Next
तुमचा टक्का वाढवा
विशेष प्रतिनिधी
Friday, April 26 | 05:00 PM
15 0 0
Share this story


महाराष्ट्रात आतापर्यंत जे मतदान झाले आहे ते जेमतेम ६० टक्क्यांपर्यंतच आहे. मतदानाचा हक्क बजावण्याचे वारंवार आवाहन करूनही मतदान इतके कमी होत असेल तर त्याच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. निवडणुकीचे मत हे लोकशाहीत सामान्य माणसाजवळ असलेले एक अहिंसक अस्त्र आहे. एरवी त्याच्या मताला कुणीही विचारत नसले तरी मतदानाच्या दिवशी त्याच्या या मताला अपार महत्त्व येते. त्यामुळे त्या दिवशी तरी आपल्या मताचे सामर्थ्य मतदाराने दाखवून देणे आवश्यक असते. परंतु मतदानाची इतकी कमी टक्केवारी पाहता, मतदाराला एकतर त्याला त्याच्या मताचे सामर्थ्य माहीत नसावे किंवा तो मतदानाविषयी बेफिकीर असावा किंवा मतदान करण्यासाठी त्याला उमेदवार किंवा राजकीय पक्ष लायक वाटत नसावेत. परंतु देशात सगळीकडे राजकारणाची, निवडणुकांची चर्चा चालू असताना फार थोडे लोक त्यापासून अलिप्त राहू शकतात. समाजात एक वर्ग असा आहे, की ज्याला मतदान, निवडणुका, राजकारण याच्याशी काहीच देणेघेणे नाही, तो स्वत:तच मश्गुल आहे. पण, बाकीच्या समाजावर राजकारणाचा परिणाम होत असतो व तो या ना त्या प्रकारे व्यक्त होत असतो. त्यामुळे समाजाची जी काही भावना असेल ती मतदानयंत्रातून दिसायलाच हवी. मात्र तसे होताना दिसत नाही. अन्यथा पुण्यासारख्या महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या जागृत शहरात फक्त ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान व्हावे याची संगती कशी लावावी? काही वेळेला मतदान करण्याच्या लायकीचा एकही उमेदवार दिसत नाही, उमेदवारांचे चारित्र्य, व्यक्तिमत्त्व किंवा कारभार उद्वेग आणणारा असतो व यांना मत का टाकावे असा प्रश्न पडू शकतो. सध्या अशी स्थिती अनेक मतदारसंघात आहेही, परंतु हा उद्वेगही मतदाराने व्यक्त नाही केला तर त्याची दखलच घेतली जाणार नाही. त्यामुळेच निवडणूकआयोगाने मतदारांना ‘नोटा’ किंवा ‘कुणालाही मत नाही’ हा पर्याय मतदानयंत्रावर ठेवला आहे. हा पर्याय अशा परिस्थितीत आवर्जून वापरला पाहिजे तरच राजकीय पक्षांना आपण मतदारांवर किती नालायक उमेदवार लादतो हे कळू शकेल. भारत ही जगातील एक अत्यंत जागृत लोकशाही मानली जाते, जगाने ती तशी आहे हे मानण्याचे कारणही आहे. मतदारांनी अनेकदा अनपेक्षित असे झटके राजकीय पक्षांना व हमखास यश मिळवणाऱ्या उमेदवारांना दिले आहेत. देशात इंदिरा गांधींनी कुप्रसिद्ध आणीबाणी लादली तेव्हा अनेक पाश्चात्त्य राजकीय निरीक्षकांनी भारतातील लोकशाही संपुष्टात आल्याचे व आता ती पुन्हा कधीच प्रस्थापित होऊ शकणार नसल्याचे भाकीत केले होते, पण भारतातल्या अशिक्षित व गरिबीरेषेखाली असणाऱ्या मतदारांनी या सर्व पाश्चात्त्य ढुढ्ढाचार्यांना खोटे पाडले होते. त्या निवडणुकीत सर्वसामर्थ्यवान इंदिरा गांधींना पराभूत करून मतदारांनी जगाला लोकशाहीचा चमत्कार काय असतो ते दाखवून दिले होते. त्यानंतर तीनच वर्षांनी याच मतदारांनी विश्वासास पात्र न ठरलेल्या जनता सरकारला खाली खेचून पुन्हा इंदिरा गांधींच्या हातात सत्ता दिली होती. सध्याचे राजकीय वातावरण अत्यंत उद्विग्न करणारे व कटुतेने भरलेले आहे व त्याला लोक वैतागले आहेत, कोण खरे व कोण खोटे असा प्रश्न पडावा असा प्रचाराचा गदारोळ सुरू आहे. परंतु यातले सत्य काय हे मतदाराला चांगलेच माहीत आहे. त्याने या सत्याचे स्मरण करावे आणि मतदानाला बाहेर पडून आपले मत व्यक्त करावे. येत्या टप्प्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे
हीच अपेक्षा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link