Next
अवघड नात्यातील समतोल
वंदना सुधीर कुलकर्णी
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story

सासू-सून या नात्याबद्दल जितकं बोललं, लिहिलं, दृश्यमाध्यमातून दाखवलं जातं, तितकं इतर कुठल्याही नात्याबद्दल क्वचितच होत असेल! त्यात आणखी वेगळं ते काय लिहायचं, असा मला प्रश्न पडला आहे. मी अमेरिकेत असताना एकदा मला माझ्या एक अमेरिकन मैत्रिणीचा फोन आला. ती वैतागलेली होती. म्हटलं, काय झालं आज तुला? तर म्हणाली, “You know what, I am having my hands full with my own problems. On the top of that, my mother-in-law is visiting us tomorrow for couple of days!” मी कपाळावर हात मारून घेतला! हा सार्वकालिक प्रश्न इतका जागतिकही असेल याची तोपर्यंत मला कल्पनाच आली नव्हती. अमेरिकेतल्या वास्तव्यात देशोदेशीच्या खूप मैत्रिणी झाल्या होत्या. प्रत्येक देशाप्रमाणे प्रत्येकीचं सगळंच वेगळं! मात्र ‘सासू-सून’ नात्याविषयीचं मत सगळीकडे सारखंच! मला या गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटत आलं आहे, की गेल्या काही वर्षांत जग आणि आपलं त्याभोवतालचं जगणं किती बदललं! माणसांची जीवनशैली, राहणीमान वरवर किती सुधारलं. मग या बदलांना अनुकूल, अनुरूप, सर्वांसाठी समावेशक होणारे कालसुसंगत, वेगळे विचार आपण का बरं करू शकत नाही? माध्यमांनाही हा विचार वेगळ्या, अधिक निकोप पद्धतीनं का करता येऊ शकत नाही? गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’मध्ये तिनं एका समतोल सासूचं (सुलभा देशपांडे) फार लोभस रूप दाखवलं आहे, परंतु असे चित्रपट, नाटकं, मालिका अपवादात्मकच. माझ्या या अनुत्तरित प्रश्नाकडे इतर कसे बघतील हे काही आपल्या हातात नाही. मात्र सासू होण्यापूर्वीच, आपणच स्वत:ला आधीपासून सासूच्या वेगळ्या भूमिकेत ठेवलं नि आपल्या सुनेला आपला कमीत कमी त्रास होईल यासाठी काय काय करता येईल, असं बघायचं ठरवलं तर माझ्यासमोर पुढील गोष्टी येतात.
मुळात मुलांनी लग्नं केली तर आपण सासू बनणार. त्यामुळे सुरुवात मुलांच्या लग्नापासून! मुलांचा लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा आणि त्यांचाच असला पाहिजे, नाही का? यात त्यांचे पुढील निर्णय आले.

लग्न मुळात करायचं की नाही? करायचं असेल तर केव्हा करायचं? कुणाबरोबर करायचं? कशा पद्धतीनं करायचं? कारण, माणसं आता flying balloonमध्ये वगैरेसुद्धा लग्न करायला लागली आहेत! परवाच तरुणांबरोबरच्या एका कार्यक्रमात गप्पा मारताना एक मुलगा म्हणाला, की आम्ही दोघंच एका अप्रसिद्ध बेटावरच्या बीचवर जाऊन लग्न करणार आहोत. परत आल्यावर अगदी जवळच्या लोकांना जेवण देणार. (जोपर्यंत त्यांच्या लग्नाचा खर्च ते करताहेत, तोपर्यंत ते लग्न कसे का करू देत बापडे!) थोडक्यात, सगळ्यांनी आपापल्या मुलांची लग्नं अशा-तशा पद्धतींनी केली. (त्यात खर्चिक, मोठी, हौसेनं केलेली वगैरे हल्लीच्या प्रथेनुसार अध्याहृतच!) म्हणून माझ्या मुलांनी तशीच करायला हवी या ‘copy cat’ वृत्तीचं मनाच्या गाभ्यापासून उच्चाटन! कारण तरच ही त्यांच्या (मुलांच्या) गृहस्थाश्रमाची आणि आपल्या वानप्रस्थाश्रमाची सदृढ सुरुवात होऊ शकेल. लग्नानंतरचं त्याचं जीवन- त्यांनी कुठे, कसं राहायचं, संसार कसे करायचे (हल्ली तेही ‘long distance’ असू शकतात!), त्यात त्यांची नवरा-बायको म्हणून भूमिका (घरगृहस्थी संदर्भातली) काय असावी, मुलं हवी की नको (मुळात), केव्हा, किती, त्यांचं वाढवणं, शिक्षणं इत्यादी. (थोडक्यात, पालकत्वाच्या त्यांच्या कल्पना) नवरा-बायकोचं करिअर... हेही सर्व त्यांचे निर्णय आहेत. आपला त्याच्याशी कसा संबंध असू शकतो याची ‘विवेकी’ उत्तरं मला मिळालेली नाहीत. वानप्रस्थाश्रम असं सांगत नाही, की कुटुंबापासून स्वत:ला तोडा. त्याचं तत्त्वज्ञान असं आहे, की मुलांच्या गृहस्थाश्रमात तुम्ही भावनिकदृष्ट्या गुंतणं बंद करा. त्यांनी सल्ला विचारला तर त्याला उत्तर देताना, “मला असं वाटतं”, “मला यातलं फार कळत नाही; जितपत कळतं तेवढं सांगते/सांगतो. परंतु निर्णय तुमचा” किंवा अगदी “मला यातलं खरंच कळत नाही; पण तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या दृष्टीनं या विषयात जाणकार असलेल्या अमुकतमुक व्यक्तीला तुम्ही विचारू शकता...” इतकं पारदर्शीपणे सांगता आलं पाहिजे.

जगामध्ये सर्व सामाजिक वा सांस्कृतिक गोष्टी (सण, समारंभ इत्यादी) या नैसर्गिकरीत्या समूहानं राहणाऱ्या माणूस नावाच्या सामाजिक प्राण्यांना एकत्र येऊन भावना-विचारांचे आदान-प्रदान करण्याची निमित्तं आहेत. कौटुंबिक नाती निकोपपणे जुळलेली ठेवायची असतील, तर तेवढं एकत्र येणं-राहणं पुरेसं आहे, असतं. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही यथायोग्य म्हण ही आपल्या पूर्वजांचीच! जसं आपल्याला मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात भावनिकदृष्ट्या गुंतायचं नाहीये, तसंच त्यांनाही आपल्यामध्ये गुंतलेलं ठेवायचं नाहीये. काही मुलांना जमेल तेवढे आपल्या आईवडिलांकडून घास भरवून घ्यायला आवडतात आणि आईवडिलांनाही त्यात फार-फार धन्यता वाटते. निसर्गातील कुठल्याही जाती-प्रजातीमधील अपत्य (off springs या अर्थी) काही महिन्यांच्या वर आपल्या जन्मदात्यांवर अवलंबून राहत नाहीत. माणसाच्या अपत्यासाठी स्वयंपूर्ण व्हायला थोडी-थोडकी नाही तर अठरा वर्षं दिलेली आहेत. त्यानंतर तुम्ही सर्व पातळ्यांवर जसजसे स्वयंपूर्ण होत जाल, तसतसे जगण्याच्या शर्यतीत टिकून राहायला सक्षम बनाल. Self-survival आणि survival of the fittest या आपल्या जगण्याच्या नैसर्गिक प्रेरणा आहेत. त्या तुम्हाला बरोबर सक्षम बनवतात. कुणीही कुणाला आयुष्यभर पुरत नसतो आणि आपल्यासाठी उद्या काय वाढून ठेवलं आहे याची पुसटशी कल्पना/शंका नसतानाही, विचारशक्ती मिळालेला एकमेव माणूस-प्राणी, ‘माया’जालातून स्वत:ला मुक्त करू शकत नाही, हा आपल्या जगण्यातला केवढा विरोधाभास आहे! वर, असं जगू पाहणाऱ्यांना समाज नुसती नावंच ठेवत राहत नाही, तर जवळपास वाळीतच टाकतो वेगवेगळ्या रूपानं!

मुलं सारखी मदतीला बोलावतात (विशेषत: परदेशात राहणारी), काय करायचं? तुम्ही कितीही गोडवे गायले तरी निसर्गात नि:स्वार्थ असं काहीच नाही; कारण self-survival ही तर जगण्याची पहिली प्रेरणा. अन्नसाखळीवर तर सर्व निसर्गचक्र चालतं! त्यात नाती नैसर्गिक नाहीत; फक्त माणसांनी निर्माण केलेली; म्हणजे तर ती नैसर्गिक, नि:स्वार्थ असूच शकत नाहीत. त्यात भारतीय माणसांइतकी दुटप्पी आणि प्रवाहपतितवृत्ती तुम्हाला जगात अभावानंच आढळेल. त्यामुळे नात्यांमध्ये स्वार्थ गुंतलेला नाही (vested interests) हे माणसानं, परत स्वत:च्याच स्वार्थासाठी, जोपासलेलं myth आहे. यातील आणखी विसंगती म्हणजे आपल्याच सर्व संतांनी ‘कर्तव्य करा, पण मनानं त्यात गुंतू नका. जगात सुखही नाही, दु:खही नाही. आपलं भावनिक गुंतणं आपल्या आयुष्यात सुख-दुःख आणतं. आपल्या अहंकार आणि अपेक्षाभंगाची ती फळं आहेत’, हे लिहून ठेवलं आहे. ‘सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही’ आणि अनुभवानं माणूस पुरेसं काही शिकत नाही! म्हणून जन्मामागून जन्म देऊन परत-परत त्याला हे शिकण्याची संधी दिली जाते, अशी ती पुनर्जन्माची किंवा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याची कल्पना असावी! थोडक्यात, हे सगळं फार फार कठीण आहे प्रत्यक्षात करायला. तेव्हा पालक-मुलं नात्यात मदत देणं असो वा मदत घेणं, हा तोल कसा सांभाळायचा, तो ठामपणे पण संयतपणे कसा हाताळायचा, हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा प्रश्न आहे. करण्याबद्दलही काही नाही. पण हे ‘करणं’ तक्रारींना, अपेक्षाभंगांना, नकारात्मक भावनांना सोबत घेऊन येणारं ‘पॅकेज डील’ असतं. त्यामुळे सुख-दु:खं आलीच! म्हणून निर्णय विवेकानं घ्यायचे असतात; भावनांनी नाही! माणूस स्वार्थी आहे हे उघड गुपित आहे! त्यामुळे मुलांना ‘धरून’ राहण्याचं कारण आमच्या म्हातारपणाची आम्हाला काळजी! त्यात गैरही काहीच नाही. मात्र हल्लीच्या नातवंडांचा पाळणाघरात जसा सांभाळ होतो तसा आपलाही सांभाळ होणाऱ्या अनेक व्यवस्था आता निर्माण होत आहेत. काळाच्या गरजेनुसार हे होणारच. त्यात चूक-बरोबर, चांगलं-वाईट असं काही नाही! सामाजिक व्यवस्था या गरजेतूनच निर्माण होत असतात. काही वर्षांपूर्वी परदेशातील एका विचारवंतानं सांगितलं होतं, की एक दिवस असा येईल की ठरवलं तर माणसाला कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडण्याची गरज उरणार नाही! आजची तरुण पिढी या वास्तवाच्या किती जवळजवळ येत चालली आहे, हे आपण बघतो आहोतच!

सासू-सासरे होण्याच्या वयाच्या या टप्प्यावर, हे सर्व आपल्या आकलनाच्या पलिकडे आहे. अशा जीवनशैलीचा आपण विचारही करू शकत नाही. थोडक्यात, आपल्या कल्पनेतही न पेलणारं पिढीचं अंतर (Generation Gap) तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे तयार होत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठीच्या क्षमता वाढवताना तरुण पिढीची जी कुतरओढ, रस्सीखेच होत आहे, ती त्यांची जगण्यातली आव्हानं, आपल्या आकलनाच्या पलिकडची आहेत. त्यामुळे आपल्या वयाच्या चाळिशीपासूनच, आपल्या निवृत्तीनंतरच्या सर्व पातळ्यांवरच (जसं आर्थिक, भावनिक, सामाजिक, वैद्यकीय) स्वावलंबी आयुष्याचं आणि निरामय वार्धक्याचं आपण नियोजन करायलाच हवं. अनेक स्वयंसेवी संस्था व त्यांचे कार्यकर्ते त्यात आपल्याला मदत करत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघातूनही हे एकीचं बळ आपल्याला मिळू शकतं. शिवाय आपण माणसं जोडण्याची सर्वात मौल्यवान संपत्ती निर्माण करून ठेवली असेल, तर आपल्याला काळजी कशाची वाटते?
आपल्या मुलांवर आपलं प्रेम असणं हे आपण माणूस असण्याचं लक्षण आहे, परंतु ‘प्रेम’ म्हणजे नेमकं काय, याचा ‘खरा’ अर्थ ज्याला उमगेल, त्याला आधुनिक काळामधलं सासू-सासऱ्यांचं नातं आपल्या मुलांशी नेमकं कसं ठेवायचं ते नक्की कळेल. त्यासाठी मनाचा उदारपणा, विचारांचा मोकळेपणा, आणि वर्तनातील लवचीकता मात्र नक्की हवी! डोकावून पाहा तर स्वत:च्या अंतरंगात...
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link