेट बनवलं जायचं. एवढंच नाही, तर चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे ठाऊक झाल्यामुळे त्याला ते ‘दैवी अन्न’ म्हणून ओळखायचे. किंबहुना, कोकोच्या झाडाच्या ‘थिओब्रोमा कोकोआ’ या जीवशास्त्रीय नावाचा अर्थही ‘देवांचं अन्न’ असा होतो.”
“खाद्यजगतात सर्वव्यापी असणाऱ्या चॉकलेटला हे नाव अगदी सार्थ आहे,” मुक्ता हसून म्हणाली, “चॉकलेट हे नुसतं चॉकलेट म्हणून तर आपण खातोच. शिवाय, ते गरम-गार पेयं, केक-बिस्किटं आणि वेगवेगळ्या मिठाया-आइसक्रीममधूनही आपल्यासमोर प्रकटत राहतं.”
“अगदी बरोबर,” स्मिताताई म्हणाली, “कोकोच्या बियांपासून मिळणारी कोको पावडर किंवा कोको बटर हे सहजपणे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मिसळून त्या-त्या पदार्थाला चॉकलेटचा स्वाद देता येत असल्यामुळे आबालवृद्धांना आवडणारं चॉकलेट इतक्या विविध खाद्यप्रकारांमध्ये वापरलं जातं.”
“मला चॉकलेटची सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ते तोंडात टाकल्यावर मस्त विरघळतं,” सानिया म्हणाली.
“चॉकलेटचा वितळबिंदू आपल्या शरीराच्या तापमानाच्या आसपास असल्यामुळे ते तोंडात टाकल्यावर सहज विरघळतं,” स्मिताताई म्हणाली, “पण त्याचमुळे भारतासारख्या उष्ण हवामान असणाऱ्या देशांमध्ये चॉकलेट हाताळणं अधिक आव्हानात्मक बनतं.”
“ते कसं काय?” सोहमला प्रश्न पडला.
“तापमान आणि आर्द्रता या दोन गोष्टी चॉकलेटवर चटकन परिणाम करतात,” स्मिताताई म्हणाली, “पंधरा ते सतरा अंश सेल्शिअस तापमान आणि साधारण पन्नास टक्के आर्द्रता ही जोडी चॉकलेट साठवण्यासाठी आदर्श ठरते. योग्य त्या आवरणाशिवाय चॉकलेट जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आर्द्रता शोषून घेतं. त्यामुळे चॉकलेटचा रंग बदलून किंचित पांढुरकाही होऊ शकतो. असं चॉकलेट खाण्यासाठी अयोग्य ठरत नसलं तरी ते अनाकर्षक नक्कीच दिसतं.”
“फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्य पदार्थांचा वास चॉकलेटला लागू शकतो का?” प्रथमेशने विचारले.
“हो,” स्मिताताई म्हणाली, “अन्य पदार्थांचा वास लागून चॉकलेटचा स्वाद कमी होऊ नये म्हणून इतर पदार्थांपासून चॉकलेट दूर ठेवतात. चॉकलेट जर योग्य प्रकारच्या वेष्टनात गुंडाळून प्रकाशापासून दूर ठेवलं तरच त्याची चव, स्वाद, चकाकी, पोत आणि दर्जा टिकून राहतात.”
“चॉकलेटची इतकी काळजी घ्यावी लागत असेल तर केकवर सजावटीसाठी वापरलं जाणारं मऊ चॉकलेट, खाण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या चॉकलेटच्या गोळ्या आणि आइसक्रीमभोवतीचं चॉकलेटचं कडक आवरण असे वेगवेगळे प्रकार कसे बनवतात?” मुक्ताने विचारले.
“चॉकलेट बनवताना ते एकदम थंड केलं तर त्याच्यात वेगवेगळ्या आकाराचे स्फटिक निर्माण होतात,” स्मिताताई सांगू लागली, “यातले काही स्फटिक तर एवढं मोठे असतात की ते डोळ्यांनीही दिसू शकतात. असं चॉकलेट ठिसूळ बनतं आणि खाताना त्याचा भुगा होतो. सतरा अंश सेल्शिअसपासून छत्तीस अंश सेल्शिअसपर्यंतच्या वेगवेगळ्या तापमानाला चॉकलेटचे सहा प्रकारचे स्फटिक बनतात. प्रत्येक प्रकारच्या स्फटिकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे अपेक्षित वापरानुसार चॉकलेट योग्य त्या तापमानाला आणून त्यानंतर ते सावकाश थंड करावं लागतं. या प्रक्रियेला ‘तापमानांतरण’ (टेंपरिंग) म्हणतात. छत्तीस अंशाला अत्यंत कडक आणि तोंडात पटकन न विरघळणारं चॉकलेट बनतं. तर सतरा अंशावर बनणारं चॉकलेट अतिमऊ आणि सहजपणे चुरा होणारं असतं. त्यामुळे चॉकलेटची चव आणि त्याचं रंगरूप हवं तसं बनण्यासाठी तापमानांतरण ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. चौतीस अंश सेल्शिअसला बनणारं चॉकलेट हे चमकदार, उत्तम पोत असलेलं, सहज तुकडा पडणारं आणि आपल्या शरीराच्या तापमानाला अलगद विरघळणारं असल्यामुळे ते सर्वोत्तम मानलं जातं.”
“चॉकलेटमुळे दात किडतात ना?” सोहमने विचारले.“चॉकलेटमुळे दात किडत नाहीत,” स्मिताताई म्हणाली, “चॉकलेटमध्ये गोडव्यासाठी साखर टाकलेली असते. ती बराच वेळ तोंडात राहिली तर तिचं तोंडातल्या जंतूंकडून विघटन होऊन आम्ल तयार होतं. दातांवरचं आवरण या आम्लात विरघळतं. यामुळे दातांच्या आतल्या भागावर जंतूंचा सहजपणे हल्ला होऊन दातांच्या ऱ्हासाला सुरुवात होते. चॉकलेट खाल्ल्यावर दात नीट घासले तर दात न किडता चॉकलेटचा आपल्याला उत्तम आरोग्यासाठी उपयोग होईल.”
“चॉकलेटसारखा छान चवीचा पदार्थ आरोग्यासाठीही उपयोगी आहे?”
“हो तर,” स्मिताताई म्हणाली, “जास्त कोको आणि कमी साखर असणारं ‘डार्क चॉकलेट’ खूपच आरोग्यदायी असतं. त्यात लोह, तांबं, मॅग्नेशिअम, मँगनीज यासारखी खनिजं असतात. शिवाय, त्यातल्या अँटीऑक्सिडंटमुळे जंतूंच्या संसर्गापासून आणि काही प्रकारच्या कर्करोगांपासून आपलं संरक्षण होतं. चॉकलेटमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे आपला मेंदूही अधिक कार्यक्षम बनतो. चॉकलेट खाताना अतिरेक टाळायला हवा, म्हणजे मेदवृद्धी न होता वर्षानुवर्षं चॉकलेट खाण्याचा आनंद घेता येईल.”
“अरे वा!” प्रथमेश उद्गारला, “म्हणजे चॉकलेटचं खाणार त्याला उत्तम आरोग्य मिळणार!”
***    

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link