Next
आता प्रश्न सोडवुया!
विशेष प्रतिनिधी
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

महाराष्ट्रात निवडणुकीची धामधूम संपली आहे, देशातही ती येत्या काही दिवसांत संपेल. निवडणुकीच्या धामधुमीत आणि प्रचारात जे काही बरे-वाईट घडायचे ते घडून गेले आहे. त्याची यापुढच्या काळात फार चर्चा करत बसण्यात अर्थ नाही, कारण आता राज्य आणि देशापुढील मोठ्या समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे आणि शेतीचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पाणीसाठवणीसाठी महाराष्ट्रात बरेच काम झाले आहे. त्यात सरकारच नव्हे, तर समाजसेवी संस्था व जागरूक मंडळी मोठ्या प्रमाणात सामील झाली आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या असली तरी तिने फार मोठे भीषण स्वरूप धारण केलेले नाही. परंतु जिथे पाणीच नसते तिथली परिस्थिती भीषण म्हणावी अशीच असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे आणि तिकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मे आणि जून महिने हे त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाणी अडवून साठवण्याचे काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाले असले तरी यातले बरेचसे पाणी भूजलपातळी वाढविण्यात खर्च झाले आहे. त्यामुळे साठवणतलावात पाण्याची पातळी कमीच आहे. त्यातच पाणीटंचाईमुळे भूगर्भातील पाणी उपसण्याचे काम चालूच आहे, त्यामुळे पाणी अडवून जमिनीत जिरवण्याचे काम आता कायमचे चालू ठेवल्याशिवाय पाण्याची समस्या नाहीशी होण्याची शक्यता नाही. सरकार आणि समाजसेवी संस्था पाणीसाठे वाढवण्याचे काम करीत असल्या तरी लोकांनाही आपल्या पाणीवापराच्या सवयी बदलल्याशिवाय टंचाईच्या काळात पुरेसे पाणी उपलब्ध होणार नाही. पुण्या-मुंबईसारख्या शहरी भागांत घरातच नळाने पाणी उपलब्ध होते. त्यामुळे तेथे पाणी कसे व किती वापरावे हे सतत लोकांना सांगावे व शिकवावे लागते. तसेच, ग्रामीण भागात शिकवावे लागत नसले तरी शेतीच्या पाणीवापराबाबत सतत लोकशिक्षण करावे लागते. अधिक पाणी पिणारी पिके घेऊ नका, हे सतत सांगितले जाते. मात्र महाराष्ट्रातील ऊसशेती ही राज्यातल्या राजकारणाशी निगडित झालेली असल्यामुळे या शेतीसाठी पाणी वापराताना या लोकशिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही. बरे असे असले तरी राजकारण्यांचे हे साखरकारखाने फार कार्यक्षमतेने चालतात असेही नाही. अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, ऊसउत्पादकांना पुरेसा व वेळेत मोबदला दिला जात नाही, ऊसकामगारांची परवडही थांबत नाही, तरीही या शेतीसाठी लाखो घनफूट पाणी वापरले जाते. पाण्याचा असा बेछूट वापर झाल्याने पाणीटंचाई तर होतेच, पण शेतीची उपजही घटते. हे काही नवे शास्त्र नाही, ते सगळ्यांना माहीत आहे, पण त्याचा अंमल कुणालाच जमत नाही. अशा अवस्थेत ‘राज्यात पाणीटंचाई आहे आणि त्याच्याकडे सरकारचे लक्ष नाही’ अशी ओरड करण्यात काय हशील आहे? ‘झी मराठी दिशा’ने त्यामुळेच ‘राज्यात पाणीटंचाई आहे आणि सरकारचे त्याकडे लक्ष नाही’ अशी नकारात्मक बातमीपत्रे देण्याऐवजी या पाणीटंचाईवर कशी मात केली जात आहे, तसेच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकरीच कसे सोडवत आहेत याचा शोध घेऊन त्याच्या प्रेरणादायक कथा लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. या अंकात चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात शेतीच्या क्षेत्रात व ग्रामीण भागात टंचाईच्या स्थितीवर मात करण्याच्या प्रयत्नांची माहिती देण्याचा ‘झी मराठी दिशा’चा प्रयत्न आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link