Next
सचिऽऽन, सचिऽऽन!
सतीश स. कुलकर्णी
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

‘जपून खेळा, अशी सूचना मी सलामीच्या फलंदाजांना दिली होती; विशेषतः सेहवागला. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला भक्कम सलामी आवश्यक होती. खेळपट्टी चांगली आहे; उगीच धोका पत्करण्याची गरज नाही, असं वीरूला सांगून मी म्हणालो होतो, की दहा षटकांनंतर आपण वेग वाढवू!’ गंमत बघा, कर्णधाराच्या सूचनेची पार वाट लागली होती आणि तरीही तो अभागी कर्णधार तक्रार करण्याऐवजी खिदळत होता. सचिन आणि सेहवाग यांनी पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. पाचच षटकांत त्यांनी संघाचं अर्धशतक झळकावलं!
‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’मध्ये कर्णधार सौरभ गांगुलीनं ही मजेशीर गोष्ट सांगितली आहे. हा सामना २००३च्या विश्वचषक स्पर्धेतला. भारतानं सहा गडी व २६ चेंडू राखून सहज विजय मिळवला. सामन्याचा मानकरी होता ७५ चेंडूंमध्ये ९८ धावा करणारा सचिन तेंडुलकर!
आफ्रिका खंडातील ही पहिली स्पर्धा ९ फेब्रुवारी ते २३ मार्च २००३ या कालावधीत रंगली होती. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया यांनी ती आयोजित केली. त्यात सर्वाधिक १४ संघ सहभागी झाले. त्यामुळे सामन्यांची संख्या ५४ झाली. संघांची विभागणी दोन गटांत. गटवार साखळीनंतर प्रत्येक गटातून तीन संघ ‘सुपर सिक्स’साठी पात्र. त्यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीत, हे मागच्या स्पर्धेचं स्वरूप कायम होतं. बलाढ्य दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड ‘सुपर सिक्स’साठी अपात्र ठरले. त्याऐवजी झिम्बाब्वे संघ मात्र तिथपर्यंत गेला. कसोटी क्रिकेटसाठी पात्र नसतानाही उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणारा एकमेव संघ म्हणजे केनिया!
स्पर्धेचा अंतिम सामना सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ‘ट्वीट’ करून सर्वोत्तम खेळाडूचं नाव जाहीर केलं- सचिन तेंडुलकर! गांगुलीला चार गुणांनी मागे टाकून तो सर्वोत्तम ठरला. त्याची कामगिरी होतीच तशी! एकूण ११ सामन्यांतील तेवढ्याच डावांत ७५४ चेंडू खेळून ६७३ धावा. स्पर्धेतील विक्रम. त्यात एक शतक व सहा अर्धशतकं. स्ट्राइक रेट ८९.२५, सरासरी ६१.१८. शिवाय दोन बळी व चार झेल. धावांमध्ये त्याच्यानंतर येतात, गांगुली (४६५), रिकी पाँटिंग (४१५) व अॅडम गिलख्रिस्ट (दोघंही ऑस्ट्रेलिया- ४०८). गिलख्रिस्ट स्ट्राइक रेटमध्ये मात्र सचिनहून सरस १०५.४२!
पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध भारताची फलंदाजी काही बहरली नाही. संघाच्या २०४ धावांमध्ये सचिनचा वाटा ५२ धावांचा होता. नंतरच्या सामना ऑस्ट्रेलियाशी! ब्रेट ली व जेसन गिलेस्पी यांच्यासमोर नांगी टाकणाऱ्या भारतानं जेमतेम सव्वाशे धावा केल्या. त्यात सर्वोच्च ३६ सचिनच्या आणि खालोखाल २८ हरभजनच्या. हा सामना कांगारूंनी सहज जिंकला.
हरारेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापासून सेहवाग-सचिन जोडी जमली. त्यांनी १७.४ षटकांमध्ये ९९ धावांची सलामी दिली. सचिनच्या ८१ धावा झाल्या ९१ चेंडूंमध्ये. त्यात १० खणखणीत चौकार होते. भरात असलेल्या सचिनचा दुबळ्या नामिबियाला फटका न बसता तरच आश्चर्य. कॅडीक, अँडरसन, फ्लिंटॉफ यांच्या माऱ्यापुढेही सचिननं अर्धशतक (५० धावा ५२ चेंडू) झळकावलं. डावखुऱ्या आशिष नेहराच्या सहा बळींमुळे इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला.
१ मार्चचा सामना महत्त्वाचा होता. गाठ पाकिस्तानशी होती. शोएब अख्तर फुरफुरत होता. आदल्या दिवशी तो म्हणाला होता, ‘मी पेटलो आहे. मला एकदा लय सापडली, की भारतीय फलंदाजांचं काही खरं नाही.’ सामन्यातलं चित्र उलटंच होतं. सईद अन्वरच्या शतकामुळे पाकिस्ताननं सात गडी गमावून २७३ धावांची मजल मारली. वसीम अक्रम-अख्तर-वकार युनूस असा तोफखाना असल्यामुळेच कर्णधार गांगुलीनं ‘थोडं जपून’ खेळायला सांगितलं होतं. सेहवाग-सचिन वेगळ्या इराद्यानं मैदानात उतरले. अक्रमच्या पहिल्याच षटकात दोन चौकार गेले. मिजाशीत असणाऱ्या शोएबच्या पहिल्या षटकातील चौथा चेंडू थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि सचिनचा थर्ड मॅनवरून षटकार. त्याच्या पुढचे दोन चेंडू सीमापार! षटकात १८ धावा. त्याच्या जागी आलेल्या युनूसच्या षटकातही ११ धावा फटकावल्या गेल्या. या जोडीनं पाचवं षटक संपतानाचा संघाचं अर्धशतक पूर्ण केलं. सचिनची ही खेळी जबरदस्त होती. त्यानं अवघ्या ७५ चेंडूंमध्ये ९८ धावा केल्या. त्यात १० चौकार व एक षटकार होता. उद्दामपणाची किंमत शोएबनं १० षटकांत ७२ धावा मोजून चुकवली! स्फोटक व निर्णायक खेळी करणारा सचिन सामन्याचा मानकरी होता.
‘सुपर सिक्स’च्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतानं सहज विजय मिळवले. अंतिम सामन्याचा वेध घेताना माईक सेल्व्ही यानं ‘द गार्डियन’मध्ये लिहिलं होतं, ‘तेंडुलकरनं गेल्या काही आठवड्यांत अद्भुत कौशल्य दाखवून दिलं आहे. त्यात फक्त भक्कम बचाव नाही, तर मिड-ऑन व मिड-ऑफच्या क्षेत्ररक्षकांना उल्लू बनवणारे दिमाखदार ड्राइव्ह, शानदार फ्लिक आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link