Next
विदर्भाची विजयी घोडदौड सुरूच!
शरद कद्रेकर
Friday, February 08 | 05:00 PM
15 0 0
Share this storyसलग दुसऱ्या वर्षी, विदर्भ संघानं रणजी करंडकावर नाव कोरण्यात यश मिळवलं. फैज फझलच्या विदर्भाच्या संघानं जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्र संघावर ७८ धावांनी विजय मिळवत रणजी करंडक आपल्याकडेच राखला. व्हीसीएवरील वैदर्भीय समर्थकांनी ‘विदर्भ झिंदाबाद’च्या घोषणांनी मैदान निनादून टाकलं. सामन्याच्या पाचव्या दिवशी, घरच्या मैदानावर विदर्भानं विजय मिळवला आणि संत्राबर्फी वाटून वैदर्भीय प्रेक्षकांनी आपला विजय साजरा केला. या विजयानंतर व्हीसीएचे अध्यक्ष अॅड. आनंद जैसवाल यांनी रणजीविजेत्या संघासाठी तीन कोटी रुपयांचं, तर बीसीसीआनं विजेत्या खेळाडूंना दोन कोटी रुपयांचं इनाम घोषित केलं.

अक्षय वखारेच्या गोलंदाजीवर आदित्य सरवटेनं धरमसिंग जाडेजाच झेल टिपला आणि उत्साहाला उधाण आलं. गेल्या वर्षीचा विजय हा काही ‘फ्ल्युक’ नव्हता हेच या विजयातून विदर्भानं दाखवून दिलं. रणजी करंडकाच्या या मोसमात विदर्भानं ११ सामन्यांपैकी ६ सामन्यांत निर्णायक विजय मिळवले. यातील ३ विजय तर साखळी सामान्यांतीलच होते. त्यांनी एकही सामना गमावला नाही, हे विशेष. यात योगायोगाची बाब अशी, की साखळी लढतीत विदर्भाला पहिल्या डावातील आघाडीवर हरवलं होतं ते सौराष्ट्रानं! परंतु त्या पराभवाची परतफेड विदर्भानं अंतिम लढतीत केली आपला प्रतिस्पर्धी सौराष्ट्रला ७८ धावांनी पराभूत करून! या सामान्यात ११ बळी घेणारा व संथ खेळपट्टीवर मौल्यवान ४९ धावा करणारा नागपूरचा आदित्य सरवटे सर्वोत्तम खेळाडू ठरला. फिरकी गोलंदाजीचा विलक्षण प्रभाव या संपूर्ण सामन्यात दिसून आला. २० पैकी १८ बळी आदित्य सरवटे व अक्षय वखारे या फिरकी गोलंदाजांच्या जोडीनं मिळवून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अक्षय कर्णेवरनं अंतिम सामन्यात मिळालेल्या संधीचं सोनं करत पहिल्या डावात ७३ धावांची निर्णायक खेळी केली व विदर्भानं धावफलकावर त्रिशतकी मजल मारली.

आदित्य सरवटेला यंदाचा मोसम स्वप्नवत ठरला. या मोसमात त्यानं ५५ बळी मिळवत विदर्भातर्फे सर्वात कमी सामन्यांत बळींचं शतक करण्याचा मान पटकावला. केवळ २२ सामन्यांत हा पराक्रम करताना उत्तम दंदेचा २५ सामन्यांचा विक्रम मोडीत काढला. शिवाय, रणजी करंडकात १००० धावांचा टप्पा गाठताना त्यानं उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात शतकही झळकावलं होतं. वासिम जाफरची फलंदाजी प्रथमश्रेणी क्रिकेटला नवीन नाही. त्यानं मोसमात १००० धावांचा टप्पा सहज पार केला. त्यात एका द्विशतकासह तीन शतकांचा समावेश आहे. परंतु अंतिम सामन्यात त्याचा प्रभाव पडला नाही. त्यानं स्लीपमध्ये काही अप्रतिम झेल पकडले, परंतु काही निर्णायक क्षणी त्याच्याकडून काही झेल सुटलेदेखील! तथापि, त्याचा संघात असण्याचा फायदा विदर्भाच्या युवा खेळाडूंना झाला.

आदित्यनं चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत बाद करून विदर्भाच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्यानं आपल्या यशाचं श्रेय आईला दिलं. आदित्यच्या वडिलांचा २० वर्षांपूर्वी अपघात झालेला असल्यानं गेली अनेक वर्षं ते व्हीलचेअरवरच असतात. त्यामुळे आईनंच आदित्यचा सांभाळ केला आहे. म्हणूनच आदित्य आपल्या यशाचं श्रेय आईला देतो. या विजयाबद्दल बोलताना प्रशिक्षक चंद्रकांत पंडित म्हणाले, की सांघिक कामगिरीमुळेच हा विजय प्राप्त झाला आहे. युवा खेळाडू अक्षय तायडेला ९५ धावा करूनही अंतिम सामन्यात खेळवण्यात आलं नाही, अशा त्यांच्या काही निर्णयांमुळे अनेक खेळाडूंना धक्का बसला असला तरी आयत्या वेळी संघात योग्य ते बदल करणं हीच चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाची पद्धत सर्वश्रुत आहे.

कर्णधार फैज फजल यानं सातत्यपूर्ण खेळ करून आपल्या संघाच्या यशात छोटी परंतु निर्णायक भूमिका बजावली. उपांत्य फेरीपासून झालेलं उमेश यादवचं पुनरागमन विदर्भासाठी शुभशकून ठरला. त्याच्या गोलंदाजीचा प्रभाव केरळविरुद्धच्या उपांत्य सामन्यात दिसला. त्या सामन्यात त्यानं आपल्या भेदक गोलंदाजीनं केरळच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यानं एकूण १२ बळी मिळवले आणि विदर्भानं अगदी रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र व्हीसीएच्या संथ खेळपट्टीवर उमेशची गोलंदाजी फारशी चालली नाही. तथापि, संधी मिळाल्यावर त्यानं विदर्भाला ‘ब्रेक-थ्रू’ मिळवून दिला व आपली गोलंदाजी किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित केलं.

रजनीश गुरबाणीला या मोसमात विशेष यश लाभलं नाही. याबाबत चंद्रकांत पंडित यांनीही नाराजी व्यक्त केली. कर्णधार फैजच्या मते, खेळाडूंवर दडपण हे असतंच. त्यातही अंतिम सामन्यात व घरच्या प्रेक्षकांसमोर त्याची विशेषत्वानं जाणीव होते. परंतु आमच्या युवा खेळाडूंनी जेतेपद आपल्याकडे राखून व्हीसीएचा विश्वास सार्थ ठरवला, असंही फैज पुढे म्हणाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link