Next
ऐश्वर्यसंपन्न
श्वेता प्रधान
Friday, April 12 | 04:30 PM
15 0 0
Share this story


व्यावसायिक नाटकात काम केल्यावर पैसे मिळतात, हे कळल्यावर तिला आणि तिच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. नाटक म्हणजे स्टेजवर जाऊन छान काम करायचं असतं, इतकंच त्यांना ठाऊक होतं. मुळात, करिअर करण्यासाठी पल्लवी अभिनयाचं क्षेत्र निवडेल, हेच कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. खूप अभ्यास करायचा आणि मग अभ्यासातच काहीतरी करायचं, यापलिकडे स्वतः पल्लवीचाही विचार नव्हता. नियतीनं मात्र तिच्या जीवनाची संहिता आधीच लिहून ठेवली होती आणि त्या संहितेत पल्लवी आठल्येचं नाव असणार होतं ‘ऐश्वर्या नारकर!
कधी कधी स्वतः ऐश्वर्यालाच या सगळ्याचं नवल वाटतं. अभिनेत्री होण्याचा विचार तिनं स्वप्नातही केला नव्हता. एखाद्या महत्त्वाकांक्षेच्या मागे जीव घेऊन धावण्याचा तिचा स्वभावही नाही. डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेत असताना अभ्यासएके अभ्यास आणि अभ्यासदुणे स्पर्धा इतकं तिचं जग. अभ्यास आणि स्पर्धा दोन्ही ठिकाणी पहिला नंबर तिनं शक्यतो हातचा जाऊ दिला नाही. मित्रमैत्रिणींसोबत खोड्या काढायची आवड असली, तरी ते तेवढ्यापुरतंच. बाकी स्वभावानं भिडस्त. ती आजही तशीच आहे.  नटण्याची अतिशय आवड असल्यानं गॅदरिंग म्हणजे तिला पर्वणीच वाटायची. पण तेव्हाही मोठेपणी अभिनेत्री व्हायला हवं, वगैरे विचार मनाला शिवले नव्हते. इतरांची डोकेदुखी असणारे गणित आणि सायन्स हे दोन तिचे आवडते विषय आणि ते शिकण्यासाठी तिनं सायन्सशाखेत प्रवेश घेतला. तिला करायचं होतं फार्मसी पण पुढे मायक्रोबायोलॉजी घेऊन पदवी मिळवली.
त्याआधीच म्हणजे एस.वाय.ला असताना शिक्षकांमार्फत प्रभाकर पणशीकरांकडे जाणं झालं. त्यांना येसूबाईच्या भूमिकेसाठी अभिनेत्री हवी होती. मात्र ऐश्वर्याचं वय पडलं लहान. येसूबाईची भूमिका तर मिळाली नाही, पण ‘गंध निशिगंधाचा’साठी तिची निवड झाली. नायक असणार होता अविनाश नारकर. हे नाटक ऐश्वर्याच्या एकूणच आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. ‘गंध निशिगंधाचा’मुळे तिनं अभिनयक्षेत्रात आणि वैवाहिक जीवनात एकाचवेळी प्रवेश केला.
‘गंध निशिगंधाचा’मधली व्यक्तिरेखा तिच्यापेक्षा वयानं मोठीच होती; शिवाय विषयही गंभीर. ऐश्वर्याला सवय होती बालनाट्यांची. ना अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि ना प्रशिक्षण, त्यामुळे प्रत्यक्ष काम करताना जे मार्गदर्शन मिळालं तीच पुंजी. कधी ‘मी माझ्या मुलांचा’सारख्या नाटकात काम करताना विक्रम गोखलेंकडून शिकून तर कधी घरी अविनाशच्या प्रोत्साहनातून ती प्रगती करत गेली.
ऐश्वर्याला कठोर संघर्षाचे दिवस बघावे लागले नाहीत. ‘अमक्या दिवसांत तमकं यश हवं’ असा अट्टहासही तिनं केला नाही. एकही गोष्ट प्लॅन न करता आयुष्यात जे येईल त्याला सामोरं जायचं आणि त्यातलं जे आवडतंय ते मनसोक्त जगायचं, हीच तिची सवय. त्यामुळे कामातून आनंद घेण्याची प्रवृत्ती जोपासली गेली.

जाहिरातीचा चेहरा

नाटकात रमत असतानाच तिला ‘हॉर्लिक्स’ची जाहिरात मिळाली. जाहिरातजगतातल्या हाय-फाय वातावरणात नकोच जायला, म्हणत आधी तर तिनं दुर्लक्ष केलं. परंतु अविनाशनं समजावून सांगितल्यावर तिनं जाहिरातींना होकार दिला. केसरी टूर्स, स्टे फ्री सिक्युअर अशा विविध ब्रँडच्या माध्यमातून जाहिरातजगतात ऐश्वर्याचा चेहरा घराघरात लोकप्रिय होत गेला.

मालिकांचा प्रवास

मुलाच्या - अमेयच्या जन्मानंतर तिला ‘महाश्वेता’ मालिका मिळाली. तो काळ वैवाहिक स्थिती किंवा मातृत्वावर आधारित नायिकेचे निकष ठरवणारा नव्हता. आता मात्र ‘नायिके’ची ‘हिरोइन’ झाल्यानं संकल्पना बदलल्या आहेत. हे बदल ऐश्वर्याला ठळकपणे जाणवतात. १८-२० वर्षांच्या मुलींकडे मध्यवर्ती भूमिका येतात आणि साहजिकच त्या व्यक्तिरेखेकडून ‘प्रगल्भता’ अपेक्षित नसते, हेही तिला जाणवतं.
नायक-नायिकाच कशाला, एकूणच मालिकाविश्व आमूलाग्र बदललंय. याच बदलांतून ‘महाश्वेता’पासून सुरू झालेला मालिकांचा प्रवास ‘या सुखांनो या’, ‘लेक माझी लाडकी’, ‘तुम ही हो बंधू सखा तुम ही’, ‘ये प्यार ना होगा कम’, ‘मायके से बंधी डोर’, ‘घर की लक्ष्मी बेटीयां’ अशा वळणांवरून पुढे पुढे जात राहिला. ‘या सुखांनो या’मध्ये तिनं उभी केलेली सरीतावहिनी प्रेक्षकांची लाडकी झाली होती. बहुतांश मालिकांमध्ये तिनं साध्या, सरळ, समजूतदार स्त्रीची भूमिका केली. पण, जरा काही झालं की रडारड करणं, अतिटोकाच्या प्रतिक्रिया देणं वगैरे  प्रकार करूनकरून ती कंटाळली. प्रत्यक्ष आयुष्यात कोणी इतकं सारखं रडत बसतं का, असाही विचार तिच्या मनात आला. गोडगोड वागणं किंवा डोळ्यांना पदर लावण्याऐवजी वेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा करून बघूया तर खरं, असं म्हणत तिने हिंदीत ‘छल शह और मात’ आणि मराठीत ‘लेक माझी लाडकी’ केली. ‘छल..’ची व्यक्तिरेखा तर पूर्णतः नकारात्मक होती. वरून प्रेमळ वाटणारी सासू पार खून पाडण्यापर्यंत कारस्थानं कशी रचत असते, हे ऐश्वर्याने रंगवलं होतं. ‘तुझ्याकडे पाहिल्यावर इतकी नकारार्थी व्यक्तिरेखा असेल, असा संशय येणार नाही,’ या निकषावर तिची या मालिकेत निवड झाली. तिने साकारलेल्या कपटी वसुंधरा जयस्वालचा प्रभाव प्रेक्षकांवर झालाच, शिवाय घरच्यांकडून ‘पल्लू, असं नको काही करत जाऊस गं, मनावर परिणाम होतो,’ म्हणत एका अर्थी तिच्या अभिनयाला दादच मिळाली.
तेरा भागांच्या मालिका ते डेली सोप या प्रवाहात आशय-विषयापेक्षा तांत्रिक बाबींना अधिक महत्त्व आलं. पूर्वी ‘महाश्वेता’च्या वेळेस एका दृश्यात चार-पाच कलाकार असतील, तर संहितेचं एकत्र वाचन व्हायचं, अधिक चांगलं काय करता येईल याविषयी चर्चा व्हायची. ‘या सुखांनो या’सारख्या मालिका बघून आपणही असं चांगलं वागावं, अशी इच्छा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत असे. आता असं वाटायला लावणाऱ्या मालिकांची संख्या कमी  झालीये. अर्थात, पूर्वीपेक्षा आताच्या मालिका अधिक छान दिसतात, हेही नाकारता येत नाही. त्यामुळे काय नाहीये याची खंत करत बसण्यापेक्षा ऐश्वर्या स्वतःला मेकअप, दागिने, रंगीबेरंगी कपडे यांत रमवून घेते. आजच्या डेलीसोपला पूर्वीच्या मालिकांची सर येणार नसली किंवा कलाकाराऐवजी हल्ली कॅमेराच जास्त अभिनय करत असला किंवा ‘टीआरपी के लिये करना पडता हैं’ म्हणत काय वाट्टेल ते दाखवलं जात असलं, तरी कलाकार म्हणून हेच डेली सोप आपली रोजीरोटी असल्याचंही ती मोकळेपणाने कबूल करते. एका डेली सोपच्या जिवावर शंभरेक लोकांचं पोट भरत असतं, त्यामुळे मतभेद असले, तरी डेलीसोप बंद व्हावेत असा विचारही तिच्या मनाला कधी शिवत नाही. ‘जमाना बदल गया हैं’ म्हणत तिनं स्वतःला त्यात सामावून घेतलं आहे.

रंगभूमीशी नातं
बराच काळ डेली सोपमध्ये गुंतून पडल्यानंतर अभिनयात स्वतःचा विकास करून घ्यायची इच्छा झाली, की ती एखादं नाटक करते. ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’, ‘सोनपंखी’, ‘सोयरे सकळ’ अशा नाटकांतून अलिकडच्या काळात तिला चांगल्या व्यक्तिरेखाही साकार करता आल्या. ‘सोनपंखी’मध्ये तिच्या दुहेरी भूमिकेला प्रशंसा मिळाली, तर ‘आम्ही सौ. कुमुद..’ नं अंतर्मुख केलं. भावनांची घुसमट अभिनयाद्वारे जिवंत करण्याची संधी ‘सौ. कुमुद..’सारख्या नाटकानं तिला दिली.    
नाटकाबद्दल तिला सर्वांत जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे नाटक बसवण्याची प्रक्रिया. अनुभवांची व्यापकता, रोज नव्या उत्साहात व्यक्तिरेखा सादर करणं आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारं रंगभूमीचं वातावरण तिचा आनंद द्विगुणित करतं. काम करता-करता ‘तक्षकयाग’ आणि ‘सोबत संगत’ या नाटकांची निर्मितीही तिनं केली.
विनोदी नाटकांच्या वाटेला मात्र ती गेली नाही. कारण काय, तर न आवरता येणारं हसू! कोणताही विनोद झाला, की भूमिकेचा बाज, पुढचे संवाद सगळं विसरून आपण फक्त हसत बसू याची तिला धास्ती वाटते. यापूर्वी तसं झालंही आहे; ‘लग्नाची बेडी’ करत असताना सहकलाकारांकडून एखादा वेगळा विनोदी पंच आला, की ती स्टेजवरभर प्रयोगात हसत सुटायची. त्यानंतर मात्र विनोदी भूमिकांच्या बाबतीत तिनं कानाला खडा लावला.

चित्रपटांच्या प्रवाहात..
‘सून लाडकी सासरची’, ‘बंध प्रेमाचे’, ‘कधी अचानक’, ‘समांतर’, ‘तांबव्याचा विष्णूबाळा’, ‘होऊ दे जरासा उशीर’, ‘अंकगणित आनंदाचे’ इत्यादी अनेक मराठी चित्रपट ऐश्वर्यानं केले. काही विषय सामाजिक होते, तर काही कौटुंबिक. यांत पठडीतल्या वाटाव्या अशा २०-२५ तरी व्यक्तिरेखा असल्या, तरी त्या प्रत्येकीचे स्वभाव, आचार-विचार, वागणं-बोलणं वेगवेगळं असल्यानं तिला साच्यात अडकून पडल्यासारखं कधी वाटलं नाही. ‘ओळख’, ‘झुळूक’ आणि ‘तिघी’ या तीन चित्रपटांनी एकाच वर्षी तीन वेगवेगळ्या ठिकाणी ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळवून दिला होता.  ‘चॅम्पियन्स’साठी तिनं प्रथमच चित्रपट- निर्मितीची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि पदार्पणातच सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. 

‘धडक’ - एक अनुभव
हिंदीत काम करायचंच नाही, असं तिनं पूर्वी ठरवून टाकलं होतं. तिथल्या स्टायलिश वातावरणाशी आपल्याला जुळवून घेता येणार नाही, असं तिला वाटायचं. त्यामुळे ‘धडक’मध्ये नायकाच्या आईची भूमिका करण्यासाठी फोन आला, तेव्हा तिचं मन तयार होईना. एक अनुभव म्हणून करून बघ, असा सल्ला अविनाशनं दिला. मूळ ‘सैराट’मध्येही परशाच्या आईच्या व्यक्तिरेखेला वाव नव्हता, मग हिंदीत कसा असेल, असा प्रश्न तिला पडला होता. दिग्दर्शकाशी बोलून शंकेचं निरसन झाल्यावर तिनं ‘धडक’ला होकार दिला. चित्रित झालेली सगळीच दृश्यं पडदयावर दिसली नसली, तरी वेगळा अनुभव म्हणून ‘धडक’ तिला बरंच काही शिकवून गेला. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीविषयी असणारा पूर्वग्रह या निमित्तानं दूर झाला, हे महत्त्वाचं.
-------

पुढे काय?
सध्या ऐश्वर्यानं स्वतःला ‘सोयरे सकळ’साठी पूर्णतः झोकून दिलंय. नाटक अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे तिचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय भविष्यात नाटक, चित्रपट, मालिका यांत ऐश्वर्या नारकर हे नाव वेळोवेळी झळकत राहीलच. परंतु तिला कक्षा अधिक रुंद करायच्या आहेत; पृथ्वी थिएटर, हिंदी नाट्यसृष्टी वगैरे ठिकाणी ओळख निर्माण करायची राहून गेलीये. म्हणून ज्यांना ऐश्वर्या नारकर हे नाव माहीत नाही, त्यांच्यासमोर उभं राहून आता तिला काम करायचंय!अविनाश-ऐश्वर्या
‘गंध निशिगंधाचा’चे प्रयोग संपत आले आणि अविनाशला जाणवलं की यापुढे आपण ऐश्वर्याला भेटू शकत नाही. तसं तर तालमीपासूनच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते, पण ते व्यक्त केलं थेट प्रयोगांच्या शेवटी. त्यावेळी ती होती चौदावीत आणि तो करत होता बेस्टमध्ये नोकरी. पुढे दोघांच्याही घरून संमती मिळाली आणि अभिनयक्षेत्राला अविनाश-ऐश्वर्या ही कलाकार जोडी मिळाली. ‘गंध निशिगंधाचा’ ते ‘सोयरे सकळ’ या प्रवासात दोघं अनेकदा रंगभूमी आणि पडद्यावर एकत्र दिसली आहेत.कुटुंब असावं तर असं!
ऐश्वर्याच्या वाटचालीत सासरच्या मंडळींचा सहभाग महत्त्वाचा आहे. लग्न झाल्यापासून ती सासरी एकत्र कुटुंबात वावरतेय. शूटिंगच्या अनियमित वेळा घरचे सांभाळून घेतात. रात्री उशिरा का येतेस किंवा कामाला हातही कसा लावत नाहीस वगैरे तक्रारी त्यांच्या घरात ऐकू येत नाहीत. शूटिंग, नाटकाचे प्रयोग हे कामच आहे आणि त्यासाठी ऐश्वर्यानं घराबाहेर असणं अपरिहार्य आहे, असा समंजसपणा सगळेच दाखवतात. मुलगा अमेयदेखील याच संस्कारात वाढलाय. एरवी स्वयंपाकघराची जबाबदारी नणंदेकडे असली, तरी घरी असेल तेव्हा कपडे धुणं, केर काढणं, चपात्या करणं अशी सगळी कामं करायला ऐश्वर्याला आवडतं.पहिला पुरस्कार
‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा यंदाचा ‘झी नाट्यगौरव’ पुरस्कार मिळालाय. नाटकातल्या नायिकेच्या भूमिकेसाठी तिला मिळालेला हा पहिलाच ‘झी गौरव.’ ‘सोयरे सकळ’मध्ये पंचाहत्तरीची आणि मध्यमवयीन स्त्री अशा दुहेरी भूमिका ती रंगवतेय. दोन्ही भूमिका सर्वस्वी वेगळ्या अंदाजात साकारत असल्याची पोचपावती तिला प्रेक्षकांकडून मिळाली. शिवाय, ‘झी नाट्यगौरव’ मिळाल्यामुळे मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान तिला वाटतं.

अशी मी, तशी मी
छान गप्पा माराव्या, शॉपिंगला जावं, पाणीपुरी खावी, नऊ ते पाच नोकरी करून घरी यावं अशी साधीसुधी संकल्पना ऐश्वर्याच्या मनात होती. नोकरीचा भाग वगळता हलकीफुलकी मजामस्ती करत जगायला तिला आजही आवडतं. मोजकेच मित्रमैत्रिणी असल्यानं अनेकांना ती शिष्ट वाटते. रात्रभराच्या पार्ट्या, दारू-सिगारेटची व्यसनं वगैरेंच्या नादी लागावंसं तिला कधी वाटलं नाही. अविनाश जितका शांत आहे, तितकाच ऐश्वर्याला पट्कन राग येतो. शांत झाल्यावर ती लगेचच ‘सॉरी’सुद्धा म्हणून टाकेल. परंतु एकूणच स्वतःच्या स्वभावाचं वर्णन ती ‘कॉम्प्लिकेटेड’ या एका शब्दात करते.  अभिनेत्री म्हणून आपण परिवर्तनशील किती आहोत याबद्दल तिच्या मनात शंका असली, तरी अभिनयातली उत्स्फूर्तता ही आपल्याला मिळालेली देणगी असल्याची जाणीव तिला आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link