Next
मराठमोळ्या मानसीने घडवला इतिहास
अमित मधुकर डोंगरे
Friday, August 30 | 03:30 PM
15 0 0
Share this story

अपघाताने अपंगत्व आलेल्या मानसी जोशी हिने पॅराबॅडमिंटन जागतिक अजिंक्यपदस्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालताना भारतासाठी इतिहास घडवला आहे. एक पाय कृत्रिम असताना कोणीही अशी कामगिरी करेल यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, मात्र मानसीने अशक्य ते शक्य करून दाखवून देशाची मान उंचावली आहे.
मुंबईकर असलेली मानसी दुचाकीवरून ऑफिसला जात असताना तिला ट्रकने घडक दिली. त्यात तिने एक पाय गमावला. तशा परिस्थितीतही मानसीने रुग्णालयापर्यंतचा प्रवास केला आणि उपचारानंतर तिला धातूचा पाय लावण्यात आला. एखादी कमकुवत मनाची व्यक्ती असती तर पुढे कसे करायचे, याची तिला चिंता लागली असती. मानसी त्या परिस्थितीतही खचून  गेली नाही. या अविश्वसनीय
जिद्दीच्या बळावरच तिने पॅराबॅडमिंटनस्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याकडे सराव करणाऱ्या मानसीने अत्यंत मेहनतीने हे यश मिळवले आहे. अंतिम सामन्यात तिने तीन वेळच्या जगज्जेत्या पारुल परमार यांच्यावर २१-१२ व २१-७ अशी सरळ दोन गेममध्ये मात करत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. पहिल्या गेममध्ये सुरुवातील मानसी पिछाडीवर होती. मात्र नंतर तिने पारुल यांचे कमकुवत दुवे हेरले व सामन्यात जोरदार मुसंडी मारली. पहिल्या गेममध्ये तिला झगडायला लागले. परंतु दुसऱ्या गेममध्ये तर तिने पारुल यांना प्रतिकाराची संधीच न देता सलग नऊ गुण जिंकत जगज्जेतेपदावर
नाव कोरले.
अपघातातून सावरल्यानंतर आणि कृत्रिम पाय बसवल्यानंतर मानसीला बॅडमिंटनवरील प्रेम शांत बसू देत नव्हते. अखेर मानसीने गोपीचंद यांच्या अकादमीत प्रवेश घेतला व स्थानिक तसेच त्याही वरच्या पातळीवरील स्पर्धेत सहभागी होत एकापाठोपाठ एक यश मिळवायला सुरुवात केली. तिने फिटनेसवर खूप मेहनत घेतली. सरावात शिस्त आणली आणि तिची विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. व्यायामाच्या सत्रात तिने वजन कमी करून स्नायू बळकट करण्यावर भर दिला. खेळताना सर्व्हिस जोरदार व्हावी यासाठी ती जिममध्ये कित्येक तास मेहनत करत होती. २०१५ सालापासून मानसी पॅराबॅडमिंटनमध्ये सहभागी होत आहे. जर्मनीची जागतिक कीर्तीची टेनिसपटू स्टेफी ग्राफ यांना आदर्श मानणाऱ्या मानसीच्या यशाचा आलेख कायम चढा होता आणि कारकिर्दीचा कळसाध्याय सिद्ध करत तिने अखेर विश्वविजेतेपद मिळवले व देशाची शान वाढवली. पॅराबॅडमिंटनमध्ये भारताच्याच पारुल परमार यांची असलेली मक्तेदारी मानसीने संपुष्टात आणली. ४६ वर्षांच्या पारुल कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर होत्या, तरीही त्यांनी मानसीला चांगलीच लढत दिली.
जागतिक क्रमवारीत आज मानसी दुसऱ्या स्थानावर आहे. तिने वयाच्या सहाव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी तिला घरच्यांचा कायम पाठिंबा लाभला. तिचे वडील भाभा अणुसंशोधन संस्थेत (बीएआरसी) शास्त्रज्ञ होते. निवृत्तीनंतर त्यांनी मानसीला पूर्ण साहाय्य केले. इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर असलेली मानसी अपघातानंतर पॅराबॅडमिंटनमध्ये सहभागी झाली.
मानसीने इंग्लंडमधील मिश्र-दुहेरीत रौप्यपदक जिंकले आहे, तर आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. यशाचा आलेख असाच उंचावताना तिने स्वित्झर्लंडमधील पॅराबॅडमिंटनस्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. मानसीप्रमाणे भारताची नवी फुलराणी पी. व्ही. सिंधूदेखील पी. गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. जागतिक बॅडमिंटनस्पर्धेत जगज्जेतपद मिळवल्यानंतर सिंधूला जशी प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी मानसीला मिळाली नाही. मानसीसमोर आता जागतिक पातळीवर सातत्याने यशस्वी होण्याचे आव्हान आहे. तिची जिद्दी वृत्ती व मेहनत पाहता ती या कसोटीला पुरेपूर उतरेल हे नक्की!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link