
हे लहान आकाराचे फुलपाखरू झुडुपं आणि गवताळ प्रदेशात आढळते. माळरानावर उगवणाऱ्या लहान-लहान फुलांवर ही फुलपाखरं बसतात. नराच्या पंखावर वरच्या बाजूला निळा रंग असतो तर मादीच्या पंखावर वरच्या बाजूला तपकिरी रंग असतो. आकाराने लहान असणाऱ्या फुलपाखरांची जी जात भारतात अस्तित्वात आहे, त्या वर्गातील हे फुलपाखरू आहे. हिमाचल प्रदेशात २४०० मीटर उंचीपर्यंत ही फुलपाखरं पाहायला मिळतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात बराच वेळ एकाच ठिकाणी पंख पसरून स्थिर बसलेली असतात.