Next
व्हॉट्सअॅप एटिकेट
अमृता दुर्वे
Friday, February 01 | 04:00 PM
15 0 0
Share this story

आपल्यापैकी बहुतेकांचा सगळ्यात जास्त वेळ फोनवर कशात जात असेल, तर तो म्हणजे व्हॉट्सअॅप. दिवसातून किती वेळा बोट त्या हिरव्या चिन्हावर पडतं आणि किती वेळा किती संदेश टाईप होतात, याची बहुतेकांच्या बाबतीत गणना करणंही कठीण आहे. यातल्या काही गप्पा आपल्या अगदी दिवसेंदिवस चालू असतात.
शिवाय प्रत्येकाचे बरेच व्हॉट्सअॅप ग्रुप असतात, ते वेगळेच. या ग्रुपमधल्या प्रत्येकाचं एक अगदी विशेष कॅरेक्टर दिसून येत असतं. काही जण नुसतेच सगळे मेसेज वाचतात, कधीच काही लिहीत नाहीत. काही जण भसाभसा फॉरवर्ड्स पाठवतात. काही जण अगदी कर्तव्य असल्यासारखं प्रत्येक मेसेजला उत्तर लिहितात, अगदी फॉरवर्डलाही. काही जण एरवी बडबड करत असतात, पण जेव्हा हवं, तेव्हा मात्र मौन बाळगतात. व्हॉट्सअॅप वापरण्याच्या या सवयीवरून आता आपण त्या व्यक्तीविषयी काही आडाखे बांधू लागतो.

या व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये वावरताना नेमक्या कोणत्या गोष्टी पाळायच्या, हे जाणून घेउया-

 • व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करताना किंवा असलेल्या ग्रुपमध्ये कोणाचा तरी समावेश करताना आधी त्या व्यक्तीशी स्वतंत्रपणे बोलून त्यांची परवानगी घ्या. ग्रुपचा उद्देश काय, त्यात कोण कोण आहेत वा असणार आहेत, याची कल्पना द्या. त्यांचा होकार असेल, तरच त्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करा.
 • तुम्ही जर त्या ग्रुपचे अॅडमिन असाल तर ठरावीक चौकट किंवा ढोबळ नियम सर्व सदस्यांना सांगा. कोणत्या प्रकारचे संदेश पाठवलेले चालतील वा चालणार नाहीत, हे स्पष्ट करा.
 • उदाहरणार्थ, हाऊसिंग सोसायटीचा ग्रुप असेल, तर त्यावर फक्त कामाच्या गोष्टी शेअर करणं अपेक्षित असेल. अशा ग्रुपवर फॉरवर्ड्स किंवा गुड मॉर्निंग, गुड नाईट शेअर करणं योग्य नाही. संवेदनशील मजकूर, धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असणारा मजकूर पाठवू नये, हे आधीच स्पष्ट करा.
 • सर्वांच्या रुचीच्या गोष्टीच ग्रुपवर बोला. एका ठरावीक व्यक्तीसोबत ग्रुपवर वन-ऑन-वन बोलणं टाळा. ‘अ’ व्यक्तीला ‘क्ष’ व्यक्तीसोबत बोलायचं असेल तर बाकी सगळ्यांना ते मेसेजेस वाचण्याचा त्रास कशाला? त्यापेक्षा त्या एकट्या व्यक्तीशी थेट वेगळ्या चॅटमध्ये बोला.
 • व्हॉट्सअॅपवर आलेल्या प्रत्येक मेसेजला, प्रत्येक फॉरवर्डला तुम्ही पोचपावती दिलीच पाहिजे, असं नाही. अनेकदा फक्त थम्ब्स अप दाखवूनही काम होतं. पण त्याच वेळी एखाद्या गोष्टीवर तुमची प्रतिक्रिया वा उत्तर हवं असेल तर ते फार काळ द्यायचं टाळू नका. ग्रुप चॅटमध्ये पाठवलेला एखादा मेसेज कोणी, कधी पाहिला आहे, ते सहज कळू शकतं. त्यामुळे मेसेज पाहूनही उत्तर द्यायचं टाळू नका आणि उशीरा मेसेज पाहिला, असं खोटंही सांगू नका. त्यानं तुमचंच हसं होईल. त्यापेक्षा उत्तर द्यायला किती वेळ लागेल ते कळवा.
 • तुम्ही ज्या संवादाला उत्तर देताय, तो मेसेज येऊन बराच वेळ झाला असेल, आणि दरम्यान मध्ये इतर अनेक संदेश पडले असतील, तर तो मेसेज सिलेक्ट करून रिप्लाय अॅरो दाबून मग तुमचा उत्तरादाखल मेसेज लिहा. म्हणजे तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय हे इतरांनाही कळेल.
 • ग्रुपवर काही चर्चा सुरू असेल, एखादा विषय सुरू असेल, एखादा प्लान ठरत असेल तर त्यात मध्येच फाटे फोडणारे फॉरवर्ड्स भसाभसा टाकू नका. त्यानं मूळ विषय वा मुद्दा बाजूला राहतो. तुम्हाला त्या चालू संवादात रस नसेल, तर गप्प राहा, पण त्यावेळी इतर मेसेजेस टाकू नका.
 • सहसा एकाच वेळी ८-१० फॉरवर्ड मेसेजेस एकामागोमाग एक टाकू नका. बहुतांश मेंबर्स ती मेसेजेसची गाडी न वाचता, स्क्रोल करून पुढे निघून जातात.
 • एकच पण भलामोठा मेसेजही शेअर करू नका. उदाहरणार्थ, तुम्हाला आवडलेला एखादा लेख शेअर करायचा असेल तर तो अख्खा कॉपी-पेस्ट करायच्या ऐवजी, त्याची लिंक शेअर करा. ज्यांना खरंच तो लेख वाचायचा असेल, ते लिंकवर क्लिक करून तो वाचतील. सोबतच मजकूर, एखादी फेसबुक पोस्ट, लेख, कविता शेअर करताना मूळ लेखकाचं नाव काढून टाकू नका. योग्य श्रेय द्या.
 • मेसेजवर बोलताना तुम्ही नेमकं कोणत्या उद्देशानं बोलताय वा काय भावनेनं बोलताय हे कळणं कधी कधी कठीण जातं. म्हणजे हा टोमणा होता, कोपरखळी होती की तुम्ही गंभीर आहात, याचा समोरच्याला अंदाज लावावा लागतो. अशावेळी योग्य ते इमोजी वापरून तुमच्या भावना स्पष्ट करा.
 • मेसेज पाठवताना आपण तो योग्य ग्रुपमध्ये पाठवतोय ना, ते तपासून घ्या. आता पाठवलेला मेसेज खोडून टाकायची सोय आहे, पण अनेकदा तो डिलीट करण्याआधीच अनेकांनी वाचलेला असतो. तेव्हा आधीच काळजी घेतलेली बरी.
 • तुम्ही जर एखादा ग्रुप सोडत असाल, तर त्यामागे नेमकं काय कारण आहे ते सांगून मगच सर्वांची रजा घ्या. सर्वांना बुचकळ्यात पाडून अचानक तडकाफडकी ग्रुप सोडू नका.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link