Next
संगीताची डिजिटल क्रांती
गणेश आचवल
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सध्या आपण सर्वच डिजिटलयुगात जगत आहोत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब बघितल्याशिवाय दिवस सरत नाही. त्यामुळे अनेकदा याच्यावरून टीकाही केली जाते. परंतु या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर केला तर त्यातून काही विधायक गोष्टींची निर्मिती होऊ शकते. असाच प्रयत्न ‘स्मृतिगंध’तर्फे केला जात आहे. आपल्याकडे संगीताचा अनमोल ठेवा आहे. काही दिग्गज गायक, संगीतकारांनी संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. हा अभिजात संगीताचा ठेवा आणि त्याबरोबर त्या व्यक्तिमत्त्वांंचे चरित्र, त्यांचा जीवनपट रसिकांसमोर आणण्याचा एक स्तुत्य उपक्रम ‘स्मृतिगंध’ने हाती घेतला आहे. डिजिटल माध्यमातून संगीताचा हा झळाळता इतिहास नवीन पिढीपर्यंत आणि सातासमुद्रापार राहणाऱ्या संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा  उद्देश आहे. याअंतर्गंत येत्या १५ जुलैला ‘स्मृतिगंध’ प्रकाशित ‘गंधर्वगान’ ही वेब सीरिज सुरू होत आहे.
‘आनंदगंधर्व’ म्हणून प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आनंद भाटे हे ‘गंधर्वगान’चे सादरकर्ते आहेत. यामध्ये संवादक आदित्य ओक असून, संगीतकार कौशल इनामदार आणि अभिनेता सुबोध भावे यांचा विशेष सहभाग आहे. यासंदर्भात ‘जाई काजळ’चे संचालक आणि ‘गंधर्वगान’चे निर्माते राजेश गाडगीळ म्हणाले, “ या वेब सीरिजची मूळ संकल्पना आनंद भाटे यांची आहे. पूर्वी आनंद भाटे आणि आदित्य ओक हे बालगंधर्वांच्या गायकीवर आधारित रंगमंचीय कार्यक्रम करायचे. परंतु कार्यक्रम करण्याला काही मर्यादा आहेत. आता लोकांकडे अडीच-तीन तासांचा कार्यक्रम जाऊन बघायला वेळ नाही, हे कटू असले तरी सत्य आहे. आजच्या पिढीचे विश्व, विशेषतः तरुण पिढीचे विश्व म्हणजे मोबाइल, फेसबुक आणि यू ट्यूब! एकदा आनंद भाटे यांच्याशी बोलताना गंधर्व गायकीची वैशिष्ट्यं वेब सीरिजच्या माध्यमातून दाखवता येतील का, अशी चर्चा झाली. त्यातूनच मग ‘गंधर्वगान’ची संकल्पना आकाराला आली. गंधर्वगायकी हा खूप मोठा विषय आहे,पण तो एक एक पैलू घेऊन वेब सिरीजच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोचू शकतो. येत्या १५ जुलैपासून या सीरिजला सुरुवात होईल. यामध्ये पंडित भास्करबुवा बखले यांच्यापासून असणारी गंधर्वगायकीची, गंधर्वघराण्याची परंपरा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ‘बालगंधर्व’ हे या गंधर्वगायकीतले एक अत्यंत महत्त्वाचे नाव. त्यांच्यावर आठ-नऊ भाग असतील,तसंच इतर भागांत पंडित भास्करबुवा बखले, छोटागंधर्व, सवाईगंधर्व यांच्या गायकीवर आधारित भाग असतील. आदित्य ओक हे आनंद भाटे यांच्याशी संवाद साधतील आणि ती गायकी अर्थातच शब्दसुरांच्या माध्यमातून आनंद भाटे उलगडून दाखवतील.”
साहजिकच ‘गंधर्वगान’ पाहिल्यानंतर जेव्हा आपण बालगंधर्वांनी गायलेले गीत ऐकू, तेव्हा त्यातले सौंदर्य आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणवेल. या सीरिजचा एका भागाचा कालावधी पंचवीस ते तीस मिनिटांचा असेल. ‘गंधर्वगान’ प्रोजेक्टमध्ये संगीतकार कौशल इनामदार यांचाही सहभाग आहे. याबाबत कौशल  म्हणाले, “या वेब सीरिजचे दोन भाग हे ‘बालगंधर्व’ चित्रपटाच्या संगीतावर आधारित आहेत. मुळात बालगंधर्व हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यात ‘बालगंधर्व’  चित्रपटाचं संगीत हे माझ्या दृष्टीनं खूप आव्हानात्मक होतं. या चित्रपटाच्या संगीतनिर्मितीत अर्थातच माझ्याबरोबर आनंद भाटे, आदित्य ओक आणि प्रसाद पाध्ये यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘बालगंधर्व’ चित्रपटाचं संगीत लोकांना इतकं भावलं होतं की दोन दिवसांत या चित्रपटाच्या अकरा हजार सीडीज विकल्या गेल्या होत्या. या सर्व आठवणींना आम्ही ‘गंधर्वगान’मधून उजाळा देणार आहोत. आज मोबाइलचा जमाना आहे, बालगंधर्वांची गीतं आयपॉडच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून लोकांसमोर आणणं हे एक आव्हान होतं. आणि तरुण पिढीला नाट्यसंगीत नक्की आवडतं, हे अशा उपक्रमातून सिद्ध होतं. डिजिटल माध्यमाविषयी असं सांगेन की आपल्या मागच्या काळात जे चांगलं घडलं, जे संगीत अभिजात आहे, उत्तम आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी या पुढच्या  काळातील माध्यमांचा उपयोग व्हायलाच हवा. आज विविध उपक्रम हे डिजिटल माध्यमातून येत आहेत, हे माध्यमांचं लोकतांत्रिकीकरण आहे, असं मी म्हणेन. कारण इथे टीआरपीची गणितं नाहीत. आपला जो सांगीतिक विचार आहे, तो आपल्याला हव्या त्या प्रकारे प्रामाणिकपणे लोकांसमोर आणण्याचं डिजिटल मीडिया हे माध्यम आहे. त्याचा अधिकाधिक वापर होतोय,हे स्वागतार्ह आहे.”
अशा प्रकारचे उपक्रम लोकांपर्यंत पोचवण्यात महत्त्वाचा वाटा आहे तो ‘स्मृतिगंध’ या ऑनलाइन व्यासपीठाचा. ‘स्मृतिगंध’ या ऑनलाइन व्यासपीठाला सुरुवात झाली मे २०१७ साली! याचे संस्थापक अमित टिल्लू म्हणाले, “अभिजात संगीत लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा मूळ हेतू आहे. अभिजात संगीताचा ठेवा लोकांना आजच्या डिजिटल माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्मृतिगंध’चे आमचे व्हॉट्सअॅपचे  पाच कन्टेन्ट ग्रुप्स आहेत तर नऊ व्हॉट्सअॅप ग्रुप हे विविध शहरांत राहणाऱ्या लोकांचे आहेत. यात अमेरिकेतील लोकांचाही समूह आहे . ‘गंधर्वगान’ची लिंक ही त्या ग्रुप्सनासुद्धा पाठवली जाईल.”  सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की हा उपक्रम विनामूल्य आहे.

‘अनादि मी अनंत मी’
‘स्मृतिगंध’प्रमाणेच आणखी एका उपक्रमाचा इथे उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे ‘अनादि मी अनंत मी’ या नाट्यकलाकृतीचा. ‘अनादि मी अनंत मी’ हे माधव खाडिलकर लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट उलगडणारे नाट्य. या नाटकाचा पहिला प्रयोग २६ फेब्रुवारी १९८४ साली रंगभूमीवर सादर झाला होता. १९८५ साली या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन लंडनमध्ये इंडिया हाऊसच्या वास्तूत झाले. २०१६ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पन्नासाव्या आत्मार्पण स्मृतिवर्षानिमित्ताने या नाटकाचे नाट्यअभिवाचन स्वरूपात पुनर्निर्माण करण्याची इच्छा ओंकार खाडिलकर याच्या मनात निर्माण झाली. पुणे-मुंबई येथील पंचवीस-तीस जणांना घेऊन, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून तालमी सुरू झाल्या.  त्यानंतर पहिला प्रयोग भरत नाट्यमंदिर येथे हाऊसफुल्ल झाला. सुमारे तीनशे प्रेक्षकांना नाट्यगृहाबाहेरून परतावे लागले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने ओंकार खाडिलकर याने ‘अनादि मी अनंत मी’ ही नाट्यकृती ध्वनिनाट्य पद्धतीने डिजिटल मीडियाचा वापर करून प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचे ठरवले . ओंकार म्हणाला , “आम्ही ‘अनादि मी अनंत मी’ हे नाटक पुन्हा नव्यानं रेकॉर्ड केलं. हे नाटक माझ्या वडिलांनी म्हणजे माधव खाडिलकर यांनी लिहिलं असून  त्याचं संगीत माझ्या आईनं अर्थात आशा खाडिलकर यांनी केलं आहे. यात सोळा गाणी आहेत. सध्याचा काळ डिजिटल माध्यमाचा आहे आणि ही माध्यमं अनिवार्य आहेत. या माध्यमातून लोकांना आपण आपलंसं करायला हवं. सावरकरांचं व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा याचा उद्देश आहे. नाट्यप्रयोग  रंगमंचावर विनामूल्य सादर केला तरी त्याला मर्यादा आहेत. डिजिटल माध्यमातून एकाच वेळी तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोचू शकता. सध्या लोकांकडे नाटक बघण्यासाठी दोन तास असतीलच असे नाही. त्यामुळे गाडी चालवता चालवता, प्रवास करता करतासुद्धा तुम्ही ज्याचा आनंद घेऊ शकता असं हे डिजिटल माध्यम! आम्ही या नाटकाचे पंधरा मिनिटं प्रत्येकी असे काही भाग तयार केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून २८ मे २०१९ पासून ‘अनादि मी अनंत मी’ हे ध्वनिनाट्य आपल्याला उपलब्ध झालं आहे. हे ध्वनिनाट्य उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आणि रिव्हर्ब कट्टा या डिजिटल मनोरंजन मीडियाच्या सहकार्यानं विनामूल्य स्वरूपात www.reverbkatta.in  या संकेतस्थळावर, तसंच बुकगंगा, स्नॉवेल या ऑडिओ अॅप्सवर उपलब्ध आहे. हे ध्वनिनाट्य www.eprasaran.com इथंही उपलब्ध आहे. ‘अनादि मी अनंत मी ‘ या यू ट्यूब चॅनेलवर बारा भागांत उपलबल्ध आहेत.”
डिजिटल माध्यमांचे जसे तोटे आहेत तसे फायदेही आहेत. या माध्यमाचा स्तुत्य वापर केला तर त्यातून असे काही विधायक उपक्रम नक्कीच राबवले जाऊ शकतात…
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link