Next
जागतिक वारसास्थळे नोटांवर
संजय जोशी
Friday, May 31 | 02:00 PM
15 0 0
Share this story

युनेस्कोने (United Nations Educational Social And Cultural Organization)  घोषित केलेला जागतिक वारसास्थळे जपण्याचा संदेश देण्यासाठी जगातल्या काही देशांनी चलनी नोटांचाही वापर केला आहे.  आश्चर्याने आणि विविधतेने नटलेली ३६ वारसास्थळे लाभलेला भारत हा या यादीत अग्रणी आहे. नुकत्याच झालेल्या नोटबंदीनंतर आपण आपली श्रीमंत संस्कृती आणि वारसा दाखवणाऱ्या नोटा चलनात आणल्या. त्यात १० रुपयांच्या नोटेवर ओरिसातील कोणार्क मंदिर, ५० रुपयांच्या नोटेवर हंपी येथील दगडी रथ,  १०० रुपयांच्या नोटेवर गुजरातमधील राणीनी वाव, २०० रुपयांच्या नोटेवर मध्य प्रदेशातील सांचीचा स्तूप व  ५०० रुपयांच्या नोटेवर दिल्लीतला लाल किल्ला तर नुकत्याच मुद्रित करण्यात आलेल्या नव्या २० रुपयांच्या नोटेवर महाराष्ट्रातील अजिंठा-वेरुळ लेण्यांचे छायाचित्र आपल्याला बघायला मिळते. आशिया खंडातील अशाच काही आणखी जागतिक वारसास्थळांचे छायाचित्र  छापण्यात आलेल्या नोटांची माहिती या सदरात घेऊया.

अंगकोरवाट मंदिर :
जगातील अतिप्राचीन सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेले हे मंदिर कंबोडियाच्या अंगकोर शहरामधील मीकांग नदीच्या तीरावर वसले आहे. अंगकोरवाटमंदिराचे छायाचित्र कंबोडियाच्या ५०० रील नोटेवर १९९८ साली छापण्यात आले. या नोटेचा रंग लाल आणि जांभळा असून याच्या मागील बाजूस पौराणिक प्राणी आणि भातशेतीचे छायाचित्र आहे. ५०० कंबोडियन रील म्हणजे भारताचे अंदाजे ८ रुपये ६० पैसे.

एफेसस, टर्की :
एफेसस हे अतिप्राचीन वसाहतींचे संग्रहालय ठरलेले टर्कीमधील जगप्रसिध्द शहर आहे. तेथील आर्टेमिस हे अतिप्राचीन मंदिर जगातील सात आश्चर्यांपैकी एक होते. टर्कीच्या २० लिरा नोटेवर एफेसस शहराचे चित्र आहे. ही नोट ९ फेब्रुवारी २००५ रोजी चलनात आली. याच वर्षी टर्कीची मुद्रापद्धती (monetory system) बदलण्यात आली. या नोटेच्या मागील बाजूस राष्ट्राध्यक्ष केमाल पाशा अतातुर्क यांचे चित्र आहे. एक नवीन टर्कीश लिरा म्हणजे भारताचे अंदाजे ११ रुपये ५५ पैसे.

मोहेंजोदडो, पाकिस्तान :
सिंधुसंस्कृतीतील प्राचीन व उत्कृष्ट नगररचनेचा नमुना मोहेंजोदडोच्या उत्खननात समोर आला.  मोहेंजोदडोमध्ये नागरी संस्कृतीची विशिष्ट रचना होती, तरी व्यवहारात मात्र कोणते चलन अस्तित्वात नव्हते. कारण त्याकाळी वस्तूच्या बदली वस्तू अशा बार्टर सिस्टिमद्वारेच व्यवहार होत असत. आद्य नागरी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मोहेंजोदडोला पाकिस्तानच्या नोटेवर स्थान आहे. १९७६-७७ साली चलनात आलेल्या १० रुपयांच्या नोटेवर मोहेंजोदडोचे छायाचित्र आहे. नोटेच्या मागील बाजूस फिकट ऑलिव्ह हिरव्या रंगात बॅ. मोहम्मद अली जिना यांचे चित्र दिसते.

चीनची भिंत :
उत्तरेकडील सीमेवरूच्या मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी मिंग साम्राज्याच्या काळात दगड, माती, विटा वापरून चीनची ६४५७ किमी लांबीची भिंत बांधली गेली. मिंग साम्राज्याच्या काळातच नोटांचा उगम सापडतो. चीनच्या १ युआन नोटेवर चीनच्या भिंतीचे छायाचित्र आहे. ही नोट १९८० साली तपकिरी आणि गर्द जांभळ्या रंगात चलनात आणली. १ चायनीज युआन म्हणजे भारताचे अंदाजे १० रुपये.

सागरमाथा पार्क , नेपाळ :
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सध्या चर्चेत आहे. एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा म्हणतात. नेपाळने २००८ साली चलनात आणलेल्या १००० रुपयांच्या नोटेवर तपकिरी आणि निळ्या रंगात सागरमाथाचे छायाचित्र आपल्याला दिसते.  २००८ पर्यंत नेपाळच्या सर्व नोटांवर तेथील राजाचे छायाचित्र असे, मात्र राजेशाही संपून लोकशाहीचा उदय झाल्यावर आधीच्या नोटांवरचे राजाचे चित्र बदलून तेथे सागरमाथा म्हणजेच माऊन्ट एव्हरेस्टचे चित्र छापण्यात आले.  

समरकंद, उझबेकिस्तान :
तीन हजार वर्षे जुना असलेला हा मध्य आशियातील देश रेशमाच्या व्यापारासाठी प्रसिध्द होता. तेथील समरकंद या वास्तुवैभवाचे नारिंगी व फिकट तपकिरी रंगातील चित्र उझबेकिस्तानच्या एक लाख सोमच्या नोटेवर दिसते. नोटेच्या दुसऱ्या बाजूस राष्ट्राच्या प्रतीकाचे चित्र आहे. ही नोट याच वर्षी चलनात आली आहे.

बृहदेश्वरमंदिर, तंजावर :
द्राविडी स्थापत्याचा प्रभाव असलेले हे दक्षिण भारतातील तंजावरचे मंदिर चोळ राजाने बांधले. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या काळात झालेल्या नोटबंदीनंतर आलेल्या १००० रुपयांच्या नवीन नोटेवर १९५४- १९७८ या काळात बृहदेश्वरमंदिराचे छायाचित्र तपकिरी रंगात प्रसिध्द करण्यात आले होते.
शब्दांकन : गौरी भिडे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link