Next
पाणबुडीतील नौसैनिकांच्या बचावासाठी
समीर कर्वे
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this storyगाझी अॅटॅक चित्रपटात अनेकांनी पाणबुडीचे पाण्याखालचे जग आणि तीन-तीनशे मीटर खोल पाण्याच्या दबावाखाली होणारी घुसमट हा सारा थरार अनुभवला होता. चित्रपट आणि तोही हिंदी असल्याने त्यात काही प्रसंग अतिशयोक्त व वास्तवापासून दूरचे होतेच. परंतु पाणबुडी जर संकटात सापडली, तर नौसैनिकांवर काय प्रसंग बेतू शकतो, याची चुणूक त्यातून कळली असेल. पाणबुडी पाण्याखाली जाऊन नादुरुस्त होण्याची आपत्ती ओढावलीच, तर तिच्यात अडकलेल्या नौसैनिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी भारतीय नौदलात गेल्याच आठवड्यात डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल (डीएसआरव्ही) हे पाण्याखालचे बचाववाहन दाखल झाले आहे.

भारतीय नौदलात गेल्या ५० वर्षांपासून पाणबुड्या वापरल्या जात आहेत. पूर्वापार डिझेल-इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पारंपरिक पाणबुड्या आहेत आणि आता अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्याही भारताकडे आहेत. भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडच्या ताफ्यात अलिकडेच समाविष्ट झालेल्या डीप सबमर्जन्स व्हेईकलमुळे पाण्याखाली पाणबुडीला अपघात झाला तर तिथपर्यंत पोहोचणे आणि नौसैनिकांना वाचवणे शक्य होईल.

हे बचाववाहन म्हणजे एक छोटेखानी पाणबुडीच आहे. ती बॅटरीवर चालणारी आहे. पाणबुडी दुर्घटना घडल्याची वर्दी मिळाल्यास घटनास्थळी विमानाद्वारे नेऊन किंवा एका मदरशिपवरून नेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी ते पाण्यात सोडले जाईल. हे वाहन चालवण्यासाठी तीन कर्मचारी लागतात व एकावेळी १४ जणांना वाचवण्याची त्याची क्षमता आहे. पाणबुडीतून बाहेर येण्यासाठी किंवा आत शिरण्यासाठी डेकवर एक गोल झाकण असते. त्याला हॅच म्हणतात. डीएसआरव्ही या झाकणापर्यंत जाते व डीएसआरव्हीचे झाकण आणि पाणबुडीचे झाकण एकमेकांना समांतर जोडले जाते. दोन्ही झाकणे उघडल्यावर डीएसआरव्हीतील बचावपथक पाणबुडीत जाऊ शकते. त्यानंतर पाणबुडीतील आपद्ग्रस्तांना बाहेर काढले जाते.

अलिकडेच १५ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात डीएसआरव्हीची चाचणी यशस्वी झाली.  त्यात ३०० मीटरहून अधिक खोल अंतरावर डीएसआरव्हीने पाणबुडी बचावकार्य केले. याच चाचणीमध्ये डीएसआरव्हीने तब्बल ६६६ मीटर खोल सूर मारला होता. भारतीय समुद्रक्षेत्रात मानवी क्रू तैनात असताना इतक्या खोल सूर मारण्याचा हा विक्रमच झाला. मुख्य म्हणजे या वाहनाच्या बाजूंवर सोनार हे पाण्याखालील हालचाली टिपू शकणारे टेहळणी यंत्रही आहे. त्यामुळे आपद्ग्रस्त पाणबुडी शोधणेही या वाहनास शक्य होईल. डीएसआरव्हीच्या आणखी काही चाचण्या होतील. त्यात भारतीय हवाईदलातील सामग्रीवाहक विमानाद्वारे हे वाहन नेण्याची चाचणीही घेण्यात येईल. ज्यायोगे घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचणे शक्य होईल.

पाणबुडीवर कार्य केलेले भारतीय नौदलातील निवृत्त कमांडर गिरीश कोनकर यांनी सांगितले, की गेली २० वर्षे आपण अशा प्रकारचे बचाववाहन घेण्याच्या प्रयत्नात होतो. अमेरिका व अन्य राष्ट्रांकडे हे तंत्रज्ञान आहे. आता आपल्याकडे नव्या पाणबुड्या तयार होत आहेत व आधीच्या पाणबुड्याही ताफ्यात आहेतच. पाणबुड्यांमधील नौसैनिक अत्यंत जोखमीच्या वातावरणात काम करत असतात. कोणती आपत्ती किंवा तांत्रिक बिघाड झालाच, तर त्यांना बचाव करण्यासाठी अवधी फार कमी मिळतो. अशावेळी त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणारे वाहन हवे. ते डीएसआरव्हीमुळे शक्य होईल.
 भारतीय नौदलात इंग्लंडहून आयात करण्यात आलेले हे पहिले वाहन सध्या पश्चिम नौदल कमांडच्या ताफ्यात तैनात होईल. लवकरच पुढील वर्षात आणखी एक असे वाहन दाखल होईल व ते पूर्व किनारपट्टीवर पूर्व कमांडच्या ताफ्यात दाखल होईल. १९०० कोटी रुपये खर्चून स्कॉटलंडच्या जेम्स फिशर अॅन्ड सन्स या समूहाकडून ही डीएसआरव्ही बचाववाहने घेण्यात आली आहेत. या वाहनांच्या देखभालीची जबाबदारीही कंपनीवर आहे. नौसैनिकांचे प्रशिक्षण या वाहनांवर पूर्ण झाले आहे.

 भारतीय नौदलाच्या ताफ्यात १९८० च्या दशकात दाखल झालेल्या शिशुमार श्रेणीतील शल्की, शंकुश व शंकुल या जर्मन एचडीडब्ल्यू पाणबुड्यांमध्ये एक वेगळी रचना होती. त्यात पाणबुडीचाच एक भाग तिच्यापासून विलग होऊन नौसैनिकांना आपला जीव वाचवण्याची सोय करण्यात आली होती. त्याला डिटॅचेबल हॅच म्हणायचे. मात्र या प्रकारच्या पाणबुड्या आपण नंतर घेतल्या नाहीत. त्यापैकी दोन पाणबुड्या माझगाव गोदीत बांधण्यात आल्या होत्या. मात्र या श्रेणीतील सहापैकी चारच पाणबुड्या नौदलात आल्या.

 भारतीय नौदलात जेव्हा एकूण चारच पाणबुड्या होत्या, तेव्हा १९७१ मध्ये आयएनएस निस्तर नावाची एक बचावनौका आपल्याकडे होती. ती निवृत्त झाल्यानंतर १९८९ मध्ये आयएनएस निरीक्षक ही नौका पाणबुडीच्या बचावासाठी तैनात करण्यात आली. त्यावर डायव्हिंग बेल ही क्रेनच्या साह्याने पाण्याखाली पाठवता येणारी सामग्री होती. त्याचप्रमाणे निस्तरवरील सामग्रीही या नौकेवर बसवण्यात आली होती. ही नौका तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या तेलउत्खनन मोहिमांमधील बचावकार्यासाठी माझगाव गोदीने बांधली होती. नंतर ती नौदलाने खरेदी केली. आयएनएस निरीक्षकने अरबी समुद्रात कोचीजवळ २५७ मीटर पाण्याखाली जाण्याचा विक्रम केला होता. मात्र आयएनएस निरीक्षकला बचावकार्यात मर्यादाही होत्या.
आयएनएस सिंधुरक्षक या ‘किलो’ श्रेणीतील पाणबुडीवर २०१३ साली मुंबई बंदरातच भीषण स्फोट झाला व त्यात १८ नौसैनिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१४ साली आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीवर आग लागून दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढवला होता. तर अन्य सहा जण जखमी झाले होते. या दोन्ही घटनांमध्ये डीएसआरव्हीसारख्या वाहनाचा थेट उपयोग झाला नसता. परंतु त्यावेळी पाणबुडी बचावकार्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र बचाववाहन नसल्याची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवली होती.


७०५ कोटी रुपये खर्चून विक्रमादित्यची डागडुजी

भारतीय नौदलातील सध्याची एकमेव विमानवाहू युध्दनौका आयएनएस विक्रमादित्यची गेले पाच महिने सुरू असलेली डागडुजी कोचीन शिपयार्ड या गोदीत पूर्ण झाली आहे. या दुरुस्तीचा खर्च मात्र ७०५ कोटी रुपये आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण करून आयएनएस विक्रमादित्य आता कारवार या तिच्या होमपोर्टकडे निघाली आहे.
रशियाकडील अॅडमिरल गॉर्शकॉव्ह या नौकेचे भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रमादित्य या अवतारात २०१३ साली आगमन झाले. दरम्यानच्या काळात प्रदीर्घ काळ सेवा बजावलेली आयएनएस विराट ही पूर्वाश्रमीची ब्रिटिश बनावटीची विमानवाहू युध्दनौका निवृत्त झाली. आयएनएस विक्रमादित्यची गेल्या पाच महिन्यांतील डागडुजी अशा प्रकारे करण्यात आली आहे, की ज्यायोगे पुढील पाच ते सहा वर्षे तिला डागडुजीची (रिफिट) गरज भासणार नाही. आगामी २०२०-२१ या काळात करण्यात येणाऱ्या रिफिटची कामेही याचवर्षी करून घेण्यात आल्याने यापुढचा काळ ती अखंडित सेवेत राहील, असे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दुरुस्तीच्या कामात विक्रमादित्यच्या बुडाला रंग देण्यात आला, तसेच त्यावर प्रक्रियाही करण्यात आली. नौकेवरील विविध प्रकारच्या टाक्या व अन्य जागांची स्वच्छता आणि त्यांचे रंगकाम करण्यात आले. नौकेच्या बुडाचे निरीक्षण करण्याकरता काही वेळा पाणबुडे पाठवावे लागतात. मात्र नौका सुक्या गोदीत आली असल्यास बुडाचे निरीक्षण व दुरुस्ती-डागडुजी अधिक सखोलपणे करता येते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link