Next
अभिनयातील बारकावे शिकले!
योगिता राऊत
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story

अभिनयक्षेत्राकडे वळण्याचा निर्णय कसा घेतला?
- सहा-सात वर्षांची असल्यापासूनच अभिनयक्षेत्रात करिअर करणार, हे ठरवलं होतं. अभिनेत्री होण्याची इच्छा मनात नेहमीच होती, परंतु ती कुणालाच सांगितली नव्हती. याचं कारण लहानपणी माझं वजन जास्त होतं. जुहूच्या विद्यानिधी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर अकरावीत कॉलेजला गेले, पण पहिल्याच दिवशी घरी येऊन आईला सांगितलं,की कॉलेज झेपणार नाही.  वजन जास्त असल्यामुळेे माझा आत्मविश्वास खूप कमी झाला होता. त्यामुळे अकरावी, बारावीचा अभ्यास घरूनच केला. फक्त परीक्षेसाठी कॉलेजला गेले. या काळात वजन कमी केल्यानं माझा आत्मविश्वास परतला. बारावीनंतर मिठीबाई कॉलेजमधून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. केलं. बारावीची परीक्षा झाल्यानंतर आईला अभिनयातच करिअर करायचं असल्याचं सांगितलं. त्यानुसार वेगवेगळ्या नाट्यप्रशिक्षणशिबिरांना तिनं पाठवलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत बडोद्याला गेल्यावर नाट्यशिबिरांना जायचे.नीरज कबी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर अभिनयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. आलोक उल्फत, अनुपम खेर यांच्या प्रशिक्षणशिबिरांतून खूप काही मिळालं. त्यानंतर या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

‘माधुरी’ चित्रपटासाठी तुझी निवड कशी झाली?
- अनेकांना असं वाटतं, की ‘माधुरी’ चित्रपटासाठी माझी निवड आईमुळे वाघमारे -जोशीमुळे झाली नाही.ही निवड चित्रपटाचे निर्माते मौसीन अख्तर यांनी केली आहे. आईला माझ्याबाबत थोडी शंका होती.  कारण अभिनयाचं प्रशिक्षण जरी घेतलेलं असलं तरी तिच्यासमोर अभिनय कधीच केला नव्हता. तिच्या चित्रपटातून माझं चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण व्हावं, असं तिला अजिबात वाटतं नव्हतं. या चित्रपटाचे लेखक शिरीष लाटकर यांनी मौसीनसरांना माझी ‘नाऊ यू लिसन’ ही शॉर्ट फिल्म दाखवली. जी २०१९ च्या अॅकॅडमी अॅवॉर्डसाठी म्हणजे ऑस्करसाठी पात्र ठरली आहे. ती पाहून त्यांना विश्वास बसला.

‘काव्या’च्या भूमिकेसाठी काय मेहनत घेतली?
- प्रत्येक कलाकार हा आपली भूमिका उत्तम साकारण्यासाठी मेहनत घेत असतो. मीही अशी मेहनत घेतली. अभिनेत्री जयंती भाटिया यांच्याकडे व्हॉइस ट्रेनिंगसाठीही जायचे. ‘काव्या’ची भूमिका मला देण्याचा निर्णय मौसीनसर आणि आईनं घेतला. त्यानंतर आईनं भूमिकेसाठी मला गृहपाठ दिला. ज्याचा मला खूप फायदा झाला. काव्याची भूमिका साकारणं माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक होतं. कारण तिच्या एकदम विरुद्ध माझा स्वभाव आहे. ती उद्धट, बिनधास्त, स्वतःच्या नियमांवर जगणारी आहे. तर मी शांत, लाजऱ्याबुजऱ्या स्वभावाची आहे.

चित्रीकरणावेळची एखादी आव्हानात्मक गोष्ट?
- आमचं चित्रीकरण सुरू होणार होतं, त्याच्या आठवड्यापूर्वी घशाचं ऑपरेशन झालं होतं. पुढचे वीस दिवस तरी बोलायचं नव्हतं. घशातून आवाजच निघत नव्हता. चित्रीकरण पुढे ढकलून चालणार नव्हतं. त्यामुळे ही गोष्ट  खूप आव्हानात्मक होती.

आईसोबत काम करताना दडपण आलं का?
- आईसोबत काम करताना पहिले दोन दिवस खूप दडपण आलं होतं. मुळात आई खूप प्रोफेशनल आहे. त्यामुळे हा चित्रपट स्वीकारल्यानंतर तिनं सांगून ठेवलं होतं, की तुझ्यामुळे चित्रपटाला आणि इतर कोणाला त्रास होता कामा नये. एक तर इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे आणि इतक्या दिग्गजांसोबत काम करायला मिळतंय, त्यामुळे तिच्या सूचना मी तंतोतंत पाळल्या. आई दिग्दर्शिका आहे हे माहीत होतं, जसं चित्रीकरण सुरू झालं तेव्हा कळलं, ती दिग्दर्शिका म्हणून किती मोठी आहे. तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं ही मोठी गोष्ट आहे. सेटवर आमचं आई-मुलीचं नातं नव्हतंच. एक प्रोफेशनल दिग्दर्शिका आणि एक नवोदित अभिनेत्री असंच आमचं नातं होतं.

दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- सांभाळून घेणारे मौसीनसर सोनालीताई, शरददादा, विराजस, अक्षय आणि इतर दिग्गज, असं मस्त पॅकेज मला पहिल्याच चित्रपटात मिळालं. सोनालीताई खूपच प्रोफेशन आहे. जेव्हा आपण पहिल्यांदाच एखादी गोष्ट करतो त्यावेळी जी व्यक्ती आपल्याला पहिली दिसते, तिलाच डोक्यात ठेवून आपण पुढे जातो. माझ्यासाठी त्या व्यक्ती म्हणजे सोनालीताई आणि शरददादा. ते सिनिअर असूनही त्यांनी असंच कर असं कधीच सांगितलं नाही. त्यांनी माझ्यातील सर्जनशीलतेला मोकळीक दिली. सोनालीताईच्या उत्साहाला तोड नाही. शरददादाला लहानपणापासून ओळखत असल्याने मी खूप निर्धास्त असायचे.

आईचं आणि तुझं नातं?
- हा चित्रपट आई-मुलीच्या नात्यावर आहे. या चित्रपटातील आई-मुलीचं नातं आणि आमच्या नात्यात खूप साम्य आहे. त्या दोघी जसा कल्ला करतात, मजा-मस्ती करतात, तसाच आम्हीही करतो. मी आईला नेहमी म्हणते ‘माधुरी’च्या माध्यमातून तू स्वतःला प्रेक्षकांसमोर आणलं आहे. या चित्रपटात अशीही काही दृश्ये आहेत, ज्यात आई -मुलीचं पटत नाही. आमच्या बाबतीत मात्र हे जरा वेगळं आहे. आमच्या नात्यात तशी मोकळीक आहे. त्यामुळे वादविवादाचे प्रसंग फार कमी
असतात.                            

(मुलाखत : योगिता राऊत)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link