Next
उत्सव रामनवमीचा
सुरेश खरे
Friday, April 12 | 05:00 PM
15 0 0
Share this story


महिन्यापूर्वीची गोष्ट. संध्याकाळी घरी परतल्यावर दारातच सुलूनं सांगितलं,

“बरं झालं लवकर घरी आलात. रात्री सोसायटीतली मुलं तुम्हाला भेटायला येणार आहेत.”

“का, काही विशेष काम?”

“त्यांना म्हणे तुमच्याकडून कसलं तरी मार्गदर्शन हवंय.”

“कसलं ते नाही विचारलंस?”

“विचारलं, तर म्हणाले काकांशी डिटेलमध्ये बोलायचंय.”

“हुशार आहेत. ठीक आहे. येऊ दे त्यांना.”

हल्ली हे माझं मार्गदर्शनाचं प्रमाण नाही म्हटलं तरी बरंच वाढलंय. कोण कोण येत असतं मार्गदर्शनासाठी. सुरुवातीला मी फार उत्साहानं मार्गदर्शन करत असे. सुलूचं म्हणणं, ‘नाहीतरी तुम्हाला हौसच आहे ज्याला त्याला मार्गदर्शन करण्याची.’ ते काही खरं नाही. हौस वगैरे नाही पण ‘जे जे ठावे आपणांसी, ते ते सांगावे इतरांसी,’ अशी माझी उदार वृत्ती आहे. पण हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं. मार्गदर्शन म्हणजे, मार्गदर्शनासाठी येणाऱ्यांना त्यांच्या डोक्यात जे काही विचार असतात, कल्पना असतात त्यांना कुणातरी वडील माणसांकडून दुजोरा हवा असतो. हे माहीत असूनही माझा स्वभाव मुळात भिडस्त असल्यामुळे मी त्यांना नाउमेद करत नाही.

रात्री नऊ वाजता चैतू (चैतन्य), आंद्या (आनंद), दिलप्या (दिलीप), नचि (नचिकेत) आणि सुची (सुचित्रा) ही कॉलेजात जाणारी पाच जणांची गँग येऊन टपकली. या मुलांच्यात मी कधीकधी गल्ली क्रिकेट खेळतो म्हणून मला त्यांची नावं पाठ आहेत.

“बोला काय काम काढलंत काकांकडे?”

“काका, आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन हवंय.” चैतूनं सुरुवात केली.

“कशाबद्दल?”

“आमच्या मनात या वर्षी रामनवमीउत्सव साजरा करायचाय.” दिलप्या म्हणाला.

“अरे पण आपण सोसायटीत गणेशोत्सव साजरा करतो, रंगपंचमी खेळतो. आता रामनवमीचा उत्सव साजरा का करावासा वाटतोय?”

“काका, एक म्हणजे राम सेलिब्रिटी देव आहे, सर्वांना माहीत आहे आणि सॉलिड पॉप्युलरपण आहे.” चैतू म्हणाला.

तरुण मुलाना समजून घेताना मी त्यांच्या भाषेकडे लक्ष देत नाही. त्यांचं व्यक्त होणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.

“काका, आम्हा मुलांना खरं म्हणजे कृष्ण फार आवडतो.”

“का रे? कृष्ण का आवडतो?”

“आम्हाला तो आमच्यातला वाटतो. पण सुची आणि तिच्या मैत्रिणींना राम आवडतो.”

“आवडतोच मुळी. शिवाय त्याच्यावर खूप गाणी आहेत, असं माझी दीदी सांगत होती.” इति सुची.

“माडगूळकर नावाचे ग्रेट पोएट आहेत,” आंद्या म्हणाला.

“आहेत नाही, होते.” नचीनं आंद्याच्या बोलण्यात दुरुस्ती केली.

“तेच रे. त्यांनी रामावर गीतरामायण नावाची गाणी लिहिली आहेत.”

“अरे वा! तुम्हाला बरंच माहीत आहे.”

या तरुण मुलांना माडगूळकर आणि गीतरामायण ही नावं माहीत आहेत हे पाहून मला खरंच मनापासून बरं वाटलं.     

“बरं रामनवमीचा उत्सव साजरा करायला निघालात, मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना रामरक्षा येते? किती जण म्हणता?”

माझी कल्पना होती मुलं एकमेकांच्या तोंडाकडे पाहतील.

“सुची सोडून आम्हाला सर्वांना पाठ येते. रोज नाही, पण मधून मधून आम्ही म्हणतो.” आंद्या म्हणाला.

मला ते ऐकून धक्काच बसला.

“काका, आपल्या सोसायटीत फाटकगुरुजी आहेत ना, त्यांच्याकडे मागच्या वर्षी आम्ही गणपतीची वर्गणी मागायला गेलो तर त्यांनी विचारलं, ‘तुम्हाला कुणाला रामरक्षा येते?’ आमच्यापैकी कुणालाच येत नव्हती. तर ते म्हणाले, ‘मी तुम्हाला शिकवीन. शिकणार असाल आणि रोज म्हणणार असाल तर पाचशे रुपये वर्गणी देईन. नाही तर अकरा रुपये देईन. बोला. काय करता?’ मग आम्ही शिकलो. आणि कबूल केल्याप्रमाणे रोज म्हणतोही.”

मला मुलांचं कौतुक वाटलं आणि फाटकगुरुजींचंही. शाळेतून निवृत्त झाल्यावर वर्षभर संस्कारवर्ग घेतात. तेही विनामूल्य. का? तर आजच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत. मुलांचं कौतुक अशाकरता वाटलं की ती रोज नाही तरी मधूनमधून का होईना, म्हणतात.

“बरं, उत्सव करणार म्हणजे तुम्ही नेमकं काय करणार?”

“काका, उत्सव म्हणजे सगळीकडे एक नाचगाण्यांचा कार्यक्रम करतात.”  चैतू म्हणाला. (हे संस्कार फाटकगुरुजींचे नव्हते. हे समाजाचे संस्कार. मुलांचा काय दोष?)

“काका, नची म्हणतो, ‘आपण गीतरामायणाचा कार्यक्रम ठेवूया,’ पण दिलप्या म्हणतो, ‘नको. आपल्या एरियात सातआठ गीतरामायणाचे कार्यक्रम आहेत.”

“दिलप्याचं बरोबर आहे,” मी म्हणालो.

“मग काय करायचं?” सुचीनं विचारलं.

“मी सांगू? तुम्ही गाण्यांचा कार्यक्रम करा, पण तुमचा रामावरच्या गाण्यांचा कार्यक्रम.”

“आम्ही?” मुलं ओरडली.

“काय झालं? मघाशीच सुची म्हणाली, तिच्या दीदीला रामाची खूप गाणी येतात. आणि तुझी दीदी गातेपण. हो ना ग सुची?” सुचीनं मान डोलावली.

“आणखी बघा सोसायटीत कुणाला गाता येतं. त्यांना घ्या. बाहेरचा कार्यक्रम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः कार्यक्रम केला पाहिजे.”

“आणि तबला-पेटीचं काय करायचं?” आंद्यानं शंका काढली

“दिदीला गाणं शिकवायला मास्तर येतात त्यांना सांगू आपण. ते नाही  म्हणणार नाहीत. तबलजीपण तेच आणतील. आपण सांगू त्यांना.” सुचीनं प्रश्न सोडवला.

“मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली. रामजन्मीचा उत्सव म्हणजे नुसती रामावरची गाणी नाहीत. दुपारी रामजन्माचा सोहळा आणि कीर्तन ठेवलंत तरच तो रामजन्माचा उत्सव होईल.”

“ओके काका, कीर्तनाचा कार्यक्रम ठेवू. फाटकगुरुजीना सांगू ते आणतील चांगला कीर्तनवाला.” चैतू म्हणाला.

“एss कीर्तनवाला नाही, त्यांना ‘कीर्तनकार’ म्हणतात.” दिलप्यानं त्याला दटावलं.

“आणि तुम्ही कीर्तन ठेवलंत की तुमच्या घरची माणसंपण खूश होतील. वर्गणीहीण जास्त देतील. बघा.”

“काका, तुम्ही खरोखर ग्रेट आहात!”

मुलं जाम खूश झाली आणि कार्यक्रम ठरला. सोसायटीत बोर्ड लागला.

आज रामनवमीनिमित्त भव्य कार्यक्रम

दुपारी ह.भ.प. लंबोदर बोडस यांचं कीर्तन

रात्री १० वाजता गीतांची मैफल

‘रामा रघुनंदना’

सादरकर्ते : आमचे आम्ही मला नेहमी वाटत आलंय, तरुण पिढी चांगली आहे. आपणच त्यांना वळण द्यायला कमी पडतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link