Next
‘मुगल-ए-आजम’ची साठी
धनंजय कुलकर्णी
Friday, August 09 | 03:45 PM
15 0 0
Share this story


page 24भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात भव्यदिव्य असा चित्रपट आणि ज्याचे गारुड आजही चित्रपटप्रेमींच्या मनावर कायम आहे तो चित्रपट म्हणजे के. असिफ यांचा मुगल-ए-आजम! या ऐतिहासिक चित्रपटाने हिंदी चित्रपटाची संपूर्ण परिभाषाच बदलून टाकली. ज्या काळात दहा-बारा लाखांत चित्रपट बनत त्याकाळी या चित्रपटाचे बजेट होते तब्बल दीड कोटी! त्या काळात आजच्यासारखे ‘व्हीएफएक्स’सारखे तंत्रज्ञान नव्हते. तरी त्यातील भव्य असे समरप्रसंग पाहून अचंबित होतो.  के. असिफ हे कलंदर दिग्दर्शक तर होतेच, परंतु अतिभव्यतेचे स्वप्न पाहणारे होते. पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार, मधुबाला, अजित, दुर्गा खोटे या पडद्यावरील मातब्बर दिग्गज कलावंताचा अप्रतिम अभिनय, शकील बदायुनी यांची अर्थवाही गाणी, नौशाद यांचे सुरीले संगीत आणि याचबरोबर चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमवर घेतलेली अपार मेहनत या सर्वांचे प्रयत्न यशस्वी झाले. चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. शुक्रवार, ५ ऑगस्ट  १९६० रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ५९ वर्षे पूर्ण झाली आहेत.  या चित्रपटाच्या निर्मितीची कथा जबरदस्त आहे. वात्सल्य, प्रेम, ईर्ष्या, त्याग, हर्ष, दु:ख, साहस, पराक्रम, समर्पण या साऱ्या भावनांचा  मोठ्ठा समुच्चय असलेले क्षोभनाट्य रुपेरी पडद्यावर रंगले!
आचार्य अत्रे यांच्या परळच्या ‘चित्रमंदिर’ या स्टुडिओत ‘वसंतसेना’या चित्रपटासाठी शिंपीकाम करणारे के. असिफ पुढे जाऊन भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरतील, अशा चित्रपटाची निर्मिती करतील, असे तेव्हा कुणी म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले गेले असते. परंतु आपल्या ध्येयासाठी तहानभूक हरपून काम करणारे असिफ खरोखरच ग्रेट होते. त्यांनी उराशी बाळगलेले (मुगल सम्राट अकबर याच्या जीवनावरील) स्वप्न साकारण्यासाठी, ही कलाकृती  बनवताना कुठेही तडजोड केली नाही. अफाट, पाण्यासारखा पैसा त्यात ओतला. फोटोग्राफीसाठी आर.डी.माथुर यांना निवडले तर कलादिग्दर्शक म्हणून एम.के. सय्यद, शिल्पकार बी.आर. खेडेकर यांना घेऊन सेट उभारायचे काम सुरू झाले. के. असिफ अतिशय परफेक्शनिस्ट असल्याने मनासारखा सेट तयार होईपर्यंत शूटिंग सुरू करत नसत. या चित्रपटाची तयारी त्यांनी १९४५ सालापासूनच सुरू केली होती. परंतु फाळणीमुळे सारे गणित बिघडले व पुन्हा नव्याने मांडणी करावी लागली. मनासारखा शॉट घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे त्यामुळे हा चित्रपट तब्बल नऊ वर्षे निर्मितीअवस्थेत होता. या दरम्यान याच कथानकावरचा ‘अनारकली’ हा चित्रपट १९५३ साली येऊनही गेला.
पडद्यावरचे उत्तम कलाकार आणि पडद्यामागचे उत्तम साथीदार तसेच उत्कृष्ट तंत्रज्ञ यांची फौज घेऊन के. असिफ यांनी हे शिवधनुष्य उचलले. शापूरजी पालनजी यांसारखा खंबीर फायनान्सर त्यांना मिळाला. मग चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम कशी परिपूर्ण होईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. यातील युद्धाच्या चित्रीकरणासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांची खास परवानगी घेऊन खरेखुरे सैनिक जयपूरच्या रणांगणावर वापरले होते. या वेळी २००० उंट, ४००० घोडे आणि ८००० सैनिकांचा मोठा ताफा उभा केला.
या चित्रपटाचे चित्रीकरण अंधेरीच्या मोहन स्टुडिओत झाले होते. चित्रीकरण पाहायला येणाऱ्या त्या गर्दीत एक चेहरा असा होता जो पुढे पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला, ते होते झुल्फिकार अली भुत्तो! चित्रपटातील शास्त्रीय रागावर आधारित दोन गाण्यांसाठी उस्ताद बडॆ गुलाम अली खाँ यांना तब्बल पन्नास हजार बिदागी देऊन बोलावले होते. ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी लच्छूमहाराज होते. त्या काळातील जे जे उत्तम होते ते सारे या चित्रपटात आणण्याचा प्रयत्न झाला होता. ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी उभारलेल्या शीशमहलवर पाण्यासारखा पैसा खर्च झाला. ज्या काळात एका चित्रपटाची निर्मिती आठ ते दहा लाखांत होत असे त्या काळात असिफ यांनी या गाण्यातील शीशमहलसाठी तब्बल बावीस लाख खर्च केले!
यातील पल्लेदार उर्दू संवादांनी रसिकांवर मोहिनी घातली होती. या संवादाच्या स्वतंत्र ध्वनिमुद्रिका काढल्या होत्या.
 निर्मितीच्या काळातच रंगीत चित्रपटाला सुरुवात झाली होती त्यामुळे असिफने हा चित्रपट काही अंशी रंगीत बनविण्याचा निर्णय घेतला. चित्रीकरणाच्या वेळी खरे तर दिलीप व मधुबाला यांच्यात तीव्र मतभेद झाल्याने ते परस्परांशी बोलतही नव्हते. तरीही या दोघातील प्रणयप्रसंगांत कुठेही तो दुरावा जाणवत नाही. हा चित्रपट एकाचवेळी १५० प्रिंट्ससह भारतात प्रदर्शित झाला हाही एक विक्रम आहे. मुंबईच्या ‘मराठा मंदिर’मध्ये (आणि पुण्यात नटराज) याचा भव्य प्रीमियर झाला. हत्तीवरून चित्रपटाची प्रिंट आणली गेली. तब्बल वीस रिळांचा हा चित्रपट बघायला लोक प्रचंड संख्येने येत असत. तिकिटाच्या काळ्या बाजाराच्या दंतकथा तयार झाल्या. या चित्रपटाचा प्रीमियर ‘काला बाजार’  या देव आनंदच्या चित्रपटात दाखविला गेला. या चित्रपटाने त्या काळात ११ कोटींचा व्यवसाय केल्याचे बोलले जाते. (लक्षात घ्या त्या काळी एक डॉलर आणि रुपया यांचा दर सारखाच होता!) हा चित्रपट मराठा मंदिरमध्ये तीन वर्षे तळ ठोकून होता. याचा रेकॉर्ड पुढे १५ वर्षांनी आलेल्या ‘शोले’ने मोडला. के.असिफ आणि दिलीपकुमार यांच्यात मतभेद झाल्याने दिलीपकुमार प्रीमियरला उपस्थित नव्हते. परंतु २००४ साली हा चित्रपट पूर्ण टेक्निकलर बनवून पुन्हा प्रदर्शित झाला. त्या प्रीमियरला मात्र दिलीपकुमार यांनी हजेरी लावली होती!
आजच्या काळातील बाहुबली, रोबोट हे चित्रपट पाहून थक्क होणाऱ्या पिढीला (फारसे तंत्रज्ञान विकसित नसताना) अ‍ॅक्शनसोबतच इमोशन्सचा वापर करून अप्रतिम चित्रपट कसा बनू शकतो हे पाहायचे असेल तर ‘मुगल ए आजम’ ला पर्याय नाही!
संगीतामधील सर्वोत्तम अदाकारी
या चित्रपटाचे संगीत हा खरे तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. संपूर्णपणे अभिजात भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचा अप्रतिम वापर करीत संगीतकार नौशाद यांनी तब्बल १२ गाणी दिली! शकील बदायुनी यांच्या लेखणीतून उतरलेली गाणी चित्रपटाच्या कथानकास पूरक ठरली. यातील दोन गाण्यांसाठी उस्ताद बडॆ गुलाम अली खाँ यांना नौशाद यांनी पाचारण केले. यातील सात गाण्यांत लताचा स्वर होता. अकबर आणि जोधा यांच्या धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक असलेले ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ हे गीत ‘गारा’ रागात बांधले होते. सर्वात गाणे गाजले ‘प्यार किया तो डरना क्या.’ तब्बल १०५ वेळा रिराइट करून रात्रभर जागून हे गीत लिहिले होते.  चित्रपटातील हे गीत रंगीत केल्याने त्याची कलात्मक  उंची आणखी वाढली. रफीच्या स्वरातील  ‘जिंदाबाद, ऐ मुहोब्बत जिंदाबाद’ गाण्यात रफीसाहेबांबरोबर शंभरजण कोरसमध्ये गायला उभे होते. हे खूप उंच पट्टीत गायले गेले जे कुमार नावाच्या अभिनेत्यावर चित्रित केले गेले.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link