Next
शकुनाच्या पाच खिरी
वसुधा गवांदे
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

श्रावण महिना सुरू झाला आहे. इथून पुढे चार महिने सणवार, उत्सव यांची लगबग असणार. त्यामुळे घरोघरी गोडधोडाच्या पदार्थांसाठी सामानाची यादी तयार होऊ लागली असेल. या दिवसांत वातावरणातही सगळीकडे चैतन्य असतं. पावसाने हिरवागार झालेला निसर्ग मनाला प्रसन्न करतो. याच प्रसन्न मनाने तुम्ही जेव्हा एखादा गोड पदार्थ खास सणावारासाठी म्हणून घरी करता (रेडीमेड मिठाया नव्हेत) तेव्हा तो घरचा पदार्थ जिभेला, पोटाला आणि मनालाही सुखावून जातो. आज मी तुम्हाला शकुनाच्या पाच खिरी सांगणार आहे. खरं तर या खिरी नवीन नाहीत. तुमच्या घरी आई, आजीच्या पिढीला त्या ठाऊक असतील, पण आत्ताच्या पिढीला शकुनाच्या खिरी म्हणजे काय असा प्रश्न पडतो म्हणून आज त्याविषयी सांगणार आहे. प्रामुख्याने खीर हा प्रदार्थ सगळ्यांना आवडतो. या पाच खिरी म्हणजे गव्हले, शेवया, रव्याची खीर, मालत्या आणि गव्हाची खीर. या खिरींना शुभ मानलं गेलं आहे. शुभकार्यात, पंचपक्वानांमध्ये त्यांना मानाचं स्थान आहे. पूर्वीच्या काळी बायका घरी गव्हले आणि मालत्या करायच्या. अजूनही काही घरांमध्ये ते केले जातात. परंतु घरी करण्याचं प्रमाण आता खूप कमी झालं आहे. त्यामुळे हे पदार्थ विस्मृतीत चालले आहेत. आजकाल अस्सल मराठी दुकानांमध्येही गव्हले, मालत्या मिळतात.  याशिवाय शेवया, रवा आणि गव्हाची खीर यासाठी लागणारे साहित्य घरी असतेच. गव्हाची खीर नागपंचमीला केली जाते. ही अतिशय पौष्टिक असते. घरातील लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी तर उत्तमच. पूर्वी बायका घरी उखळीमध्ये गहू सडून घ्यायच्या. त्यातला कोंडा निघून गेला की मग तो गहू धुवून शिजवून घेता यायचा. आता हे सगळं शक्य नाही. म्हणून जाडा सोजी रवा मिळतो, तो घ्या. तो चांगला धुवून उकडून घ्यायचा. जेवढी पातळ खीर हवी असेल तेवढे त्यात दूध घालायचे. मग त्यात गूळ घाला आणि वरून जायफळ घालून उकळावे. खिरीत गुठळ्या होऊ नये म्हणून ढवळत रहा. ही एक खीर झाली. अशीच शेवयांची खीर करायची. शेवया कुस्करून थेंबभर तुपावर परतून घ्या आणि बाजूला ठेवा. दूध उकळायला ठेवा. दुधात साखर, बदाम, वेलची घाला. दूध उकळले की त्या शेवया घालायच्या आणि ढवळत राहायचे म्हणजे त्या एका जागी चिकटून त्याचा गोळा होणार नाही. शेवयांची खीर तर एकदम मस्तच होते आणि एकदम शाही वाटते. रव्याची खीर करण्यासाठी रवा थोड्याश्या तुपावर भाजून घ्यायचा. दुध उकळवून घ्यायचे. ते उकळले की त्यात साखर, बेदाणे घालायचे आणि मग रवा घालायचा. गव्हल्या आणि मालत्या लग्नात मुलीला सासरी जाताना देण्याची पद्धत आहे,  त्याच या गव्हल्या आणि मालत्या. पूर्वी गव्हाच्या पिठाच्या केल्या जायच्या. आता मैद्याच्या मिळतात. दुधात मैदा भिजवायचा आणि त्याचे गव्हले करायचे. ते टेबलावर ठेऊन वाळवायचे. वाळले की तुपावर परतून उकळत्या दुधात घालायचे आणि मग त्याची नेहमीसारखी खीर करायची. श्रावण-भाद्रपदातले जे सगळे सण आहेत त्या सगळ्या सणांना तसेच शुभकार्यात गव्हल्याची खीर लागतेच. मालत्यासुद्धा दुधात शिजवून त्यांचीही तशीच खीर करायची. या सगळ्या खिरी पौष्टिक आणि पोटासाठी उत्तम आहार आहेत. तेव्हा या चातुर्मासात शकुनाच्या या पाचही खिरी करा आणि अन्नसंस्कारांचा हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link