Next
सिंग वॉज किंग
सतीश शं. कुलकर्णी
Saturday, May 25 | 09:00 AM
15 0 0
Share this story

स्पर्धा ऐन भरात आली असताना आणि विश्वविजेतेपदाची चाहूल लागली असताना युवराजसिंग म्हणाला होता, “एका खास व्यक्तीसाठी मला विश्वचषक जिंकायचा आहे.” सामन्यागणीक खेळ बहरत असताना त्यानं हे वक्तव्य केलं होतं. असं म्हणतात, की हे ऐकून सचिनला त्याची पत्नी म्हणाली होती, ‘ही खास व्यक्ती म्हणजे तूच.’ त्यावर सचिनचं उत्तर होतं, ‘नसावं तसं काही. त्याची कुणी खास मैत्रीण असेल. तिच्यासाठी...’
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २ एप्रिल २०११ रोजीच्या रात्री युवराजसिंगनं सचिनला खोटं ठरवलं! स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक स्वीकारल्यानंतर तो म्हणाला, “हा विश्वचषक सचिनसाठी आहे. आम्ही तो जिंकलाच!”
ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०११ या काळात भारत-श्रीलंका-बांगलादेश अशा तीन देशांमध्ये रंगली होती. ‘आजवरची सर्वोत्कृष्ट’ असं कौतुक झालेल्या या स्पर्धेची विविध वैशिष्ट्यं आहेत- मायभूमीवर विश्वविजेता होणारा पहिला संघ भारत ठरला. पहिल्यांदाच दोन आशियाई देशांमध्ये अंतिम सामना झाला. ‘डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम’चा (डीआरएस) अवलंब करण्यास तिन्ही यजमानांनी मान्यता दिली. वेस्ट इंडिजमधील स्पर्धेपेक्षा स्वरूप बदललं. संघ चौदाच आणि सामने ४९ झाले. चार गट ‘सुपर एट’ऐवजी, दोन गट आणि त्यातील प्रत्येकी चार संघ उपांत्यपूर्व फेरीत, अशी आखणी झाली.
‘अ’ गटात पाकिस्तान व ‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका अव्वलस्थानी राहिले. विजेतेपदासाठी झुंजलेल्या भारत व श्रीलंका यांनी गटात दुसरा क्रमांक मिळवला. तब्बल ६५६ धावा झालेल्या लढतीत आयर्लंडनं इंग्लंडला तीन गडी राखून हरवलं. त्या आधी इंग्लंड-भारत लढत ६७६ धावा होऊन बरोबरीत सुटली होती. उपांत्य फेरीतील चारपैकी तीन संघ आशियातले होते.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुन्हा एकदा अष्टपैलूची निवड झाली- युवराजसिंग! त्याची कामगिरी होतीच तेवढी मोलाची. तसं पाहिलं, तर ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर इंडेक्स’मध्ये त्याचा क्रमांक तिसरा होता. पहिला श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान. त्याचे गुण ८०० आणि नंतर होता ७९० गुणांसह पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी. युवराजचे गुण ७६७. मग तो सर्वोत्तम कसा ठरला? दिलशानला फलंदाजीत उत्तम गुण, गोलंदाजीत बरे. आफ्रिदी फलंदाजीत जेमतेम, गोलंदाजीत उत्तम. युवराजची कामगिरी दोन्ही ठिकाणी सरस. म्हणून कोणत्याच विषयात पहिला न येताही, तो एकुणात पहिला आला!
युवराजनं आठ डावांत चार वेळा नाबाद राहून ३६२ (सरासरी ९०.५, स्ट्राइक रेट ८६.१९, एक शतक, चार अर्धशतकं) धावा केल्या. त्याच्या डावखुऱ्या फिरकीनं २५.१३च्या सरासरीनं १५ बळी घेतले. वाट्याची १० षटकं प्रभावीपणे टाकू शकतो, असा विश्वास त्यानं कर्णधाराला दिला. सामन्यात पाच बळी व अर्धशतक, अशी कामगिरी करणारा तो विश्वचषकातला पहिला खेळाडू ठरला.
स्पर्धा रंगत गेली, तसा युवराज भरात आला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. गोलंदाजीत त्यानं काही केलं नाही. इंग्लंडविरुद्ध धोनीनं त्याला बढती दिली. तो फलंदाजीसाठी उतरला तेव्हा तिसावं षटक चालू होतं. धावफलक दोन बाद १८० आणि जोडीला तेंडुलकर. ही संधी साधत युवराजनं ५० चेंडूत ५८ धावा केल्या. टाय झालेल्या या लढतीत त्याच्यातील गोलंदाज पुन्हा अपयशी ठरला.
गोलंदाजीतील अपयशाची भरपाई युवराजनं आयर्लंडविरुद्ध वसूल केली. त्यानं १० षटकांमध्ये फक्त ३१ धावा देत पाच गडी बाद केले. आयर्लंडची मधली फळी त्याच्या फिरकीपुढं गोंधळून गेली. भारतानं पाच गडी राखून विजय मिळवला. सचिन, सेहवाग, गंभीर, कोहली यांच्याहून अधिक म्हणजे ५० धावा करणारा फलंदाज होता युवराजसिंग. सामन्याचा मानकरी निर्विवादपणे तोच! नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्यानं स्वतःला पुन्हा सिद्ध केलं. दोन बळी आणि संघाची काहीशी घसरगुंडी उडाल्यानंतर नाबाद अर्धशतक यामुळे विजय सोपा झाला. या कामगिरीनं त्याला सलग दुसऱ्यांदा सामन्याचा मानकरी बनवलं.
नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत भारतानं गमावली. युवराजनं फक्त १२ धावा केल्या. हाशीम आमला, जॅक कॅलिस, एबी डीव्हिलियर्स यांच्यापुढे त्याच्या फिरकीची मात्रा चालली नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध दोन बाद (गंभीर व तेंडुलकर) ५१, अशी स्थिती असताना युवी मैदानात उतरला. त्यानं कोहलीबरोबर २२, नंतर धोनीबरोबर ४५ धावांची भागीदारी केली. बाद झाला, तेव्हा त्याच्या नावापुढे खणखणीत ११३ धावा (१२३ चेंडू, १० चौकार, दोन षटकार) होत्या. वाट्याला आलेल्या चार षटकांत त्यानं डेव्ह थॉमस व आंद्रे रसेल यांचे बळी मिळवले. सामन्याचा मानकरी कोण, हा प्रश्न नव्हताच.
ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचं स्वप्न युवी वर्षभर आधीपासून पाहत होता. तो म्हणतो, ‘त्या सामन्यात मी खेळणार आणि विजयात वाटा उचलणार, असं चित्र दिवसाढवळ्याही रंगवत होतो.’ अहमदाबादच्या उपांत्यपूर्व सामन्यात रिकी पाँटिंगनं शतक झळकावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला पाच बाद २६० इतकीच मजल मारता आली. युवराजनं ब्रॅड हॅडिन व मायकेल क्लार्क यांना बाद केल्यानंच धावांच्या वेगाला लगाम बसला. भारतानं कांगारूंना पाच विकेट राखून हरवलं, तेव्हा तो ५७ धावांवर नाबाद होता. चौथ्या वेळी सामन्याचा मानकरी! मोहालीतील पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात युवराजसिंगनं भोपळाही फोडला नाही. त्याची उणीव गोलंदाजीत भरून निघाली. असद शफीक व युनीस खान यांची जोडी जमत आहे, असं वाटत असतानाच युवीनं आधी असदची यष्टी वाकवली. नंतर युनीसला रैनाकडे झेल द्यायला लावला.आता विश्वचषकासाठी सर्वस्व पणाला लावण्याची वेळ आली होती. गोलंदाज युवराजनं अर्शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या कुमार संगकाराला चकवलं. त्याला धोनीच्या हाती झेल देणं भाग पाडलं. पुढचा बळी होता तिलन समरवीरा. पायचितचं हे अपील पंचांनी फेटाळल्यावर युवीनं ‘रिव्ह्यू’ घ्यायला लावला. तो निर्णय अचूक ठरला आणि अर्धशतकी भागीदारी केलेली समरवीरा-माहेला जयवर्धन जोडी फुटली. नंतर धोनीनं विजयाचा षटकार मारला तेव्हा समोर होता युवराज (नाबाद २१). या दोघांनी ५४ धावांची नाबाद भागीदारी केली होती.
हा प्रवास युवराजसाठी सोपा नव्हता. आधीचं वर्ष वाईट म्हणावं असं गेलं होतं. संघातली जागा टिकवण्यासाठी धडपड करणं, स्वतःला सिद्ध करणं आवश्यकच होतं. आशियाई चषकस्पर्धेसाठी संघातून त्याला वगळलं होतं. त्याची तंदुरुस्ती, हरवलेला सूर याबद्दल शंका व्यक्त झाली होती. ग्लेन मॅकग्रासारखीच परिस्थिती. कशाला घेता त्याला विश्वचषकासाठी, असं विचारलं जात होतं. परंतु युवराजरूपी सोनं झळाळून उठलं. प्रकृतीच्या कुरबुरी सुरू असतानाही तो खेळत राहिला. ही कर्करोगाची चाहूल होती, हे नंतर कळलं.

‘फिनिशर’ धोनीचा षटकार
श्रीलंकेला सहा विकेट राखून पराभूत करत भारतानं विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं. गौतम गंभीरनं (९७) घातलेल्या पायावर कर्णधार धोनीनं (७९ चेंडूंमध्ये नाबाद ९१) कळस चढवला. तो सामन्याचा मानकरी निवडला गेला. या सामन्यात धोनीनं स्वत:ला बढती दिली. कोहली बाद झाल्यावर तो मैदानात उतरला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला- हा एवढ्या वर कशाला? तोवर विश्वचषकातल्या त्याच्या सर्वोच्च धावा होत्या ३४. गंभीरबरोबर शतकी भागीदारी करून त्यानं डावाला आकार दिला. मग युवराजला साथीला घेतलं. नुवान कुलशेखरच्या चेंडूवर लाँग-ऑनवर धोनीनं खेचलेल्या षटकारानं दोन गोष्टींवर शिक्कामोर्तब केलं- भारताच्या विश्वविजेतेपदावर आणि त्याच्यातील ‘फिनिशर’वर!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link