Next
रुग्णालय व्यवस्थापन
नम्रता ढोले-कडू
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story


मानवी जीवनाला आरोग्याची आणि दीर्घायुष्याची संजीवनी देण्याचे काम हॉस्पिटल्स आणि त्यातील डॉक्टर्स अव्याहतपणे करत असतात. आता हॉस्पिटल्सचे स्वरूप बदलले आहे. कॉर्पोरेट कंपन्याप्रमाणे चकचकीत इमारती, सुसज्ज आणि आधुनिक उपचारयंत्रणा असे रूपडे घेऊन अनेक नवी हॉस्पिटल्स उभी राहिली आहेत.  साहजिकच सध्या या क्षेत्रात करियरच्या भरपूर संधी आहेत. शिवाय भविष्यात या क्षेत्रात करियरची नवनवीन कवाडे उघडतील, यात शंकाच नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर सर्वाधिक राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार मिळवून देणाऱ्या क्षेत्रांपैकी हेल्थकेअर हे एक क्षेत्र आहे.
बारावीनंतर ५५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी बीएचएम म्हणजेच बॅचलर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट या तीन वर्ष पूर्णवेळ कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. या प्रवेशासाठी नामांकित कॉलेजकडून प्रवेशपरीक्षा व त्यानंतर मुलाखत घेतली जाते. या विषयात कोणत्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यास एम.बी.ए. देखील करता येऊ शकते. याशिवाय काही पदविका कोर्सदेखील उपलब्ध असतात. कोणत्याही शाखेच्या पदवीधर तरुणांसाठी एक वर्षाचा पूर्णवेळ डिप्लोमा कोर्स मुंबई विद्यापीठाअंतर्गत गरवारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये सध्या काम करत असलेल्या वा त्या कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षे कालावधीचा वीकेंड कोर्सदेखील चालवला जातो.
व्यवस्थापन विषयातील सर्व तत्त्वे, नियम हे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे वापरता येतील, याचा विचार या अभ्यासक्रमात होतो. यासाठी मॅनेजमेंटची तत्त्वे, मनुष्यबळ विकास, आरोग्यसेवेतील नवे तंत्रज्ञान, प्लॅनिंग अँड डिझायनिंग, संशोधनपद्धती, टीमवर्क, हेल्थकेअर इकॉनॉमिक्स, रिस्क मॅनेजमेंट, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, माहितीतंत्रज्ञान असे विषय या कोर्समध्ये शिकवले जातात. हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा, मुख्य आरोग्य सेवा तसेच इतर साहाय्यभूत सेवा सुरळीत कशा चालवल्या गेल्या पाहिजेत, याचे शिक्षणही दिले जाते. उदाहरणार्थ, मेंटेनन्स ऑफ प्लँट अँड मशीनरीज, वीज आणि पाणी पुरवठा, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचे स्टोअरेज, केटरिंग डिपार्टमेंट हे सर्व सांभाळण्यासाठीचे कौशल्य शिकवले जाते. विविध नामांकित हॉस्पिटल्समध्ये इंटर्नशिप करावी लागते.  
 हॉस्पिटल मॅनेजमेंट हा कोर्स केल्यानंतर पुढील ठिकाणी करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात- सरकारी व खासगी आरोग्य संस्था, रुग्णालये, हेल्थ इन्शुरन्स कंपन्या, हॉस्पिटल कन्सल्टिंग फर्म्स, लॅबॉरेटरीज आणि क्लिनिक्स, मेंटल हेल्थ ऑर्गनायझेशन्स, औषध कंपन्या, सार्वजनिक आरोग्य विभाग, हेल्थ केअर पोर्टल्स, इंटरनॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन्स, मेडिकल सॉफ्टवेअर कंपन्या, ड्रग अब्युज ट्रीटमेंट सेंटर्स, इत्यादी.
हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या कामामध्ये हॉस्पिटलची जाहिरात करण्यापासून, त्या भागातील जनतेच्या गरजा ओळखून त्यांना आरोग्यसुविधा पुरविणे, हॉस्पिटलमधील विविध स्तरांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन अशा नानाविध जबाबदाऱ्यांचा अंतर्भाव यात होतो.
हॉस्पिटल मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी उपलब्ध परिस्थितीत चटकन सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे खूपच आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी नवनवीन व्यवस्थापकीय तत्त्वे, तांत्रिक कौशल्ये आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे वापरता येण्याचे कसब त्यांच्या अंगी असायला हवे.
या क्षेत्रात शिफ्ट ड्युटी करण्याची तयारी ठेवावी लागते. समोरच्या रुग्णांच्या समस्या समजून घेणे, उत्तम सेवा माफक दरांत उपलब्ध करून दिल्या जातील याबाबत रुग्णांना आश्वस्त करणे, अशा अनेक गोष्टी काम करताना शिकून घ्याव्या लागतात. आपल्या रुग्णालयाविषयी रुग्णांच्या मनात सकारात्मक दृिष्टकोन निर्माण होईल, हे पाहावे लागते.
या क्षेत्रात काम करताना माहितीची देवाणघेवाण उत्तमप्रकारे करणे, आरोग्यसेवेसंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियांची सखोल माहिती असणे, कागदोपत्री व्यवहारांमध्ये सजग असणे या तांत्रिक गोष्टी तर खूपच महत्त्वाच्या ठरतात.
या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती सुस्वभावी, हसतमुख, हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांशी आपुलकीचे संबंध निर्माण करणारी असणे आवश्यक आहे.
आरोग्यसेवा पुरवताना हॉस्पिटलवर सतत एक सामाजिक दबाव असतो. काही अप्रिय घटना घडली तर जनतेकडून हॉस्पिटलला आणि डॉक्टरांना लक्ष्य केले जाऊ शकते. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये असा सामाजिक दबाव हाताळण्याची आणि लोकांना समजावून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असणे खूपच गरजेचे असते. संतप्त जमावाची मानसिकता समजून घेऊन तत्क्षणी योग्य निर्णय घेता येणे ही खचितच सोपी गोष्ट नाही. सध्याच्या काळात डॉक्टरांवर, हॉस्पिटल्सवर होणारे वाढते हल्ले, वाढणारा विसंवाद वेळीच रोखून डॉक्टर-रुग्ण सुसंवाद निर्माण करणे, हे पूर्णपणे हॉस्पिटल मॅनेजमेंट टीमचे काम असते. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, कुरबुरी जाणून घेणे, त्या व्यवस्थापनामार्फत सोडविण्याचा प्रयत्न करणे हे कामदेखील करावे लागते.
हॉस्पिटल्सच्या सर्व विभागांमध्ये उत्तम समन्वय असेल तरच त्या हॉस्पिटल्सचे कार्य सुरळीत चालू शकते. उत्तम संवादकौशल्य याही क्षेत्रात महत्त्वाचे आहे, कारण या क्षेत्रात क्षणोक्षणी विविध प्रकारच्या, विविध आर्थिक, सामाजिक स्तरातल्या लोकांशी, माध्यमप्रतिनिधींशी संपर्क येतो. त्यावेळी सर्वांशी तितक्याच प्रभावीपणे संवाद साधण्याची हातोटी असल्याशिवाय या क्षेत्रात तरणोपाय नाही. थोडक्यात, चांगले पब्लिक रिलेशन निर्माण करणे हे हॉस्पिटल मॅनेजरचे काम असते. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, कुशल नेतृत्वगुण, सहकाऱ्यांना उत्तम कामासाठी प्रोत्साहित करणे- हे व्यवस्थापनक्षेत्रातील गुण तर हवेतच.
या क्षेत्रात काम करताना काही कटू अनुभव येतात. अनेकदा बिल भरण्याची वेळ आली की पेशंट्स किंवा पेशंट्सच्या नातेवाईकांकडून सेवा नीट मिळत नसल्याचा, गुणवत्ता ठीक नसल्याचा कांगावा केला जातो. अशावेळी ही प्रकरणे मोठ्या सफाईदारपणे, चाणाक्षपणे हाताळावी लागतात. त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेऊन आपल्या हॉस्पिटल प्रशासनाची बाजू नीट मांडता यायला हवी. शिवाय हॉस्पिटलचे कोणतेही आर्थिक नुकसान होता कामा नये याची काळजी घ्यावी लागते.
हॉस्पिटलची आर्थिक गणिते खूपच वेगळी असतात. त्यामुळे त्यासाठीचे बजेटिंग हाही खूपच गहन विषय असतो. मात्र रुग्णांना आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध होतील असे पाहणे, गरिबांना मोफत उपचारसुविधा देणे, हॉस्पिटलच्या प्रचारासाठी तपासणी कॅम्प घेणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन अशा सर्वच आघाड्यांवर हॉस्पिटल मॅनेजमेंटला लढावे लागते. अर्थातच सामाजिक जाणीव असणारी, संवेदनशील, कार्यकुशल आणि अष्टवधानी व्यक्ती या क्षेत्रात उत्तमप्रकारे करिअर घडवू शकते.n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link