Next
बँकांतील ठेवी आणि विम्याचे संरक्षण
अभय दातार
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story
सर्वसामान्य बँकग्राहकाला बँक का आणि कशी बुडते हे समजणे अशक्य! सी.के.पी. बँकेच्या ठेवीदारांची जखम भरून यायच्या आत पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेची बातमी आली. अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. कष्टाचा आणि हक्काचा पैसा नक्की कुठे आणि कसा गायब होतो, हे इमानदार आणि सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य नागरिकांना कसे कळणार? अशा वेळी बँकेतील ठेवीचा विमा असतो आणि त्यामुळे खातेदाराच्या ठेवी संरक्षित असतात, असे समजले, की आशा लगेच पल्लवित होतात. मात्र या बाबतीत पक्की माहिती असणे फार महत्त्वाचे असते. शिवाय ठेव विमा योजनेतून आपले किती पैसे कधी मिळतील, हे नक्की कळणे, महामुश्किल. म्हणून समजून घेऊ, आपण आपल्या बँकेतील पैशांचे विम्याद्वारे रक्षण करण्याचे काही उपाय.

बँकांमधील कोणत्या प्रकारच्या ठेवींना विम्याचे संरक्षण असते आणि ते कोणामार्फत दिले जाते?
बँकांमधील सर्व प्रकारच्या ठेवींना विम्याचे संरक्षण असते. ‘ठेवी’ याचा अर्थ फक्त ‘मुदत ठेवी’ नव्हेत, तर बचत खाते, चालू खाते, रिकरिंग खाते, अशा सगळ्या खात्यांमधील शिल्लक रक्कमही त्यात अंतर्भूत असते.  हे संरक्षण ‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (DICGC) या रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या महामंडळातर्फे दिले जाते.

कोणकोणत्या प्रकारच्या बँकांना हे संरक्षण लागू आहे?
रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व बँकातील ठेवींना, म्हणजेच सरकारी बँका, खाजगी बँका, शेड्युल्ड व बिगर शेड्युल्ड सहकारी बँका, या सर्वांना हे संरक्षण मिळते. मात्र पतपेढ्या आणि खाजगी कंपन्यांतील मुदतठेवींना हे संरक्षण लागू होत नाही; म्हणजेच या प्रकारच्या ठेवी अजिबातच संरक्षित नाहीत.

आपल्या ठेवी वेगवेगळ्या बँकांमध्ये असतील तर हे संरक्षण कशा प्रकारे मिळते?
एकापेक्षा अधिक बँकांमध्ये ठेवी ठेवल्या असतील, तर प्रत्येक बँकेतील
रु. १ लाखपर्यंतच्या ठेवींना हे संरक्षण लागू होते.  मात्र एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ठेवी ठेवल्या असतील तर - ‘एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये असलेल्या एकाच व्यक्तीच्या ठेवींची एकत्रित रक्कम जर रु. १ लाखपेक्षा जास्त असेल, तर हे संरक्षण फक्त रु. १ लाखपर्यंतच लागू आहे.’ असा नियम आहे. तसेच व्याजासाठी वेगळे संरक्षण नाही. अधिक स्पष्ट करून सांगायचे म्हणजे, समजा ठेवीची रक्कम रु. १ लाख आहे आणि व्याज रु. २,००० आहे, तर संरक्षण रु. १ लाखपर्यंतच मिळेल; ठेवीची रक्कम रु. ७५,००० आहे आणि व्याज रु. ३,००० आहे, तर रु. ७८,००० या पूर्ण रकमेस संरक्षण आहे.  

एकाच बँकेतील एक ठेव अ आणि ब या नावांनी आहे, तर दुसरी ब आणि अ या नावांनी आहे, तर या दोन्ही  ठेवींना  विमासंरक्षण मिळेल?
दोन्ही ठेवींमध्ये नावे जरी सारखी असली तरी पहिले नाव वेगळे आहे, त्यामुळे विमासंरक्षणाच्या दृष्टीने या दोन्ही ठेवी वेगवेगळ्या समजल्या जातील. तसेच, समजा अ आणि ब या नावाने एकाच बँकेच्या एकाच अथवा वेगवेगळ्या शाखांत चार वेगवेगळ्या ठेवी आहेत आणि ब आणि अ या नावाने तीन वेगवेगळ्या ठेवी आहेत, तर ‘अ’चे पहिले नाव व ‘ब’चे दुसरे नाव असलेल्या चारही ठेवी एकत्रित धरल्या जातील आणि ‘ब’चे पहिले नाव व ‘अ’चे दुसरे नाव असलेल्या तीनही ठेवी एकत्रित धरल्या जातील.
ज्यामध्ये नावांचा क्रम वेगवेगळा आहे त्या ठेवी स्वतंत्र समजल्या जाऊन , प्रत्येकी १ लाखाचे संरक्षण प्राप्त करतील जसे – अ, ब आणि क, अ, क आणि ब, क, ब आणि अ, ब, अ आणि क, इ. इ.

हे विमा संरक्षण आणखी कशा प्रकारे मिळते?
आणखी पर्याय आहेत. समजा, व्यक्तीची वेगवेगळी खाती वेगवेगळ्या अधिकारांमध्ये (व्यक्ती, भागीदार, संचालक, इत्यादी) असतील, तर हे विमासंरक्षण पुढीलप्रमाणे लागू होते -  श्रीयुत अ यांचे व्यक्तिगत खाते, श्रीयुत अ – अबक आणि कंपनीचे भागीदार, श्रीयुत अ – कुमारी कचे वडील, श्रीयुत अ – अबक उद्योग लिमिटेडचे संचालक, इत्यादी.  अशा प्रकारे वेगवेगळ्या अधिकारांत ठेवलेल्या ठेवी असतील,  तर त्या वेगवेगळ्या गणल्या जातील आणि त्यांना विमासुरक्षा मिळेल.

या विम्यासाठी ठेवीदारांना काही हप्ता अथवा शुल्क भरावे लागते का?
नाही.  या विम्यासाठीचा हप्ता बँका भरतात.

बँकांमध्ये असलेल्या सरकारी योजनातील ठेवींनाही विमासंरक्षण आहे का?
वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये, जसे की भविष्य निर्वाह निधी, वरिष्ठ नागरिक बचतखाते, इत्यादींमध्ये बँकांमार्फत गुंतवलेली रक्कम ही बँक ठेवींमध्ये मोडत नाही. त्यामुळे हे विमासंरक्षण या ठेवींसाठी नाही. परंतु या योजना सरकारी असल्याने त्या संपूर्णपणे सुरक्षित गणल्या जातात.

जेव्हा एखादी बँक दिवाळ्यात निघून बंद पडते, तेव्हा ही रक्कम त्या बँकेवर नेमलेल्या प्रशासकामार्फत ठेवीदारांना दिली जाते.  
याविषयी आपणास अधिक काही जाणून घ्यायचे असेल, तर ती माहिती - https://www.dicgc.org.in/FD_A-GuideToDepositInsurance.html या लिंकवर मिळेल. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link