Next
स्मृतिबंध
शाल्मली सरदेसाई
Friday, February 08 | 03:00 PM
15 0 0
Share this story


साधारण तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट… माझ्या फोनवर एसएमएस आला, हेमांगी पालकर अॅडेड यू इन ‘आर्यन १०अ ९३-९४ ग्रुप.’ लगोलग हेमांगीचा मेसेज आला, हाय नीला, मी हेमांगी. मी तुला आपल्या गिरगावमधील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या ‘१० अ ९३-९४ बॅच’ ग्रुपमध्ये अॅड केलेय. लग्नापूर्वी माझे नाव नीला बाबरे होते. मनात विचार आला अरे व्वा! इतक्या वर्षांनी म्हणजे जवळजवळ २४ वर्षांनी पुन्हा सर्व एकत्र येणार. उत्सुकता वाढतच होती. जुन्या आठवणींना उजाळा मिळणार होता. हळूहळू एकेक करून हेमांगीने शाळेतील ४०-४५ जणांशी संपर्क साधून सगळ्यांना एकत्र आणण्याचा चंगच घातला जणू!

एकमेकांशी संवाद सुरू झाले. आठवणींच्या गप्पा रंगत होत्या. कोण कुठे आहे याची माहिती मिळत गेली. आश्चर्य म्हणजे शाळेत असताना कधी विशेष न बोलणारी सर्व मुलेमुली एकमेकांशी अगदी मनमोकळेपणाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर बोलत होते. शाळेतील आठवणीतले किस्से, प्रत्येकाची टोपण नावे इत्यादी. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मनात आलेल्या आठवणी सांगत होता. मग, कोण कुठे राहते, मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, दिल्ली, इंदूर अगदी यूएसपर्यंत सगळे जण विखुरलेत. त्यात आम्ही सहा जण पुण्यात असतो असे समजले. त्यानंतर लगेचच आपण पुण्यात राहून कधीच भेट होत नाही, असे उद्गार

आपोआप तोंडून निघाले. शाळेतून बाहेर पडून बरीच वर्षे झाली. कोणी कोणाला भेटलेच नव्हते. क्वचित कोणी कोणाला भेटत होते. ठरले तर मग, पुण्यातील आम्ही सर्वांनी ब्रेकफास्टला भेटायचे ठरवले. त्यातही आज नको, उद्या, मग पुढल्या आठवड्यात, असे करता करता शैलेश म्हणाला आज ज्यांना जमतेय त्यांनी ८ वाजता या. जे येतील तेवढे तर भेटू. शेवटी मी, शैलेश आणि विश्वजित तिघे जण भेटणार असे ठरले. मला थोडा संकोच वाटत होता, की शैलेशसारखा हुशार विद्यार्थी, शाळेत कधीच कोणाशी जास्त संवाद नसायचा. काय आणि कसे बोलायचे हा प्रश्न उभा राहिला. परंतु भेटल्यावर अगदी मनमोकळेपणे संवाद सुरू झाले. एकमेकांच्या नोकरीव्यवसायाबद्दल विशेष न बोलता शाळेतल्या आठवणींविषयी बोलत राहिलो. हेमांगीने ठरवलेल्या रियुनियन कार्यक्रमाबद्दल चर्चा करत होतो, कसे जायचे, कुठे जमायचे इत्यादी. सगळ्यांच्या मनात आता ओढ होती ती सर्वांना भेटायची!

एकीकडे हेमांगी, नंदिनी, मनीष, प्रवीण यांनी सगळ्यांची मते घेत घेत कोणत्या तारखेला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करायचा याची रूपरेखा ठरवत होते. बरीच वर्षे मुंबईबाहेर राहिल्याने शाळेतील मित्रमैत्रिणी तसे दुरावलेच होते. एकदोघांशी मधूनमधून बोलणे व्हायचे. वाटले लोक इतके एन्जॉय करतात आपणपण करावे. अगदी लहान झाल्यासारखे वाटले. याच सुमारास अचानक आमचा छोटा-शिशुमध्ये असताना काढलेला ग्रुप फोटो कोणीतरी पाठवला. प्रत्येकजण ‘मी कुठे’ करून शोधत स्वतःची ओळख पटवून देत होता.

म्हणतात ना, ज्या गोष्टीची वेळ आली आहे ती होतेच होते. अगदी तसेच झाले. सगळेजण एकमेकांच्या संपर्कात होतेच. प्रत्यक्ष कार्यक्रम होईपर्यंत ऑर्गनायझिंग टीमच्या चौघांनी जी मेहनत घेतली तिला तोडच नाही. आपापले कामधंदे सांभाळून आठवड्यातून २-३ वेळा भेटायला लागले. कार्यक्रमाची रूपरेखा आकार घेऊ लागली. हा कार्यक्रम आपल्या बॅचच्या मुलामुलींना एकत्र आणायचा होता. आता बरीच मुले एकमेकांच्या संपर्कात होतीच, पण मुलींचे तसे नसते. त्यांची लग्नानंतर नावे बदलतात. संपर्क हळूहळू कमी होत जातो. परंतु आमचे ऑर्गनायझिंग मंडळ एकदम भारी होते! कार्यक्रम करायचा तर सगळ्यांना बरोबर घेऊनच करायचा. तारीख ठरली रविवार, २ डिसेंबर २०१८. दादरसारख्या मध्यवर्ती भागात एक छोटासा हॉल बुक केला. पूर्ण दिवसभराचा बेत ठरला. १ डिसेंबरचा दिवस ऑफिसमध्ये कसाबसा ढकलला. आधीचे महिना/दोन महिने निघतात, पण शेवटचे २-४ क्षण मात्र जाता जात नाहीत तसे झाले होते.

दोन तारखेला आम्ही पुण्याहून येणारे चौघे एकत्र भेटणार असे ठरले. त्यानुसार गिरीश आम्हाला पिकअप करणार होता. गडबडीत तो ठरल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी येऊन पोहोचला. मला फोन केल्यावर मी म्हटले, तू थांब. मी येतेच. त्यावर तो म्हणाला, थांब थांब फोन चालू ठेव आणि तुझा पत्ता सांग. बोलता बोलता, मोजून २ ते ३ मिनिटांत तो माझ्या घरापाशी हजर होता. चक्क ऑडी गाडीतून तो आला होता. मला थोडा संकोच वाटला. त्यावर तो म्हणाला, “अग बिनधास्त बस, आपलीच गाडी आहे.” यावरून त्याच्या मनातली आपुलकी सगळे काही सांगून गेली. सगळे कसे भेटतील, कसे दिसत असतील, मनात चक्रे फिरत होती. एक्साइटमेंट वाढत होती. ठरलेल्या वेळेपेक्षा चांगला अर्धा/एक तास आधी पोहोचलो. हळूहळू सगळे जमत होते. बहुतेक जण ओळखू आले, काही जण मात्र वेगळेच दिसत होते. तिथे पोहोचल्यावर मात्र सगळे परत लहान होऊन गेले आणि ओळखीचे वाटायला लागले. ओळख परेडच सुरू झाली. तसेच शाळेत असताना चालणारी चिडवाचिडवी चालू झाली... सगळे जुने संदर्भ आठवायला लागले. सगळ्या ग्रुपचे फोटो मिळवून ते एका बोर्डवर लावले होते. आपले स्वतःचेच जुने चेहरे बघून दुसऱ्यांपेक्षा स्वतःचेच हसू येत होते.

सगळ्यात आधी शाळेची प्रार्थना झाली. हेमांगी व मनीषने प्रस्तावना केली. आपण आपल्या आयुष्याची अमूल्य गोष्ट शेअर केली आहे जी म्हणजे आपले बालपण. गेली २४ वर्षे आपण दूर होतो, पण आता किमान संपर्कात तरी नक्कीच राहू. प्रत्येकाने स्वतःची ओळख करून दिली. शाळेची आठवण म्हणून शाळेचा बॅच सगळ्यांना भेट दिला गेला व तो अगदी आनंदाने सर्वांनी ताबडतोब आपल्या गणवेशावर लावला.

काहींनी शाळेतल्या गमतीदार आठवणी सांगितल्या. माटेबाईंचा इतिहासाचा तास व त्या तासाला त्या म्हणणारी ठराविक वाक्ये “अशाप्रकारे या ठिकाणी” आम्ही सर्वजण ‘त्या हे किती वेळा म्हणतात’ याची आकडेवारी काढत बसायचो... महालेसर, भोसलेसर इत्यादी शिक्षकांचा स्वभाव यावरही गप्पा रंगल्या.

आमच्या या ऑर्गनायझिंग टीमने एक व्हिडिओ क्लिप बनवली होती. त्यात सर्वांचे शाळेचे फोटो, सर्वांचे फॅमिली फोटो, गॅदरिंगचे फोटो या सर्वांची सुंदर मांडणी केली होती. त्यानंतर त्यांनी सर्वांना खरोखरच बालपणात नेले. वेगवेगळ्या खेळांची आखणी केली होती. त्याची सर्वांनी मजा लुटली. विजेत्यांना बक्षिसेसुद्धा देण्यात आली. संतोष हरगुडेला काय बक्षीस मिळाले याचे कुतुहूल होते. त्याने लागलीच ते फोडून बघितले असता त्याला बक्षिस म्हणून लॉलीपॉप मिळाले होते आणि त्याने ते लागलीच खायला सुरुवातदेखील केली. खरोखरच सर्वांच्या चेहऱ्यावरचे ते निखळ हास्य टिपावे असे चित्र होते.

एवढे सगळे झाल्यावर सर्वांनी मनमुरादपणे भोजनाचा आस्वाद घेतला. त्यातही व्हेज/नॉनव्हेज प्रकार ठेवले होते, जेणेकरून कोणीही नाराज होऊ नये. खूप सुंदर प्रकारे सर्व स्नेहसंमेलनाची आखणी केली होती.

यापुढे काय, असे म्हणत आश्चर्याचे धक्के देत होती ही टीम. जेवण झाल्यावर सगळ्यांना चक्क डीजेच्या तालावर नाचवायचे हे बहुधा पक्के होते. प्रत्येक जण त्यामध्ये सहभागी झाला. असे आनंदाचे क्षण रोजच्या धकाधकीच्या जीवनात मिळणे थोडे दुर्मिळच! घड्याळाचा काटा पुढे सरकत होता याचे भानही कोणाला राहिले नाही. समारोपाची वेळ जवळ आली होती. ज्या चौघांनी या कार्यक्रमाची रूपरेखा आखली त्यांचे भैरवी पाध्ये हिने छोटीशी भेट देऊन आभार मानले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची मुख्य सूत्रधार हेमांगी पालकर जिने सगळ्यांना एकत्र आणून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली तिचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. सर्वांनी असेच निदान वर्षातून एकदा तरी भेटुया असे निश्चित केले.


मैत्रीच्या नात्यावर पु.ल. देशपांडे यांनी लिहिले आहेच,

“मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही; एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही; पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं.”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link