Next
‘चहानिशा’... चहाच्या मार्केटिंगची
आशिष पेंडसे
Friday, September 06 | 01:15 AM
15 0 0
Share this story


बारक्या, समोरच्या ऑइलवाल्याला हे चार कप दे, पलीकडील साहेबाला दोन पेशल देऊन ये आणि हो, न विसरता डायरीमध्ये लिहून घे! नंतर उगाच पाच-दहा पैशांवरून पिताश्रींचा उद्धार नको! मामा, मांडणी नीट धुवून घ्या. मी शेठकडे जाऊन येतो. दुकानाला नवीन रंगासाठीचे पैसे आणतो. तुमच्याही पगारवाढीचे बोलायचे आहे. आणि हो, तो क्रीमरोलवाला आला, तर त्याच्याकडून उधारीचे पैसे घ्या. स्वतः मजबूत कमावतो आणि आपली उधारी ठेवतो शहाणा. बाबूराव, आज काय आराम करायचा मूड आहे का? मी येईपर्यंत भांडी चकाचक करून ठेवा. संध्याकाळची त्या बैठकीची मोठी
ऑर्डर आहे...
साधारणपणे २० बाय २० चा गाळा. उजव्या बाजूला चकचकीत मांडणी, त्यावर कायमच उकळत असलेला चहा, पाठीमागे चकचकीत विविधरंगी सनमायकाची सजावट, समोरील भिंतीवर सर्व देवदेवतांचे मनोभावे फोटो, उजवीकडे मागील बाजूस भांडी घासायची मोरी, डाव्या बाजूला एल आकारामध्ये साधारणपणे १५ माणसे बसू शकतील अशी बाके आणि टेबले आणि हो, डावीकडे दर्शनी भागात नुकताच विराजमान
झालेला फ्रीज! अशा या सेटवर मॅनेजरची अशी ही तोंडाची जंत्री दिवसभर सुरू असते.
 
अंबिका अमृततुल्य
अनेकांसाठी दुसरे घरच जणू. नाही हो, केवळ हॉस्टेल, कॉट बेसिसवर (हल्लीच्या भाषेत शेअर किंवा पीजी) राहत असलेल्यांसाठीच नव्हे, तर अस्सल सदाशिवपेठी पुणेकरांसाठीसुद्धा !
कुणाची बॅग, कुणाचे खेळाचे किट, कुणाच्या नोट्स, तर कुणाची चक्क वॉक इन इंटरव्ह्यूवाल्या बायोडेटाची फाइलसुद्धा. एवढ्याशा त्या दुकानामध्ये सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत कितीतरी भावविश्वांचा व्यवहार होत असतो. हल्ली फॅशन आहे म्हणायची, ते काय ते एनिथिंग कॅन हॅपन ओव्हर ए कप ऑफ कॉफी. परंतु, त्या वेळी एनिथिंग नाही, तर एव्हरिथिंगच त्या चहाच्या एका कपच्या विश्वामध्ये होत असते. पेल्यातील वादळांपासून आयुष्यभरच्या आणाभाकांपर्यंतचा प्रवास त्या अमृततुल्यने अनुभवलाय. पुण्यातील अशा अमृत्यतुल्यमध्ये, मुंबईतील नाक्यावर, नाशिकच्या चौकात, नागपुरातील नुक्कडवर किंवा कोल्हापूरच्या त्या दूधभट्ट्यांवर वेळ रमवला नाही, अशी पिढी सापडणे कठीणच!
चाय तो एक बहाना है, यारोंसे रुबरू होने का यह एक ठिकाना है, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कॉलेजच्या अक्षरशः बॅचेसच्या बॅचेस अशा या अमृततुल्यच्या कट्ट्यांवरून पासआऊट झाल्या आहेत. दिल चाहता है सिनेमात तो आमिर खान गाडी सिग्नलला थांबल्यावर खिडकीतून डोकावून पाहतो आणि त्याला त्याच्या कॉलेजच्या कट्ट्यावर त्याच्याच भूतकाळ सर्रदिशी दिसून जातो. तशाच, काहीशा भावना या अमृततुल्यच्या कट्ट्यांवरून जाताना त्या उकळत्या चहासारख्या उफाळून येतात.
आता हे पाहा ना, एवढ्या सगळ्या नमनामध्ये चहाऐवजी त्यामागील भावविश्वाबाबतच किती उत्स्फूर्तपणे संवाद साधत राहिलो. तीच तर खरी किमया आहे (की होती?), या पुण्यातील चहासंस्कृतीची.
 
जमाना मार्केटिंग आणि ब्रँडिंगचा
एकविसाव्या शतकातही अमृततुल्यची ही मोहिनी कायम होती. चहाला पूर्वापारपासून अमृततुल्य, म्हणजेच अमृतासमान तुलना केली जाणारे पेय म्हणून लौकिक आहेच. परंतु गेल्या काही वर्षांत एक सर्वसामान्य चहावाला पंतप्रधान झाल्यामुळे, की एकविसाव्या शतकामधील मार्केटिंग-ब्रँडिंगच्या जमान्यामुळे म्हणा, या चहाला एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे. ती म्हणजे, २० बाय २० च्या गाळ्यामधील ते कळकट्ट, दाटीवाटीचे चहागृह आता ऐसपैस, रुबाबदार आणि हो स्टेटस सिम्बॉल प्राप्त झालेले ठिकाण झाले आहे. कट्टा, अड्डा, ठेले, नुक्कड, नाका अशा बिरुदावलीमधून बाहेर पडून चहाला आता अपमार्केट यजमानपद प्राप्त झाले आहेत. पुण्याने स्वातंत्र्यपूर्वकाळापासून अनेक ऐतिहासिक क्रांत्या अनुभवल्या. आता या ब्रँडेड चहाच्या क्रांतीनेदेखील पुणेकरांनी लक्ष वेधून घेतले आहे.
या क्रांतीची बीजे रोवण्याचे श्रेय येवले चहावाले यांच्याकडे जाते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महिन्याला तब्बल १२ लाख रुपयांचा नफा कमावणारा चहावाला, म्हणून माध्यमांमध्ये येवले झळकले आणि तेथून त्यांची चहाची कथा सर्वदूर पोचली. पण, या क्रांतीला प्रारंभ त्यापूर्वी चार-पाच वर्षांपूर्वीच झाला होता. खरे तर त्यांची नाळ अमृततुल्य संस्कृतीशीच! आईचे दागिने मोडून पुण्यातील सॅलिस्बरी पार्क या उच्चभ्रू वस्तीमध्ये १९८३ साली गणेश अमृततुल्य हे दुकान सुरू केले. वास्तविक, पुरंदरच्या आस्करवाडीमध्ये गावाकडील म्हशी आणि शेती. पण, वडिलांना चहा बनवण्याची भारी हौस. त्यामधूनच गणेश अमृततुल्य नावारूपाला आहे. २००१ साली वडिलांच्या निधनानंतर येवले बंधूंनी ही परंपरा मोठ्या आत्मीयतेने पुढे नेली.
अर्थात, प्रत्येक व्यवसायामध्ये काळानुरूप पावले टाकावी लागतात. तसेच, काळानुरूप बदलदेखील करावे लागतात. त्यामुळेच, चहा या उत्पादनाविषयी चार वर्षे सखोल संशोधन करून येवले बंधूंनी 2017 साली ‘येवले चहा’ पुण्यात ‘लाँच’ केला. चहाचे हे पहिलेवहिले ब्रँडेड शॉप ठरले. त्यानंतर मग महिन्याला बारा लाखांचा नफा, आता येवले चहाची फ्रँचाईझी घेण्यासाठी आलेली प्रचंड मागणी वगैरे वगैरे... रेस्ट इज हिस्टरी म्हणतात तसे.

चला, चहानिशा करूया...
खरंच काय गुपित आहे या ब्रँडेड चहाचे! अमृततुल्यच्या मुशीतील कॉलेजयुवक ते सध्याचा मार्केटिंगच्या युगाचा साक्षीदार म्हणून चिकित्सक अभ्यास करण्याच्या हेतूने येवले चहागृहात पाऊल ठेवले. कसं असतं, की पूर्वापारपासून आपण आपल्या ठरावीक पद्धतीच्या गोष्टी तशाच करत असतो. आता आपल्या आजीच्या हातची एखादी भाजी, मसाले, लोणची, वाळवणं... वर्षानुवर्षे तीच चव आणि गोडी. अर्थात, त्याचे कुणी स्टँडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करून ठेवलेले नसते. तोच प्रचार या चहाच्या कथेचाही आहे. अमृततुल्यच्या मांडणीवरील मॅनेजर ओंजळीत उकळत्या चहाचे काही थेंब टाकून चवीचा अंदाज घेतो नि मग गरजेनुसार मोठ्या ऐटीत थोडी चहा पावडर, साखर आदी टाकून चहाला अंतिम उकळी देतो. मग त्या मूळच्या पांढऱ्या असलेल्या, पण चहाशी एकरूप झाल्याने त्याच रंगाचे झालेल्या फडक्यातून ते मिश्रण गाळून घेतो. वर्षानुवर्षे हीच प्रथा. चवीत कोणताही फरक नाही.
परंतु एक मात्र आहे, चहातील अनन्यसाधारण व्हरायटी आणि चहाला सामोरे जाण्याच्या नवनवीन पद्धती या येवले चहावाल्यांनी अट्टल चहाखोरांनादेखील शिकवल्या. इतकेच नव्हे, तर त्याचे गुलाम होण्यास भाग पाडले. अर्थात, एक गोष्ट नक्की, की मार्केटिंग-ब्रँडिंग कितीही भारी असले, आणि आतमधील उत्पादन दर्जाहीन असले, तर त्या आकर्षक वेश्टनाचा फारसा उपयोग होत नाही. तोच न्याय या चहाबाजाराला लावायचा झाल्यास, मूळ चहा हे उत्पादन कडक असल्याशिवाय बाह्य स्वरूपातील मार्केटिंगच्या जोरावर फार काळ तग धरून राहता येत नाही.
या कसोटीवर ही येवलेप्रणित चहाचळवळ यशस्वी ठरते आहे, हे नक्कीच अधोरेखित करावेसे वाटते.
बदल ही एकमेव स्थिर गोष्ट असते, असे म्हणतात. सध्याच्या काळात तर ते तंतोतंत लागू ठरते. अशा या बदलाच्या लाटेवर स्वार होत येवलेंच्या जोडीला आता साईबा चहा, प्रेमाचा चहा, नमो चहा अशा किती तरी चहाच्या दुकानांचे ब्रँड सुरू झाले आहेत. आणि त्या सर्वांनाच ग्राहकांची पसंतीदेखील मिळत आहे, हे विशेष! 
 
सोशल मीडियावर चहाबाज
चहाची ही क्रांती समाजमाध्यमांवरही क्लिक करू लागली आहे. एरवी, फेसबुक पेज वगैरे कशी चकाचक फॉरेनच्या गाड्या, मॉल वगैरेंची असावीत. पण, आता चक्क या चहाड्यांचे सोशल मीडिया फुल्ल ऑन आहेत. फेसबुक पेज, वेबसाइट सर्व काही. आणि त्यावरील मजकूर आणि भाष्य हे अतिशय गांभीर्याने सखोल विचार-अभ्यास करून करण्यात आलेले आहे. उगाच, उचलला माऊस आणि लावला पॅडला असे केलेले नाही!
आता हेच पाहा ना, दुकानाचे पांढरे शुभ्र रंग, बाहेरील बाजूस किटल्या आणि कपांची रांग असे ब्रँडिंग, किंवा चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा नक्कीच लागतो, अशा प्रकारच्या टॅगलाइन या चहाक्रांतीकडे किती व्यावसायिक पद्धतीने पाहिले जात आहे, याचीच प्रचिती देतात.

चहा एक, प्रकार अनेक

आता तुम्ही म्हणाल, की चहा पावडरचे अनेक प्रकार आम्हाला माहीत आहेत. सीटीसी, ओपीसी, बीओपी, डस्ट – असा मिळून फॅमिली मिक्श्चर होतो, हे सूत्र मला लहानपणापासून माहीत आहे. केमिस्ट्रीचे पिरिऑडिक टेबल वा जॉमेट्रीची सूत्र लक्षात नसतील एकवेळ!
आता या चहा नावाच्या पेयाचेदेखील अनेकविध नखरेल प्रकार आहेत. आईस टीमधील विविध फ्लेव्हर तुम्हाला ठाऊक असतील. पण, बासुंदी चहा, इराणी चहा, तंदुरी चहा, भट्टीवरचा चहा... असे चहाचे मेन्यूकार्ड समोर येते. सेव्हन स्टार् हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण त्या मेन्यूकार्डमधील डिशची नावे जाणून ऑर्डर देताना जसे कावरेबावरे होतो, तसेच या चहाच्याही बाबतीत होते. म्हणूनच की काय, महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनमध्ये चवीसाठी चुटूकभर चहा देतातच की. आणि चिंब भिजल्यानंतरचे ते फुकटचे भुरके मारायलादेखील मज्जा येते ती औरच!
असो. तुम्ही कोणतेही चहापंथी असा, पारंपरिक अमृततुल्यवाले की मार्केटिंग-ब्रँडिंगवाले. एक गोष्ट नक्की, चहाची तल्लफ शमवताना घशाखाली उतरत असलेल्या त्या गरमागरम चहाच्या घोटाने परमानंदी टाळी लागते, तिला तोड नाही!
-------------------

अमृततुल्य हीच खरी चहासंस्कृती
चहाच्या दुकानांचे कितीही मार्केटिंग केले, तरी पारंपरिक अमृततुल्यची सर त्यांना कधीच येणार नाही. आम्ही केवळ चहा विकत नाही, तर पिढ्यान् पिढ्या पुणेकरांशी भावनिक नाळ जोडून आहोत. अशा मार्केटिंगच्या कितीही फैरी झाल्या, तरी अमृततुल्य हीच पुण्याच्या चहासंस्कृतीची खरी ओळख आहे.
- रसिकशेठ दवे, पारंपरिक अमृततुल्य चहा दुकानदार


खरोखरीच ‘नमो’प्रेरित
आम्ही गेली १८ वर्षे चहाच्या व्यवसायामध्ये आहोत. पण, गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेत नमो अमृततुल्य म्हणून चहाचे ब्रँडिंग सुरू केले. आपले पंतप्रधान हेही पूर्वी चहा विकायचे आणि आता किती मोठे झाले आहेत, देशाला प्रगतिपथावर नेत आहेत, याचा संदेश चहाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. त्यामुळेच, केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाज घडवण्यासाठी आम्ही व्यवसायाचा आणि नमोंच्या प्रेरणेचा आदर्श घेत आहोत. या नावामुळे अनेक जण प्रभावित होतात व चहाच्या माध्यमातून प्रेरणा घेतात, याचा आम्हाला अभिमान आहे.  
-अनिकेत कंक (मालक), नमो चहा

चहाची महासत्ता व्हायचीच...
चहा बनवतो, ही काही लाजिरवाणी गोष्ट नाही. त्याची आम्हाला पॅशन आहे. त्यासाठी मार्केटिंग-ब्रँडिंगचा शास्त्रशुद्ध आधार घेऊन आम्ही चहाची महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करत आहोत. सुरू असलेल्या ४६ शाखांनंतर यंदाच्या वर्षी सुमारे शंभर शाखा सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षांमध्ये एक हजार आणि दहा वर्षांत २५०० शाखा सुरू करण्याचे ध्येय आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताला महासत्ता होण्याचे ध्येय दाखवले. आम्ही चहाची महासत्ता होणार आहोत!
तसेच, कष्ट करून लक्षाधीश होण्याचे ध्येय बाळगलेल्या मराठीजनांना आमच्या शाखांच्या माध्यमातून संधी देत आहोत. प्रत्येक शाखेत बारा ते पंधरा कामगार ठेवून त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत आहोत. चहा बनवणे ही आमची पॅशन आहे आणि सर्वोत्तम गुणवत्ता वर्षानुवर्षे सिद्ध करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
-नवनाथ येवले (मालक), येवले चहा


नोंद : 
चहा विषयाचे महात्म्य आणखी वेगळ्या पद्धतीने उलगडणारा विस्तारली चहाची पाळेमुळे 

आणि  अरुणाचलचा चहा थेट मुंबईत  हे दोन्ही लेख जरूर वाचा...


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link