Next
गोष्ट तशी जुनी
मंगला गोखले
Friday, January 11 | 05:00 PM
15 0 0
Share this storyगोष्ट तशी जुनी. १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील हे वास्तव. म्हटलं तर अद्भुत, म्हटलं तर करुण अशा जीवनाची ही कहाणी.
आज आपण एक कुतूहल म्हणून थायलंडची सहल करतो. याच देशात म्हणजे पूर्वीच्या सियाममध्ये घडलेली ही सत्यकथा. अनिष्ठ रूढी, प्रथांच्या अंधारात चाचपडणाऱ्या सयामी समाजाला दिशा दाखवणाऱ्या अॅना या शिक्षिकेची ही वास्तव कहाणी! अॅना अॅण्ड द किंग ऑफ सयाम. अॅनाच्या कागदपत्रांच्या आधारे मार्गारेट लंडन यांनी लिहिलेल्या या कहाणीचा मराठी अनुवाद केला आहे माणिक फाटक यांनी.

अॅना लिनोवेन्स ही एक तरुण इंग्लिश विधवा- दोन मुलांची आई. १८६२ साली सियामचा राजा महामोगकूत याच्या दरबारी गर्व्हेनस म्हणून नोकरीस राहिली. सहा वर्षांच्या लुईस या छोट्या मुलासह जहाजानं प्रवास करत सियामला पोचली. अब्राहम लिंकन हे तिचं दैवत. स्वातंत्र्य, लोकशाही आणि व्यक्तिगत अधिकाराविषयी तिची ठाम मतं होती. आपले हे विचार तिनं सियामच्या वास्तव्यात, राजवाड्यातील मुलांमध्येही रुजवले. साडेचार वर्षांच्या वास्तव्यातील ही अनुभवगाथा आज आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशी विलक्षण आहे.

अॅना मूळची वेल्समधील एका छोट्या गावची. नंतर ती आईबरोबर हिंदुस्थानात आली होती. मुंबई, पुणे, तिथली ब्रिटिशांची सत्ता, हे सारं पाहत होती. मुंबईचे सुरुवातीचे दिवस मजेत गेले, परंतु आपलेच देशबांधव इथल्या स्थानिकांना दडपण्यात धन्य मानतात, हे बघून तिला फार दु:ख झालं. याच दिवसांत मानवी स्वातंत्र्याबद्दल तिचं मत पक्कं झालं. माणसाचा वर्ण, लिंग, जात, धर्म काहीही असो, त्याचे काही जन्मसिद्ध हक्क असतात. ते डावलण्याचा कुणालाही अधिकार नाही.
अॅनाचा नवरा मेजर होता. विवाहनंतर ती मुंबईच्या मलबारहिल परिसरात राहत होती. नवऱ्याच्या निमित्तानं हिंदुस्थानातील अनेक शहरं, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, लंडन, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी वास्तव्य होतं. संस्कृत, अरेबिक, पर्शियन, सयामी अशा अनेक भाषा ती शिकली. वाघाच्या शिकारीचं निमित्त झालं आणि दोन मुलांसह सुखी संसारात रमलेल्या अॅनाच्या मेजर पतीचं निधन झालं. आर्थिक परिस्थितीचा प्रश्न निर्माण झाला.

सिंगापूरच्या वकिलातीतून तिला समजलं की सियामचा राजा इंग्लिश गर्व्हनेसच्या शोधात आहे. तेव्हा पत्रव्यवहार झाला आणि सियामी राजघराण्यातील मुलांना अध्यापन करण्याची संधी तिला मिळाली. इंग्रजी, विज्ञान, साहित्य इत्यादी शिक्षण मुलांना द्यावं पण अन्य मंडळींप्रमाणे ख्रिस्तीधर्माचा प्रसार करणार नाही अशा अटींवरच अॅना सियामला कामावर नेमलं गेलं.

सोमदत्त फ्रा परमेंद्र महा मॉन्गकुत हा सयामचा राजा. तो पाली मागधी भाषा, बौद्धसाहित्य व इतर अनेक गोष्टींचा विद्वान होता. खास करून खगोलशास्त्रात त्याला फार रस होता. स्वभावानं अतिशय चंचल, संशयी आणि संतापी होता. त्याला संतुष्ट करणं हे जवळजवळ अशक्य असे. हळूहळू अॅनाच्या शाळेचं बस्तान नीट बसलं. राजाच्या रखेल्या आणि ६७ मुलं यांना शिकवण्यासोबतच राजा मॉन्गकुतनं त्याच्या इंग्रजी आणि फ्रेंच पत्रव्यवहाराच्या संदर्भात अॅनाची मदत मागितली. अनेक देशांशी, विद्वानांशी राजाचा पत्रव्यवहार प्रचंड होता. काम दगदगीचं होतं. तेव्हा अॅनानं राजाला सांगितलं की तिनं जर राजाबरोबर काम करायचं असेल तर त्यानं तिला ते उभं राहून द्यावं. कारण तिला बेडकाच्या स्थितीत उभं राहून काम करावं लागे, जे तिला अशक्य होतं. राजानं तिचं म्हणणं मान्य केलं. एवढंच नाही तर तो खुर्चीवर बसलेला असेल तर तिनंही खुर्चीवर बसावं आणि तो जमिनीवर बसलेला असेल तर तिनंही जमिनीवर बसावं! हे तिला मान्य होण्याजोगं होतं.

अॅना हे काम करत असे तेव्हा फ्रा अलक, हा महाराजांचा मुख्य सचिव महालाच्या कोपऱ्यात हातपाय पसरून डुलक्या घेत असे. एकाचवेळी तो गुलाम आणि राजाचा वर्गमित्र होता. तो चोवीस तास राजाच्या कामासाठी बांधलेला असे. मात्र सततच्या कामामुळे तो दमलेला असायचा. कधी त्याला डुलक्यांबद्दल धमक्या दिल्या जायच्या, तर कधी राजाच्या बदलत्या लहरीनुसार त्याला जिवलग मित्र असल्यासारखी वागणूक मिळायची. कधीकधी तो त्याच्या घरी विश्रांतीसाठी लपून बसायचा. बायको सांगायची, तो कुठे आहे माहीत नाही. या मूर्ख सबबीवर राजा खूप संतापायचा आणि त्याच्या भयभीत झालेल्या बायकोला पकडून आणण्यासाठी सैनिक पाठवयाचा. फ्रा अलक समोर येईपर्यंत तिला कोठडीत बंदिस्त करून ओलिस म्हणून ठेवून घ्यायचा. हे सारं अॅना पाहत होती. समजून घेत होती. एक दिवस फ्रा अलक तिला म्हणाला, “मॅडम, पुढच्या जन्मी तरी मी स्वतंत्र मनुष्य असावं असं मला वाटतं.”

राजाच्या रखेल्या, ६७ मुलं यांना शिकवण्याबरोबरच राजाला अशा प्रकारे पत्रव्यवहारातही तिला मदत करावी लागे. त्यामुळे हुशार राजाच्या लहरी, क्रूर, संशयी स्वभावाविषयी अनेक गोष्टी तिला समजू लागल्या. राजाला आवडलेल्या स्त्रियांना त्यांच्या इच्छेविरुद्ध जनानखान्यात आणून टाकलं जाई. कुणाला समजायचं नाही की या अशा स्त्रीला कुठे ठेवलं आहे! राजवाड्याबाहेर तिला पाऊल ठेवता यायचं नाही.

‘ला ओर’ ही अशीच एक गुलाम स्त्री राजवाड्यात खितपत पडली होती. नुकतंच लग्न झालेली ती घराच्या पायरीवर बसली होती, तर अचानक तिचं तोंड आवळलं गेलं, हातपाय बांधले गेले आणि तिचं मुटकुळं तिच्या मालकिणीसमोर एक गुलाम म्हणून आणून टाकलं. घरच्यांना तिचं काय झालं ते कळलंच नाही. अचानक एक दिवस अॅनाला ती दिसली तेव्हा तिची सारी कहाणी समजली. अत्यंत विषादानं अॅनाला ती म्हणाली, “बाईसाहेब, आपण सर्वजण देवाची भक्ती करतो. सारी त्याचीच लेकरं! तरीही त्यानं काहींना मालक आणि काहींना गुलाम असं का करावं? जेवढी मी स्वातंत्र्याची इच्छा करते तेवढंच ते मिळण्याची शक्यता दूर जाते.” तिला धीर देत अॅना म्हणाली, “तुझे आईवडील मुसलमान होते, हे तुला सिद्ध करता आलं तर मी तुला मदत करू शकेन. सर्व मुसलमानांना इथे ब्रिटिशांचं संरक्षण दिलं जातं.”
मालकिणीला पैसे देऊन सुटका करून घेण्याचा उपायही एका नोकराणीनं तिला सुचवला, पण तिची मालिकीण ओ चोम तिला सोडायला तयारच नव्हती. म्हणाली, “तू जन्मजात गुलाम आहेस. मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही. तुझी सेवाच मला हवी आहे.”

अखेर अॅनानं राजाकडे मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधी मंडळाचं निवेदन सादर केलं, तेव्हा राजानं ‘मी जातीनं यात लक्ष घालेन’ असं कळवलं. मग हे सारं प्रकरण न्यायालयात गेलं. राजवाड्यातील प्रमुख महिला न्यायमूर्तींनी मालकिणीला प्रश्न केला, “ला ओरनं आपल्या स्वातंत्र्याची पूर्ण किंमत देऊ केली असतानाही तुम्ही तिला मुक्त का केलं नाही, याची समाधानकारक कारणं देऊ शकता का?” पायावर रांगत आलेल्या जमावातल्या प्रत्येक गुलाम स्त्रीचे डोळे आता मालकिणीकडे खिळले. तिनं उत्तर दिलं, “आम्हाला तिच्या सेवेची गरज आहे. आम्ही तिला मुक्त करू इच्छित नाही.”

त्यावर न्यायाधीशांनी कठोरपणे सुनावलं की, “या देशाचा कायदा आणि प्रथा यांनुसार प्रत्येकाला स्वत:ची मुक्तता करून घेण्याचा अधिकार आहे. आपल्या मालकाला योग्य ती किंमत अर्पण करून स्वत:ची मुक्तता करून घेण्याचा अधिकार आहे. मालकानं अशी किंमत घेण्याचं व गुलामाची सुटका करण्याचं नाकारलं तर त्याला दंड ठोठावला जाईल!”

तिथे जमलेल्या सर्व गुलाम स्त्रियांनी पटापट पानसुपारीच्या चंच्या उघडल्या आणि अॅनाकडे पैसे द्यायला सुरुवात केली. तशी सुटकेसाठी ठरलेल्या रकमेसाठी केवळ चार टिकल्स तिनं त्यातून उचलले आणि राजस्त्रियांना देऊ केले. तेव्हा कुठे ला ओर आणि तिच्या मुलाची सुटका झाली!

अशाचप्रकारे ला ओर, सुनंदा विस्मिता, लेडी तलप, सन क्लीन, वाणी राजकन्या, तृत्रिम फीम अशा अनेकांना अॅनानं केलेल्या मदतीमुळे तिथे असलेले मलायी, सियामी, चिनी, भारतीय असे सारेजण तिचा मनापासून आदर करू लागले. अॅनाला सियाममध्ये ‘गोरी देवता’ म्हणून सर्वजण मानू लागले. यामुळे केवळ गोरगरीबच नव्हे तर जनानखान्यातील स्त्रिया, राजवाड्यातील उच्च स्त्रियाही तिच्याकडे मदतीसाठी धाव घेऊ लागला. ‘गोऱ्या देवाकडे जा, तुमचं काम होईल’ असा भरवसा अनेक गांजल्या जिवांना वाटू लागला होता. त्यामुळे छळ, तुरुंगवास, पिळवणूक अशा अनेक केसेस तिच्याकडे येऊ लागल्या. सियामी प्रथेनुसार बचावासाठी वकील, ज्युरी हा काहीच प्रकार नव्हता. सर्व कामं न्यायाधीशानांच करावी लागत. राजवाड्यातील वातावरण, सुधारण्यापलिकडच्या चालीरीती, राजाचं क्रौर्य या साऱ्याचा आता तिला वैताग आला होता. राजवाड्यात गुलामांना दिली जाणारी वर्तणूक तिला आवडत नसे. याच्या विरोधात विचार करण्याचे संस्कार ती आपल्या शाळेतील राजपुत्रांना, विद्यार्थ्यांना देत असे. सारी समाजव्यवस्थाच बदलणं आवश्यक आहे, हे तिला जाणवत होतं. अशा परिस्थितीत राजपुत्र चुलालांगकॉर्न आपल्या तालमीत तयार होत आहे; आपले विचार आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले बिंबवले जात आहेत, ही गोष्ट तिच्या मनाला दिलासा देणारी होती.

बदलाचे वारे योग्य दिशेनं वाहत आहेत या भरवशावरच सियाममधून बाहेर पडण्याचं ती ठरवते. आता अॅनाला इथे येऊन साडेचार वर्षं झाली होती. आपल्यापरीनं तिची स्वातंत्र्यासाठीची धडपड रुजू लागली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पन्नास वर्षांनी अॅनाचा एक नातू सियामला गेला आणि ‘अॅना लिनोवेन्समॅडमचं घर कुठलं?’ म्हणून विचारू लागला तेव्हा लोक त्याच्याकडे खुळ्यासारखे बघू लागले. परंतु ‘गोऱ्या देवतेचं घर कुठलं?’ असं विचारल्यावर ते दाखवण्याची अहमहमिका लोकांमध्ये लागली होती.

तिचं स्वातंत्र्याविषयीचं स्वप्न राजपुत्रानं पुढे राजा झाल्यावर पूर्ण केलं. राजापुढे गुडघ्यावर रांगत येणाऱ्या गुलामांविषयी त्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली. तो अॅनाला म्हणाला होता, “मेमसाहेब, माझ्या हाती सत्ता आली तर मी एका स्वतंत्र राष्ट्रावर राज्य करेन. तेथे गुलामगिरी असणार नाही.” आणि खरोखरच त्याच्यावर राज्याभिषेक झाला तेव्हा त्यानं बॅँकॉकच्या (सियाम) जनतेसाठी नव्या राजवटीचा पहिला जाहीरनामा सादर केला. त्यानुसार राजापुढे रांगत चालणं आणि माणसाची पूजा करणं या गोष्टी लाजिरवाण्या आहेत, असं म्हणत गुडघ्यावर रांगण्याची, दंडवत घालण्याची पद्धत बंद करण्यात आली. त्याऐवजी उभं राहून आदरानं मान झुकवावी, असं जाहीर करण्यात आलं.

अॅनानं आपल्या विद्यार्थ्यांना दिलेली शिकवण खऱ्या अर्थानं फलद्रूप झाली. १ जानेवारी १८७२ पासून अशा तऱ्हेनं सियाममधील गुलामगिरीची पद्धत कायमची बंद झाली. १९०५ साली गुलामगिरीला कायमची मूठमाती देण्यात आली. देश सरंजामशाहीकडून स्वतंत्रतेकडे वळला. संस्कार-विचारांचं रुजणं किती महत्त्वाचं असतं, हे समाजाला जाणवलं. एकेकाळच्या राजपुत्रानं राजा झाल्यावर आपल्या शिक्षिकेला-अॅनाला- दिलेलं वचन पूर्ण केलं. तिला खरोखरच कृतार्थ झाल्यासारखं वाटलं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link